डॉ. लहामटे यांच्यापुढे द्वंद्व.! काकांना धरलं तर चावतय, दादांना धरलं तर पळतय.! बंडखोरी त्यांना जड जाईल.!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
राज्यात सत्ता नाट्य सुरु असताना अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे हे नेमकी काय निर्णय घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. कारण, त्यांच्या निर्णयाने तालुक्यात राजकीय बदलाचे वारे वाहणार आहेत. एकीकडे सुनिताताई भांगरे, दुसरीकडे मारुती मेंगाळ, वैभवराव पिचड आणि डॉ. लहामटे यांचे राजकीय भविष्य या निर्णयामुळे ठरणार आहे. जर, डॉ. लहामटे अजित पवार यांच्या गोटात जाऊन मिळाले तर काय होऊ शकते आणि जर शरद पवार साहेब यांच्याशी एकनिष्ठ राहिले तर काय होऊ शकते यावर तालुक्याची राजकीय गणिते ठरणार आहेत. एकंदर तालुक्यातील जनतेचा कौल पाहिला तर लक्षात येते की, विकासात्मक दृष्टीकोणातून अजित दादा योग्य वाटतात आणि भावनिक दृष्टीकोण ठेवला तर शरदचंद्र पवार जवळ वाटतात. मात्र, यात जड कोणाचे पारडे असेल. तर ते शरद पवार यांचे असल्याचे ग्राऊंड रिपोर्ट सांगतो आहे. त्यामुळे, आता डॉ. लहामटे यांनी जनतेच्या भावनेकडे जावे की विकासाकडे हा त्यांचा प्रश्न आहेे.
उपमुख्यमत्री अजित पवार यांच्या एका निर्णयामुळे राष्ट्रवादी कॉंग्रसचे नेते आणि कार्यकर्ते प्रचंड संभ्रमात पडले आहेत. तर, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीपराव वळसे पाटील यांच्या शपथविधीमुळे या बंडात शरद पवार यांचा सहभाग तर नाही ना? असा संभ्रम देखील निर्माण झाला आहे. मात्र, एकंदर शिवसेनेत बंड झाले तेव्हा देखील यात उद्धव ठाकरे यांचा सहभाग असावा असे वाटत होते मात्र, तसे झाले नाही. असेच काहीसे आज राष्ट्रवादीच्या बंडाबाबत झाले आहे. मात्र, शरद पवार यांच्या तत्काळ ऍक्शन मुडमुळे हे त्यांच्यावर असणारी शंका देखील दुर होऊ लागली आहे. मग आता प्रश्न उरतो. की, उद्याच्या बैठकीत अजित पवारांसोबत कोण जाणार आणि शरदचंद्र पवार यांच्यासोबत कोण जाणार. जर अजित पवार यांना दोन तृतीअंश बहुमत सिद्ध करता आले तर ठिक अन्यथा पुन्हा कायदेशील लढाई आणि पुर्वी झाले तसे तिच गुल आणि तीच काडी..!!!
आ.लहामटे अजित दादांसोबत गेले तर..!!
डॉ. किरण लहामटे हे अजित दादांसोबत गेले तर त्यांना विकासात्मक फायदा होणार आहे. लहामटे यांनी प्रथमत: दादांची भेट ते राजभवन हा प्रवास कसा झाला हे स्पष्ट केले. त्यात त्यांनी दादांपेक्षा आपण पक्ष आणि पवार निष्ठा यावर जास्त भर दिला. आपण शपथविधी आणि दादांची रणनिती याबाबत अनभिज्ञ होतो असे सांगितले. मात्र, अकोले तालुक्यात एमआयडीसी, देवीचा घाट फोडणे, उपजिल्हा रुग्णालय, भरिव निधी आणि तालुक्यात ज्या काही कामांची स्थगिती आहे ती उठविण्यासाठी त्यांना दादांचा गट हवा हवासा वाटतो. जर लहामटे दादा गटात सामिल झाले तर शंभर टक्के तालुक्याला मोठा निधी मिळेल, त्यातून विकास देखील होईल. राष्ट्रवादीचा आमदार असल्यामुळे दादा डॉ. लहामटेंकडे दुर्लक्ष करणार नाही आणि विशेष म्हणजे लहामटे यांना मंत्रीपदाची अभिलाशा नसून महत्वाची पेंडींग कामे मार्गी लागतील. गेल्या काही वर्षात जितके काम तालुक्यात झाले नाही तितके काम तालुक्यात झाल्याचे पहायला मिळेल यात तिळमात्र शंका नाही.
आ.लहामटे शरद पवारांसोबत गेले तर..!!
डॉ. किरण लहामटे हे शरद पवार यांच्यासोबत गेले तर शक्यतो आमदार निधी वगळता फार निधी त्यांना मिळेल असे वाटत नाही. मात्र, या तालुक्यात जेव्हा पिचड साहेब यांनी बंड केले तेव्हा त्यांना कोणी विचारले नाही. की, तुम्ही किती कामे केली? पण, शरद पवार यांच्यासोबत केलेल्या बंडाची किंमत त्यांना भोगावी लागली. डॉ. किरण लहामटे यांच्याबाबत यापेक्षा वेगळे काही होणार नाही. त्यांच्यावर अगदी कालपासून खोक्यांचा शिक्का लागल्याचे पहायला मिळत आहे. महाराष्ट्र हा प्रचंड भावनिक असून शरद पवार आणि राष्ट्रवादी हे गणित अकोले तालुक्याच्या राजकीय अस्मितेचे गमक आहे. त्यामुळे, आज तालुक्याचा ग्राऊंड रिपोर्ट घेतला असता जनतेला अजित दादा आणि शरद पवार यात तुलना करणे अवघड जात असले तरी शरद पवार यांचे पारडे जरा जास्तच जड असल्याचे दिसते आहे. वास्तवत: लोकांनी थोडाफार विकास कमी झाला तरी हरकत नाही. पण गद्दारी आणि बंडखोरी तालुक्याच्या जनतेला पचणार नाही. आज, अकोले तालुक्यात संघटन म्हणून सिताराम पाटील गायकर यांच्यामुळे अजित पवार यांच्या पाठीशी मोठा वर्ग असेलही. मात्र, भावना आणि पक्ष म्हणून शरद पवार यांची फार मोठी भावनिक लाट देखील आहे. त्यामुळे, आता डॉ. लहामटे यांनी ठरवायचे आहे. मोठे साहेब की छोटे साहेब.!!
आमदारकीवर सगळ्यांचे लक्ष आहे.!!
स्वर्गीय यशवंतराव भांगरे आणि आदरणीय अशोकराव भांगरे या कुटुंबाने शरद पवार यांचा शब्द आजवर प्रमाण मानला आहे. तीच परंपरा कायम ठेऊन सुनिताताई भांगरे यांनी काल थेट बारामती गाठली आणि शरद पवार यांची भेट घेऊन पवार साहेबांना आम्ही तुमच्या सोबत आहोत असे ठामपणे सांगितले. यातून डॉ. लहामटे हे शरद पवार साहेबांशी निष्ठावंत नाही हे निच्छित झाले. कारण, त्यांनी जनतेचा कौल घेऊन निर्णय घेणे पसंत केले. जसे खा. अमोल कोल्हे म्हणाले मी साहेबांसोबत, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, प्राजक्त तनपुरे यांनी डोळे झाकून आपली निष्ठा घोषीत केली. मात्र, जनतेच्या भरोशावर डॉ. लहामटे कात्रीत सापडले. त्याचा फायदा भांगरे यांना नकळत घेतला तर मेंगाळ यांनी देखील दादा उपमुख्यमंत्री होताच फटाक्यांची आतिशबाजी केली. ना घर का ना घाट का अशी परिस्थिती डॉक्टरांची झाली. मात्र, आमदार असल्याने त्यांची डिमांड काही कमी झाले नाही. तर, २०१९ साली डॉक्टरांना मंत्री करण्याचा अग्रह हा स्वत: शरद पवार यांचा होता याची देखील आठवण अनेकांनी करुन दिली. यात सर्वात महत्वाचे म्हणजे अद्याप पिचड कुटुंबाने वेट ऍण्ड वॉच भुमिका घेतल्यामुळे तालुक्यात नव्याने काहीतरी राजकीय हलचाली होतील अशा प्रकारचे चित्र पहायला मिळत आहे. यात डॉ. लहामटे यांची बाकी फार मोठी गोची झाल्याचे पहायला मिळते आहेे. दादांकडे जावे तर विकास खुंटतोय आणि मोठ्या साहेबांकडे ना जावे तर भावनांना ठेच पोहचतेय. आता निर्णय त्यांच्या हाती आहे. पण, येणार्या काळात विकास हा निवडणुकीचा अजेंडा होऊ शकत नाही हे देखील त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.