भांगरे कुटुंबाचा आमदार होण्यास, डॉ.लहामटेंनी दिली संधी.! प्रचंड भावनिक लाट.!

  

- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :-

     स्व. यशवंतराव भांगरे गेल्यानंतर भांगरे कुटुंबाला विधानसभेत जाण्याचे भाग्य लाभले नाही. स्व. अशोकराव भांगरे यांनी १९८९ ते २०१९ पर्यंत अतोनात प्रयत्न केले. मात्र, यश आले नाही. पण, जसा त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आम्ही निष्ठावंत आहोत हे २०१९ मध्ये सिद्ध करुन दिले. त्यानंतर त्यांना जिल्हा बँक आणि नंतर अगस्ति कारखान्याचे व्हा-चेअरमन पद मिळाला. अर्थात नंतर फक्त जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून संधी मिळाली असती. मात्र, खुद्द डॉ. किरण लहामटे यांनीच भांगरे कुटुंबाला आता आमदारकीची संधी उपलब्ध करुन दिली आहे. त्यांनी तालुक्यातील जनतेच्या भावनांशी गद्दारी करीत दादा गट गाठला आणि शरद पवार यांना तोंडघाशी पाडले. उलट झाले काय? या बेडूक उड्यांमुळे जनतेचा विश्‍वास उडाला, त्यास पवार साहेबांना मानणार्‍या लाखो मतदारांची मने दुखावली गेली, सत्तेच्या पोळ्या खाण्यासाठी विकासासाठी चाललो असे भाकड कथानक जनतेला मान्य झाले नाही. मग पिचड साहेब आणि तुमच्यात बदल तरी काय ? त्यामुळे, एकीकडे पक्ष बदलु किंवा तडजोडीचे राजकारण असा पुर्वी शिक्का पडलेले भांगरे कुटुंब राष्ट्रवादीशी तथा शरद पवार आणि जनतेच्या भावनांशी ठाम राहिले. तो शिक्का त्यांनी पुसला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अशोकराव भांगरे यांच्या जाण्याने तालुक्यात सुनिता भांगरे आणि अमित भांगरे यांच्याबाबत प्रचंड भावनिकतेची लाट निर्माण झाली. त्यात आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे यांना चांगली संधी प्राप्त करुन दिली असून आता भांगरे परिवारातील आमदार होणार अशा प्रकारची चर्चा तालुक्यात रंगली आहे. तर, सोशल मीडिया किंवा गावोगावी जनतेचा कौल घेतला असता काहींना भाजप मान्य नाही, काहींना आमदार मान्य नाही, काहींना त्यांची बंडखोरी मान्य नाही, तर बहुतांशी लोकांना त्यांनी पवार साहेबांना सोडलेले मान्य नाही. त्यात कोणताही विचार न करता सुनिताताई आणि अमितराव हे शरद पवारांना भेटून आले. कोण कोठे जाईल माहित नाही. पण, आम्ही तुमच्या पाठीशी ठाम उभे आहोत असा विश्वा दिला आहे. त्यामुळे, विकास आणि निधी हे तालुक्यापुढे कस्पट ठरणार असून निष्ठेला जनता मतदान करतील असा एकंदर सुर बाहेर पडताना दिसत आहे.

खरंतर २०१९ च्या निवडणुकीत अशोकराव भांगरे हे डॉ. किरण लहामटे यांच्या विजयाचे खरे शिल्पकार ठरले. भांगरे साहेबांनी गेली ४० वर्षे आमदारकीचे स्वप्न पाहिले. मात्र, ते सत्यात उतरले नाही. म्हणून पिचडांच्या विजयाचा रथ स्थिर करण्यास भांगरेंनी मोठी उटी लावली आणि अखेर अपराजित रथाचा पराभव झाला. दुर्दैवाने डॉ. किरण लहामटे यांनी विजयानंतर कोणाला स्वत:च्या गटात सबादुन घेतले नाही. त्यामुळे २०१९ साली एकास एक करणारे नेते २०२३ च्या जुलै अखेर एकात एक दिसले नाही. त्यात भांगरे साहेब देखील अपवाद ठरले नाही. त्यामुळे, भांगरे यांचा ताफा कायम वेगळा फिरताना दिसला. या दरम्यानच्या काळात सुनिताताई भांगरे यांनी पायाला भिंगरीच लावली होती. एक दिवस तरी पुन्हा भांगरे कुटुंबाला जनता विधानसभेत पाठवेल याची मला खात्री आहे असे भांगरे साहेब म्हणत होते. दुर्दैवाने ते देवलोकात गेले आणि पिचड साहेबांना पराभूत करण्याचे स्वप्न त्यांचे साकार झाले. मात्र, आमदारकीचे दिवास्वप्नच राहुन गेले.

खरंतर साहेब गेले खरे.! पण, त्यांनी विश्‍वास आणि निष्ठा सोडली नाही. आता माझा जीव गेला तरी मी राष्ट्रवादीतच राहणार हेच त्यांचे वाक्य काळजाला भिडणारे होते. तर, शरद पवार यांच्या शेंडीच्या सभेत डॉ. लहामटे यांना साक्षी ठेऊन त्यांनी अमित भांगरे यांनी राष्ट्रवादी पक्षासाठी अर्पन केले होते. खरंतर भांगरे कुटुंबाने तो शब्द पाळला. जेव्हा डॉ. लहामटे अजित पवार यांच्या शपथविधीत पहिल्या रांगेत बसले होते. तेव्हा शरद पवार यांना धिर देण्यासाठी स्वत: सुनिता भांगरे यांनी कराड गाठले होते. साहेब.! आम्ही तथा आमचे भांगरे कुटुंब सदैव तुमच्या सोबत आहे हे ठामपणे सांगितले होते. तर, शरद पवार यांनी देखील काही जुन्या गोष्टींना उजाळा दिला. ते म्हणाले. की, १९६२ तसेच १९७२ आणि त्यानंतर १९७७ साली देखील मला स्व. यशवंतराव भांगरे यांनी साथ दिली होती. माझा सच्चा कार्यकर्ता गेल्याचे मला फार दु:ख आहे. असे म्हणत त्यांनी अशोकराव भांगरे यांची २०१९ च्या काही महत्वपुर्ण घडामोडी सांगितल्या. तर काही मोजक्या शब्दात पवार साहेबांनी भांगरे कुटुंबाबत विश्‍वास व्यक्त केला.

लोक निष्ठेला महत्व देतील.!

आता या तालुक्याला भांगरे कुटुंबाला न्याय देण्याची वेळ आली आहे. कॉलेज, दुधसंघ आणि येथील स्थानिक संस्था त्या काळात यशवंतराव भांगरे यांनी तालुक्याला बहाल केल्या, त्यांच्या नंतर अशोकराव भांगरे यांनी सत्ता नसताना आदिवासी विभागात विकास करण्याचा प्रयत्न केला. उभी हयात पिचड साहेबांचा विरोध करताना त्यांना पक्ष बदलावे लागले आणि त्यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आता त्यांनी स्वत:ला सिद्ध केले पण दैवाने त्यांना दिर्घायुष्य लाभले नाही. शेंडीला जाईल तो  बिना जेवण करुन कधी आला नाही असे आपण वारंवार ऐकले आहे. त्यांच्या कुटुंबाची उतराई होण्याची वेळ आली आहे. मला विश्वास आहे लोक आता निष्ठेला महत्व देतील. आजही भांगरे साहेब गेल्यानंतर जे प्रेम जनतेने तेव्हा दिले होते ते आजही आहे. कारण, तितकीच गर्दी आजही भांगरे साहेबांच्या बंगल्यावर असते. त्यामुळे, अकोले तालुक्याची जनता सुज्ञ आहे. येणाऱ्या निवडणुकीत त्याचे निकाल दिसून येतील.

                - सुहास वाळुंज

क्रमश: भाग : 4