शाळा-कॉलेज असणार्‍या संस्थापकाच्या तिने दोन कानाखाली वाजविल्या, भर बस स्थानकावर किस मागितला.! आरोपी अटक..!

हा फोटो प्रतिकात्मक आहे.

सार्वभौम (संगमनेर) :-

     मोबाईलवर रॉंग नंबर लागला आणि त्याचा फायदा घेत शाळा-कॉलेज असणार्‍या एका संस्थापकाने महिलेला त्रास देणे सुरू केले. कधी हाय हॅलो तर कधी गुढ मॉर्निंग-गुड नाईट. तु कोण असा प्रश्‍न महिलेने विचारला तर त्याने सांगितले. की, मी शिक्षणमहर्षि आहे. मग काय! अडचणीत असणार्‍या महिलेने त्याच्याकडे जॉबची मागणी केली. शिर्डीत जॉब देतो म्हणून त्याने कबुल केले आणि नंतर संगमनेरच्या काही डॉक्टरांची नावे घेऊन तिला काम देण्यासाठी नाशिकहुन संगमनेरला बोलविले. मात्र, या गड्याच्या मानात भलतेच पाप होते. दोघे संगमनेर बस स्थानक परिसरात भेटले आणि त्याने तिच्यापुढे थेट आपल्या प्रेमाचा प्रस्ताव मंडला. तु फार सुंदर दिसते त्यामुळे माझे तुझ्यावर प्रेम आहे. मला तुझे चुंबन घ्यायचे आहे असे म्हणत काळ्या मनातील भावना ओठावर आणल्या. मग काय.! ताईंनी त्याच्या दोन कानाखाली वाजविल्या आणि थेट पोलिसांच्या ११२ या हेल्पलाईन नंबरवर कॉल केला. तोवर याने चोरुन तिचे फोटो काढले होते. त्यामुळे तो मोबाईल देखील फोडून टाकला काही वेळानंतर पोलीस आले आणि त्यांनी याची गचांडी पकडून थेट पोलीस ठाण्यात नेले व फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पीडित महिला ही नाशिक येथील रहिवासी आहे. १० ते १५ दिवसांपुर्वी तिने तिच्या एका मैत्रीणीला व्हाटसऍपवर हाय मेसेज केला होता. मात्र, दुर्दैवाने एक अंक चुकला आणि तो मेसेज आरोपी किरण किसन आहेर (रा. लोणी, राहाता. जि. अ.नगर) याच्या मोबाईलवर गेला. मग काय.! डोम कावळ्यावारखी काही मानसे टपलेली असतात. त्यामुळे, आहेर याने लगेच हाय हॉलो सुरू केले. मात्र, तरी देखील पीडित महिलेने त्यांना सांगितले. की, काका चुकून मेसेज आला आहे क्षमा असावी. मात्र, थांबतील ते काका कसले? त्यांनी रोज सकाळी गुढ मॉर्निंग दुपारी गुड अफ्टरनुन, सायंकाळी गुड इव्हीनिंग आणि रात्री गुड नाईट असा गोळ्यांसारखा मेसेजचा रतीब सुरू केला. यास पीडित महिला पुरती वैतागून गेली होती. मात्र, मेसेज काही कमी होत नव्हते.

दरम्यान, रोज येणार्‍या मेसेजमुळे तिने त्यास विचारले तुम्ही कोण आहात? त्यावर त्याने सांगितले. की, मी किरण किसन आहेर आहे. मी लोणीचा असून माझ्या शिर्डी येथे शाळा-कॉलेज आहेत. आता इतका मोठा माणूस म्हटल्यानंतर तिने एक आधार म्हणून आहेर याच्याकडे काम मिळेल का? अशी विचारणा केली. तेव्हा तो म्हणाला, होय कॉलेजवर काम मिळेल. किंवा संगमनेर येथे माझे काही मित्र डॉक्टर आहेत. त्यांच्याकडे सुद्धा तुला नोकरी मिळवून देतो. त्यानंतर त्याने काही डॉक्टारांची नावे घेऊन तिच्याकडून आधारकार्ड, फोटो व अन्य कागदपत्रे मागवुन घेतले. ठरल्याप्रमाणे दि. २६ जुलै २०२३ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आरोपी किरण आहेर याने पीडित महिलेला फोन केला. तु आज येणार होती त्याचे काय झाले? तु संगमनेरला आली आहे का? किंवा कधी येणार आहे? त्यावर तिने उत्तर दिले की मी १० तो १५ मिनीटात घरातून निघेल. त्यानंतर पुन्हा आहेर याने तिला जरावेळाने फोन केला आणि एका डॉक्टरचे नाव घेत म्हणाला. तु त्याच्याकडे जा मी त्याला काही कागदपत्रे सेंड केले आहे. माझे नाव सांगून तुझे काम होऊन जाईल.

पीडित महिला नोकरीच्या अमिषाने संगमनेरात आली होती. तेव्हा सायंकाळचे ४ वाजले होते. त्यानंतर आहेर याने पुन्हा फोन केला आणि दुसर्‍या डॉक्टरांचे नाव घेत सांगितले. की, तु त्यांना जाऊन भेट. अशी काही नावे त्याने घेतल्यानंतर महिला संगमनेर बस स्थानक परिसरात असणार्‍या एका प्रसिद्ध चहाच्या दुकानासमोर आली. ही संगमनेरात आल्याची खात्री होताच आहेर याने तिला पुन्हा फोन केला आणि म्हणाला. की, तुला हॉस्पिटल शोधणे व डॉक्टरांना भेटणे अवघड वाटेल. त्यामुळे मी संगमनेरात येऊ का? त्यावर महिला हो म्हणाली आणि हा बहाद्दर अवघ्या १५ मिनिटात संगमनेर बस स्थानकावर हजर झाला. तो महिलेस म्हणाला. की, चल गाडीत बस आपण हॉस्पिटलकडे जाऊ. मात्र, त्याच्या काही हलचाली आणि त्याचे बोलणे वागणे यात पीडितेला शंका आली. तिने गाडीत बसण्यास नकार दिला. तिला अग्रह करुन देखील ती गाडीत बसली नाही. त्यामुळे काही वेळानंतर आरोपी स्वत: खाली उतरला आणि बस स्थानकाच्या आवारात असणार्‍या हजारो लोकांच्या गर्दीत तिच्या समोर उभा राहिला.

दोघांमध्ये चर्चा सुरू झाली आणि तो तिला म्हणला. तु किती सुंदर आहेस दिसायला, मला तु खुप आवडते, मला तुझे चुंबन घ्यायचे आहे. तु माझ्यासोबत हॉटेलमध्ये चल, तुला जॉब करायची काहीच गरज नाही. मी तुला पैसे देत जाईल फक्त जेव्हा मी तुला बोलवत जाईल तेव्हा तु येत जा किंवा तु मला नाशिक येथे बोलवत जा मी येत जाईल. या दरम्यान आहेर याने पीडित महिलेचे काही फोटो गुपचूप मोबाईलमध्ये काढले होते. हे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने मोबाईल हिसकावून घेतला आणि तो रस्त्यावर आपटून फोडून टाकला. हा प्रकार इथेच थांबला नाही. तर, संबंधित महिलेने आहेर याच्या चागल्या दोन निबार कानाखाली मारल्या. हा विनयभंग आणि त्यावर संहार होणार प्रकार हजारो लोक पहात होते. पीडित महिला कोणावर अवलंबून राहिली नाही. तर तिने थेट ११२ या पोलिसांच्या तत्काळ हेल्पलाईन नंबरला फोन केला. काही वेळात पोलीस आले आणि त्याला गाडीत घेऊन गेले. त्यानंतर कायदेशीर मार्गाने महिलेने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

आता या घटनेहून अनेक प्रश्‍न पडतात. मात्र, महिलांनी अशा प्रकारे जिल्हा सोडून एखाद्या वर पुरुषाच्या किंवा अनोळखी व्यक्तीच्या भरोशावर बाहेर पडावे का? दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे व्हाटसऍप, फेसबुक, इन्स्टाग्राम, पबजी अशा सोशल मीडियातून कित्तेक महिलांची फसवणुक होत आहे. कोणावर अत्याचार होतोय तर कोणाची हत्या होते आहे. तरी देखील महिलांमध्ये जागरुकता येत नाही ही फार दुर्दैवी बाब आहे. तर, याची दुसरी बाजु म्हणजे पुरूष तथा तरुणांनी देखील याचा बारकाईने विचार केला पाहिजे. सोशल मीडियाचा गैरवापर आणि अल्पवयीन मुलींशी विवाह तसेच महिलांच्या फसवणुकी यामुळे सामाजात प्रचंड दुषित वातावरण होत आहे. त्यामुळे महिला असो वा पुरुष, मुली असो वा मुले यांनी आपल्या मोबाईचा गैरवापर टाळला पाहिजे. तर वेगवेगळ्या ऍपचा अभ्यास व समाज उपयोगी उपक्रमांसाठी वापर केला पाहिजे.