डॉ. लहामटेंचा अजित पवारांना धक्का.! जनतेच्या मतांचा केला आदर.! होय.! राजा हरिश्चंद्र नगरितील सच्चा माणूस.!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी नेहमीच जनतेच्या मतांचा आदर केला आहे. आज राज्यात सत्तापिपासू राजकारण सुरू आहे. त्यामुळे, पुर्वी शिवसेना आणि आता राष्ट्रवादीत फुट पडली आहे. एकीकडे प्रत्येकाला खोके घेऊन बोके होण्याची संधी मिळत आहे तर कोणी सत्तेत राहून माया जमा करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा घाणेरड्या राजकारणात डॉ. किरण लहामटेंसारखा सामान्य आदिवासी आमदार सत्ता आणि खोक्यांना लाथ मारुन शरद पवार यांच्या पाठीशी उभा राहतो. हीच अकोले तालुक्याची माती आणि सह्याद्रीचे संस्कार आहेत. ज्या पक्षाने आणि नेत्याने डॉक्टरांनी विधानसभेत नेले त्या नेत्याचा आणि अकोले तालुक्यातील जनतेच्या मनाचा व भावनेंचा आदर केला त्या लहामटेंना अकोले तालुक्याने अक्षरश: डोक्यावर घेतले आहे. सोशल मीडियातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सत्ता आणि खोक्यांसाठी कोणी गुवाहटीला गेले तर कोणी विरोधकांना जाऊन मिळाले. मात्र, संविधानात्मक लोकशाहीची गळचेपी होऊ नये, निष्ठा आणि दैवत या शब्दांना काळीमा लागू नये म्हणून सगळ्या गोष्टी अक्षरश: लाथाडून डॉ.लहामटे यांनी शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवला आहे. अजित पवार यांच्या शपथविधीत पहिल्या रांगेत अगदी दिमाखात बसलेल्या डॉक्टर लहामटे यांनी अजित पवारांच्या बंडखोरीचे ऑपरेशन केल्याचे पहायला मिळाले. जेव्हा शरदचंद्र की अजित दादा अशी द्वंद्वात्मक परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा लहामटे यांनी कोणताही घाईचा निर्णय न घेता पहिले ते आपल्या मतदारसंघात आले. त्यांनी काही कार्यकर्त्यांशी चर्चा केली बहुतांशी कल हा संमिश्र होता. तेव्हा निष्ठा विचारात घेऊन डॉक्टरांनी थेट शरद पवारांचे वाय.बी सेंटर गाठले.
खोक्यांच्या चर्चाने बदनामी.!
शिंदे गटाचे आमदार आजही त्यांच्या मतदार संघात गेले तर त्यांना ५० खोके एकदम ओके अशा प्रकारची मानहानी सहन करावी लागते. मात्र, आमदार डॉ. लहामटे हे जेव्हा अजित दादा यांच्या शपथविधी सोहळ्याला हजर होते. तेव्हा त्यांच्यावर अनेकांनी खोक्यांचे आरोप केले. आमदार अकोल्यात आले तेव्हा अनेकांच्या व्हाटसऍप स्टेटसला १० खोके एकदम ओके असे पहायला मिळाले. तर, काही व्यक्तींनी अर्थात त्यांच्या अगदी जवळच्या पदाधिकार्यांनी त्यांची नको तशी बदनामी केली. यासाठी रोहीत पवार यांचे नाव प्रमाण म्हणून घेतले. मात्र, आज डॉक्टर लहामटे यांनी या सगळ्यांचे दात घशात घातले आहे. अनेकांच्या मनात किती द्वेष आहे हे पुन्हा एकदा पहायला मिळाले. तर होय.! मी राजा हरिश्चंद्राच्या नगरीतील सच्चा माणूस आहे हे आमदारांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. आता त्यांच्यावर कोणी चिखलफेक करु शकत नाही.
त्यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा.!
अकोले तालुक्याची जनता जितकी अजित दादा यांना मानते त्यापेक्षा जास्त शरद पवार साहेब यांना मानते. दादांच्या दहा सभा आणि पवार साहेबांची एक सभा सारखी आहे. त्यामुळे, अकोले तालुक्यात ‘‘पवार की पावर’’ अशी परिस्थिती आजवर पहायला मिळाली आहे. त्यामुळे, सत्ता आणि खोक्यांना झुगारुन डॉ. लहामटे यांनी जो काही पवार साहेबांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे, तालुक्यातील जनता प्रचंड आनंदी आहे. आपण नेमून दिलेला नेता तथा लोकप्रतिनिधी हा विकावू, सत्तापिपासू आणि लाचार नाही हे जनतेला प्रचंड भावले आहे. त्यामुळे, येणार्या काळात डॉ. लहामटे यांच्या पदरात जनता भरभरुन मतदान टाकतील असे अनेकांना वाटते आहे. कारण, शरद पवार आणि अकोले तालुका हे एक समांतर गणित आहे. त्या परिक्षेत डॉ. लहामटे हे अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याच्या भावना तरुणांनी व्यक्त केल्या आहेत.
आमदारकीचे स्वप्नभंग..!!
डॉ. लहामटे यांच्या भुमिकेनंतर अनेकांच्या राजकारणाला दिशा मिळणार होती. मात्र, लहामटे यांनी वाय.बी सेंटर गाठल्यामुळे अनेकांच्या निर्णयला खिळ बसली आहे. यात आमदारकीचे स्वप्न पहाणार्या मारुती मेंगाळ यांना पाय रोवण्यास संधी मिळाली असून सुनिताताई भांगरे आणि डॉक्टर किरण लहामटे यांच्यामध्ये पुन्हा चढाओढ लागली आहे. मात्र, येणार्या काळात राजकीय परिस्थिती जैसे-थे राहिल असे जर कोणाला वाटत असेल तर तो निव्वळ मुर्खपणा ठरेल. मात्र, येथे राष्ट्रवादी आणि त्यात शरद पवार यांच्या गटाचा आमदार होईल असे जाणकारांना वाटते आहे. मात्र, येणार्या काळात शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र दिसले तर वाईट वाटण्याचा काहीच कारण नाही. त्यामुळे, आज जे वाटते त्यावर भविष्याचा वेध घेणे चुकीचे ठरेल. परंतु काही गोेष्टी ह्या त्रिकालबाधी सत्य आहे.