अकोल्यात रोडरोमियोंवर कारवाई, डेप्युटी स्वत: मैदानात, कॉलेज सुटले की हे हिरो होतात, गस्त सुरू.!



सार्वभौम (अकोले) :-

          अकोले शहरातील कॉलेज सुटल्यानंतर अनेक रोडरोमिओ त्यांच्या गाड्यांचे स्टण्ट करतात, गाड्यांवर ट्रिपल-चौपलशिट बसून शायनिंग मारण्याचा ट्रेड येथे नव्याने रुजु होत आहे. कधी शालेय विद्यार्थींना कट मारणे तर दादागिरी करीत आपण इथला भाई आहे अशा पद्धतीने नको ती ओव्हर ऍक्टींग पहायला मिळते. या रोडरोमिओंच्या तक्रारी पोलीस उपाधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे गेल्या होत्या. तेव्हा त्यांनी या घटनेकडे गांभिर्याने पाहुन थेट अकोले गाठले आणि स्वत: रस्त्यावर उतरुन ३१ वाहन चालकांवर कारवाई केली. त्यांना प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे दंड करण्यात आला असून जी मुले अल्पवयीन आहेत त्यांच्या पालकांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पुरोगामी अकोले तालुक्याला जात, धर्म आणि मतभेदाची किड लागली आहे. त्यामुळे, येथे समानतेच्या बैठका घेण्याची वेळ येऊ लागली आहे. अगदी कालपर्यंत सुसंस्कृत असणारे विद्यार्थी सुद्धा जाती धर्माच्या नावाखाली मैदानात उतरु लागले असून अगदी सहज कायदा व व्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करुन लागले आहेत. दुर्दैवाची बाब अशी की, विद्यार्थीनींवर अत्याचार होण्याचे प्रमाण देखील अकोले तालुक्यात वाढत आहे. याला पायबंद घालण्यासाठी आता प्रशासनाने कंबर कसली आहे. शाळा, कॉलेज, बस स्थानके आणि सार्वजानिक ठिकाणी पोलिसांनी आपल्या गस्त वाढविल्या असून साधा गणवेशात देखील पोलीस आता पहारा देताना दिसत आहे.



खरंतर शाळा, कॉलेज आणि बस स्थानक परिसरात तसेच महत्वाच्या चौकांमध्ये काही तरूणांची भाईगिरी उदयास येऊ लागली आहे. मुलींना त्रास देणे, त्यांचा पाटलाग करणे, नंबर नसलेल्या गाड्यांहून रायडिंग करणे, बुलेट घेऊन तिच्या सायलेन्सरमधून मोठा आवाज काढणे असे प्रकार सर्रस सुरू आहेत. यात आणखी एक बाब लक्षात आली आहे. की, अल्पवयीन मुले देखील रायडिंग करण्यात कोठे कमी नाही. अशा कृत्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो किंवा त्याचा देखील जीव धोक्यात जाऊ शकतो. त्यामुळे, अशा रोडरोमिओंची तक्रार काही सजग नागरिकांनी पोलीस उपाधिक्षक वाघचौरे यांच्याकडे केली होती.

दरम्यान, साहेबांनी अकोले पोलीस ठाण्यात एक बैठक घेतली. त्यानंतर साहेब स्वत: महात्मा फुले चौकात जाऊन उभे राहिले. नंबर नसणार्‍या गाड्या, ट्रिपलशिट, अल्पवयीन वाहन चालक असे वाहतुकीचे अनेक नियम न पाळणार्‍या व्यक्तींवर थेट गुन्हे दाखल केले. तर जी अल्पवयीन मुले आहेत त्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल करुन त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जाणे भाग पाडले आहे. अर्थात लहान मुलांना गाडी देणे, त्यांच्यावर असली जीवघेणी जबाबदारी टाकणे हे फार धोकादायक आहे. हे सर्व माहित असून देखील पालक मुलांकडे गाड्या देतात हे फार मोठे दुर्दैव आहे. पोलीस अधिकार्‍यांच्या या कारवाईमुळे त्यांचे अनेकांनी कौतुक केले आहे. ही कारवाई पोलीस उपाधिक्षक वाघचौरे व पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भुषण हांडोरे, पोलीस कर्मचारी  वलवे, विठ्ठल शरमाळे, सुहास गोरे यांनी केली.