शरद पवार आणि मधुकर पिचड पुन्हा एक झाले तर..! आमदारकीला डॉ. लहामटेंनी केली भाऊंची कोंडी.! भांगरेंची चर्चा.!

- सागर शिंदे  

सार्वभौम (मुंबई) :-

      १७ जुलै २०१९ रोजी पिचड पितापुत्र भाजपात जाणार या चर्चेने जोर धरला. मात्र, हे अफवेचे पॅव असल्याचे पिचड साहेब म्हणाले. पण, हा खोपणाचा मुखवटा ते जास्त दिवस टिकवू शकले नाही. जुलै अखेर त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर तालुक्यात पिचड साहेबांच्या विरोधात प्रचंड लाट उसळली. त्यांनी ४० वर्षे काय केले हे विचारण्याची हिंमत १४ हजार दिवसात कोणी केली नाही. मात्र, त्यांनी राष्ट्रवादी तथा शरद पवार यांना सोडले आणि अनेक प्रश्‍नांचा भडीमार सुरू झाला, अर्थात तो एक रोष होता. पवार साहेबांचा सर्वात जुना साथिदार ज्यांच्यावर त्यांनी स्वत:हून जास्त विश्‍वास टाकला. त्यांना काहीच कमी केले नाही, असे असताना पिचडांनी शरद पवार यांना सोडले. त्यानंतर त्याचे परिणाम काय झाले हे नव्याने सांगण्याची गरज नाही. मात्र, आता आपल्या जुन्या साथीदारास साथ देण्याची वेळ आली आहे. त्यानी जे दिले त्याची उतराई आणि भुतकाळात झालेल्या चुका सुधारण्याची संधी आली आहे. त्यामुळे, जर पिचड साहेब शरद पवारांच्या भेटीला गेले तर ही देशातील मोठी घडामोड, राज्याच्या राजकारणाला कलाटणी आणि तालुक्याच्या इतिहासाला पुन्हा कलाटणी मिळेल यात तिळमात्र शंका नाही..!!

खरंतर, अजित पवार खुद्द भाजपाला जाऊन मिळाल्यामुळे आता ते गेल्या चार वर्षात ३ वेळा उपमुख्यमंत्री झाल्याचा इतिहास त्यांनी रचला आहे. आता डॉ. लहामटे हे दादा गटात गेल्यामुळे अकोले विधानसभेची जागा उद्या शिवसेना (शिंदे गट)-भाजपा-आणि राष्ट्रवादी (दादा गट) यांच्या ताब्यात जाणार आहे. विद्यमान आमदार असल्यामुळे डॉ. लहामटे यांना डावलणे हे वाटते तितके शक्य नाही. त्यामुळे, वैभव पिचड यांचे काय? हा फार मोठा प्रश्‍न असणार आहे. पण, शरद पवार यांना डावलुन अकोले तालुक्याचे राजकारण हे अशक्य आहे. अगदी अजित दादा यांनी येथे तळ ठोकला तरी सुद्धा. थोडक्यात म्हणजे, कालच्या बंडावर अकोल्यातून ज्येष्ठ नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील उमटल्या आहेत. त्यामुळे, एकदा का शरद पवार अकोल्यात आले. की, कशी मुंग्यांसारखी मानसे काही क्षणात गोळा होतात. हे आपण अकोले बाजारतळावर पाहिले आहे. त्यामुळे, पवार की पावर अकोल्यातून वजा करता येणार नाही. म्हणून पिचड साहेबांनी आता पुन्हा उभारी घेण्याची संधी मिळाली आहे. त्यांनी त्याचे सोने करावे. कारण, भाऊंचे बनावट कार्यकर्ते त्यांना काही उमजू देणार नाही आणि अकोले तालुक्यात भाजपाचा आमदार कधी होणार नाही असे अनेकांचे ठाम मत आहे. 

अनेकांना आमदारकीचे डोहाळे लागले.! 

येणार्‍या काळात राष्ट्रवादीत दोन गट पडणार ही अगदी काळ्या दगडावरील रेघ होती. त्याचा मुहूर्त काल निघाला. त्याचे फायदे आणि तोटे आता पहायला मिळु लागले आहेत. आ. डॉ. किरण लहामटे हे दादा गटात गेल्यानंतर सुनिता भांगरे यांच्या कार्यकर्त्यांनी आता आमदारकीची चर्चा सुरू केली आहे. तर, मारुती मेंगाळ यांनी देखील पवार साहेबांच्या मुळ राष्ट्रवादीकडे आपले माप झुकते केले आहे. अर्थात अकोले तालुक्यात अजित दादा यांच्यापेक्षा शरद पवार साहेब व खा. सुप्रिया सुळे यांना माननारा वर्ग फार मोठा आहे. तर, यात सिताराम पा. गायकर हे देखील काय भुमीका घेतात हे पाहणे देखील फार महत्वाचे ठरणार आहे.  या सगळ्यात जर कधी पिचड साहेबांनी वेगळी भुमिका घेतली तर आमदारकीचे स्वप्न पहाणार्‍यांची प्रचंड मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे.     

 पिचड साहेब पुन्हा बॉस असतील.!

एकेकाळी अजित पवार हे पक्षातील महत्वाचे घटक असले तरी त्यांना डावलुन पिचड साहेब यांचा शब्द राष्ट्रवादीत प्रमाण मानला जात होता. १९९९ साली राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर पक्ष वाढीसाठी पिचड साहेबांनी मोलाची कामगिरी पार पाडली आहे. त्याचे फलित म्हणून अगदी २०१९ पर्यंत राष्ट्रवादीत पवार साहेबांच्या नंतर त्यांचेच वजन होते. पक्षाध्यक्ष, मंत्री, प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेता अशा अनेक संधी त्यांना मिळाल्या. मात्र, उतारवयात त्यांचे जे काही सामाजिक हाल झाले आहे. ते नाकारुन चालणार नाही. आमदारकी आणि अगदी कारखान्याच्या निवडणुकीत देखील त्यांना पराभव स्विकारावा लागला. अनेकदा शेवटची निवडणुक म्हणुन त्यांचे डोळे भरुन आले. हे कशामुळे? तर बेशक शरद पवार यांची साथ सोडल्यामुळे. आता झाले गेले विसरुन जावे आणि पिचड साहेबांनी जय विरु सारखी आपली मैत्री निभवावी असे अकोले तालुक्यातील राष्ट्रवादीत असणार्‍या अनेक कार्यकर्त्यांना वाटते आहे. साहेबांची जी पुर्वी इमेज होती ती पुन्हा राज्यात उमटेल आणि दोघांच्या संगतीने पुन्हा महाराष्ट्रात राष्ट्रवादी उभी राहिल असे अनेकांना वाटते आहे.

बंड मोडीत निघणार आहे.!

काही आमदारांशी संपर्क केला असता असे लक्षात आले. की, अजित पवार यांनी त्यांच्या हाऊसमध्ये आमदारांना बोलविले होते. त्यांच्याशी बैठक केली आणि त्यांच्या सह्या देखील घेतल्या. तेथून आमदार खासदार यांना थेट राजगृहात कार्यक्रमासाठी नेले. अनेकांना अजित पवार यांच्या बंडाबाबत कल्पना नव्हती. खरंतर आमदार अमोल मिटकरी आणि खासदार अमोल कोल्हे यांनी काय प्रतिक्रिया दिल्या ह्या संपुर्ण देशाने पाहिल्या आहेत. तर, अनेकांनी त्यांच्या मतदारसंघातील आमदारांशी संपर्क केला असता हे बंड आम्हास माहित नाही अशा प्रतिक्रिया आल्या आहेत. तर, सर्वात महत्वाचे म्हणजे शरद पवार यांनी स्वत: सांगितले. की, अनेक आमदार माझ्या संपर्कात आहेत. त्यामुळे, एकंदर जोवर शरद पवार नावाचा वटवृक्ष राष्ट्रवादीत आहे. तोवर हे झाड विखुरले जाणार नाही अशी प्रतिक्रिया जनतेतून येऊ लागले आहे. त्यामुळे हे बंड दिर्घकाळ टिकणार नाही असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे,  अशातच जुन्या ज्येष्ठ नेत्यांनी आपली मलिन झालेली प्रतिमा स्वच्छ करण्याची संधी आहे त्याचा फायदा घेतला पाहिजे.