शेतकऱ्याकडे 80 हजारांची लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यासह तिघांना अटक, संगमनेरचे महाशय थेट जेलमध्ये.! 319 एकरची बागायतदार नडला.!
सार्वभौम (संगमनेर) :-
पाटाचे पाणी शेतीला कायम व वेळेवर मिळण्यासाठी श्रीरामपूर सिंचन शाखेचे अधिकारी यांनी बागायतदार शेतकरी यांच्याकडे तब्बल 85 हजार रुपयांची लाच मागितली. शेतकऱ्याचा 60 एकर ऊस असून 25 एकर उसासाठी ते पाटाचे पाणी घेतात. मात्र, आपले पाटाच्या पाण्याखाली क्षेत्र जास्त आहे त्यामुळे तुम्हाला जास्त पाणीपट्टी द्यावी लागेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु, 25 एकर पाटाच्या पाण्यावर आणि 35 एकर विहिर व बोअरवेल द्वारे सिंचनाद्वारे पाणी दिले जाते असे शेतकरी जीव तोडून सांगत होते. मात्र, लाचखोरीची अभिलाशा असल्यामुळे अधिकारी त्यांची रि ओढतच होते. शेवटी आरोपी कालवा निरिक्षक अंकुश सुभाष कडलग (रा. ढोलेवाडी-गुंजाळवाडी, ता. संगमनेर) याने दुसऱ्या शेतकऱ्याला मध्यस्ती घातले आणि बागायतदार शेतकऱ्याकडे 85 हजार रुपयांची मागणी केली. आता रोज काबाड कष्ट करायचे आणि एसीत बसणाऱ्या अधिकाऱ्यांच्या घशात पैसे घालायचे हे बळीराजाला पचणी पडत नव्हते. त्यांनी कडलग यांस समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोंडाला पाणी सुटलेला गडी ऐकेल तो अधिकारी कसला. अखेर 85 हजार रुपयांची तडजोड 40 हजार रुपयांवर आली आणि अनिस सुलेमान शेख (रा.निमगाव खैरी) व फुलधंदा करणारे संजय भगवान करडे (रा. मोरगे वस्ती, श्रीरामपूर) यांच्या हास्ते 40 हजार रक्कम स्विकारताना लाचलुचपत विभाग अहमदगनर यांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. तर यात पैसे मागणिची रेकॉर्डिंग देखील ताब्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, तक्रारदार यांचे सुनेचे नावे महाराष्ट्र शेती विकास महामंडळ यांचे मालकीचे हरेगाव मळा येथे गट नंबर 03 मधील 319 एकर शेती दहा वर्षाच्या करार पद्धतीने कसण्यास घेतलेली आहे. तक्रारदार शेतकरी यांनी सदर क्षेत्रापैकी सध्या 60 एकर ऊस लागवड केली होती. सदर शेतीस पाटबंधारे विभागाचे आवर्तनाद्वारे पाणी मिळते आहे. त्यास दर तीन महिन्यांनी पाटबंधारे विभागाकडे पाणी पट्टी भरावी लागते. ती संबंधित शेतकरी भरत आहे. तक्रारदार यांना जानेवारी 2023 ते मार्च 2023 या कालावधीत रुपये 26 हजार 280 रुपये पाणीपट्टी आली होती. सदरची पाणीपट्टी तक्रारदार हे शेती महामंडळाचे हरेगाव येथील कार्यालयात भरतात. महामंडळातर्फे सदर पाणीपट्टी पाटबंधारे विभागास वर्ग केली जाते. तक्रारदार यांचे 60 एकर उसाचे क्षेत्र आहे. त्यापैकी 35 एकर क्षेत्रासाठी शेतात असलेल्या विहीर व बोअरद्वारे सिंचन केले जाते. तर, उर्वरित 25 एकरसाठी पाटबंधारे विभागाकडून कालव्याचे पाणी घेतले जाते.
दरम्यान, यातील पाटबंधारे अधिकारी अंकुश कडलग याने शेतकरी तक्रारदार यांना त्यांचे शेती सिंचनाचे क्षेत्र जास्त असल्याचे सांगितले. जर तुम्हाला पाटबंधारे विभागामार्फत देण्यात येणारे पाणी अविरत चालू ठेवायचे असेल. तर, 85 हजार रुपये लाच द्यावी लागेल असे सांगितले. मात्र, शेतकरी महोदय त्यांना तळमळीने सांगत होते. की, मी 35 एकर क्षेत्रासाठी विहीर व बोअरद्वार पाणी देतो आणि उर्वरित 25 एकरसाठी पाटबंधारे विभागाकडून कालव्याचे पाणी घेतो. त्यासाठी शासन अपेक्षित रक्कम भरतो आहे. मग 85 हजार कसे व कोठून द्यायचे. पण, अधिकारी ऐकण्यास तयार नव्हते. त्यांनी पैसे उकळण्यासाठी आणखी दोघांना मध्यस्ती घातले. मध्यस्ती शेख आणि करडे यांनी देखील शेतकऱ्यास पैसे देण्यास उद्युक्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकरी आपल्या कष्टाचा हिस्सा असल्या जुलूमशाहीने देण्यास तयार नव्हता. कडलग या अधिकाऱ्याविषयी अन्य देखील तक्रारी होत्या. मात्र, मांजराच्या गळ्यात घंटा बांधेल कोण अशी उंदरांमध्ये चर्चा या म्हणीप्रमाणे त्रास होता, तक्रार करु वाटत होती, पण पुढे येणार कोण? अखेर स्वत:चा प्रश्न घेऊन बळीराजा पुढे आला आणि त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंध विभाग अहमदनगर कार्यालय गाठले. जो काही प्रकार घडला त्यावर सविस्तर तक्रार दाखल केली. त्यानुसार दि. दि. 07 जून 2023 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली.
दरम्यान, लाच मागणी पडताळणी केली असता त्यात तत्थ्य आढळून आले. आरोपी अंकुश कडलग याने आरोपी अनिस शेख याचे मार्फत शेतकऱ्याकडे प्रत्यक्ष साक्षिदारांच्या समक्ष 85 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. इतकी रक्कम देणे शक्य नाही असे म्हणताच तडजोडी अंती 40 हजार रुपये लाच मागितली. तसेच या प्रकरणात फोनवरील संभाषणाद्वारे देखील काही पुरावे लाचलुचपत विभागाच्या हाती आले आहेत. त्यामुळे, काल (दि. 25) आरोपी अंकुश कडलग, अनिस शेख व संजय करडे या तिघांना रात्री पोलिसांनी अटक केली आहे. तर, यात आणखी कोणाचा हात आहे का? यांच्या बॅंकेत किती मालमत्ता आहे, यांच्या घराची झडती घेणे, यांनी कोणा-कोणाकडून लाच घेतली आहे याची चौकशी करणे कामी यांना पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. ही कारवाई पोलीस उपाधिक्षक प्रविण लोखंडे, पोलीस निरीक्षक आर. बी. आल्हाट, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, सचिन सुद्रिक, दशरथ लाड या पथकाने केली.