पक्ष फोड्या उपमुख्यमंत्री आणि नारळ फोड्या आमदार.! हरिश्चंद्र नगरी विकेली गेली? पिचड-लहामटे एकच.!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
गेल्या दोन वर्षापासून राज्यात फक्त पक्ष फोडून वाट्टेल त्या पद्धतीने सत्ता हस्तगत करण्याचे काम सुरू आहे. पुर्वी शिवसेना आणि आता राष्ट्रवादी त्यामुळे, एकेकाळी लाकुड तोड्या होता आता पक्ष फोड्या म्हणून फडणविस यांच्यावर टिका होऊ लागली आहे. तर, येणार्या काळात डॉ. किरण लहामटे यांनी देखील फक्त नारळ फोड्या आमदार म्हणून गणले जाईल अशी टिका त्यांच्यावर होऊ लागली आहे. कारण, विकासाच्या मुद्द्यावर ते अजित पवार यांच्या गटात जाऊन दाखल झाले. तोलार खिंड फोडू, एमआयडीसी करु, उपजिल्हा रुग्णालय आणू अशी अनेक कारणे देत त्यांनी दादा गट गाठला. मात्र, गेल्या चाळीस वर्षात पिचड साहेबांना ही कामे करता आली नाही. तीच डॉ. लहामटेंनी चार वर्षात केली नाही. मग येणार्या वर्षभरात काय घंटा होणार आहे का? सहा महिने तर आचारसंहिता असेल मग फक्त मंजुर झाले म्हणायचे आणि नारळ फोडायचा दणका लावायचा. यापेक्षा दुसरे काहीच पहायला मिळणार नाही. त्यामुळे, विकासाच्या मुद्द्यावर जनतेच्या भावनांशी गद्दारी करणार्या आमदार येणार्या काळात फक्त नारळ फोड्या आमदार म्हणून ओळखले जातील अशी टिका विरोधक करु लागले आहेत.
अडिच वर्षे डॉ. किरण लहामटे हे सत्तेत होते. त्यांनी कोरोनाच्या काळात चांगले काम केले आणि तालुक्याला निधी देखील आणला. विशेष म्हणजे महाविकास आघाडीची सत्ता गेली तरी त्यांनी सत्तेपेक्षा जास्त निधी आणल्याचे आकडेवारीतून दिसते. मग, जनतेच्या भावनांशी खेळून त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर बंडखोरी का केली? याचे उत्तर सोशल मीडियात त्यांना ‘‘खोके मिळाले’’ असे मिळत आहे. आता काय खोटे आणि काय खरे हे राजा हरिश्चंद्राच्या नगरीतल्या सच्चा मानसांनाच माहित. पण, विकासाचा मुद्दा हा अकोले तालुक्यातील जनतेला पटलेला नाही. हे तितकेच खरे आहे.
खरंतर, पिचड साहेबांनी गेली चाळीस वर्षे एमआडीसी, तोलार खिंड आणि उपजिल्हा रुग्णालय अशा काही मुद्यांवर आपले राजकारण केले. मात्र, दुर्दैवाने यापैकी काहीच झाले नाही. जसे विखे पाटील म्हणाले की. बाळासाहेब थोरात यांनी निळवंड्याच्या पाण्यावर राजकारण केले. पण, ५० वषेर्र् त्या पाण्याची वाट पहावी लागली. प्रत्येक निवडणुकीत निळवंड्याचे पाणी म्हटलं की जनतेच्या भावना उफाळुन यायच्या पण पाणी कधी मिळाले नाही. म्हणून येणार्या निवडणुकीत पाणी हा मुद्दा यायलाच नको म्हणून त्यांनी तातडीने कालव्यांचे उद्धाटन केले आणि एकापरचे पाणी सोडून दिले. त्यामुळे, पाणी हा मुद्दा त्यांनी निवडणुकीतून काढून टाकला. अकोल्यात देखील यापेक्षा नवे काही नाही. जे पिचड साहेबांनी वर्षानुवर्षे केले. त्यावरच डॉ. लहामटेंनी आपला प्रवास सुरू केला आहे.
खरंतर, पिचड साहेबांच्या नावाखाली डॉ. किरण लहामटे यांनी आजवर राजकारण केले आहे. मी त्यांचा कट्टर विरोधक म्हणत निवडणुका आल्या की त्यांनी दुसर्या पत्नीच्या नावे जमिनी लुटल्या, त्यानी खोटा दाखला केला, त्यांनी असे केले तसे केले असा धिंडोरा पिटवायचा आणि निवडणुका संपल्या की साडेचार वर्षे तेरी भी चुप और मेरी भी चुप अशी भुमीका घ्यायची. जेथे पिचड असतील तेथे मी जाणार नाही असा त्यांचा सुर अनेकांना आठवत असेल. मात्र, आता भाजपासोबत जाताना डॉ. किरण लहामटे यांना काहीच कसे वाटले नाही? त्या रांगेत पिचड साहेब पुर्वीच बसलेले असताना त्यांच्या सानिध्याशी संधान साधताना त्यांना पिचड विरोध आठवला नाही का? विकासाच्या मुद्द्यावर पिचड साहेबांनी पवार साहेबांना सोडले होते. मग आता डॉ. लहामटे साहेब तुम्ही काय केले? याचे तुम्हाला काहीच सोयर सुतक वाटत नाही का? पिचड आणि लहामटे यांच्यात काही फरक आहे की नाही? की हे एकाच माळेचे मणी आहेत? मग, कट्टर विरोधक म्हणून अशोकराव भांगरे खरे होते की डॉ.लहामटे हे येणारा काळ हा तालुका नक्कीच ठरवेल.
खरंतर, राष्ट्रवादी म्हणून पिचड साहेबांनी उभी हयात पवार कुटुंबासोबत घालविली. ते कधी सत्तेत होते तर कधी विरोधीपक्षनेते राहिले. त्यामुळे, शरद पवार सोडा पण अजित पवार यांनी तरी अकोल्याकडे विशेष लक्ष दिले होते. मग त्यांच्या राजकीय कार्यकीर्दीत त्यांना कधी तोलार खिंड फोडू वाटली ना कधी अकोल्यात एमआयडीसी आणू वाटली. ना कधी आदिवासी विभागात विशेष फंड असून देखील येथे उपजिल्हारुग्णालय आणू वाटले ना कधी येथील मुलभूत प्रश्नांवर बोट ठेऊ वाटले. मग, विकासाच्या मुद्द्यावर दादा गटात सामिल झालेल्या आमदारांना ते हे सर्व अवघ्या एका वर्षात देणार आहे का? हा साधा आणि सरळ प्रश्न जनतेेला पडला आहे. अर्थात जनता काही दुधखुळी नाही त्यामुळे, राजा हरिश्चंद्राच्या नगरीला कलंक लागला असून तो जनता २०२४ साली पुसून काढेल अशी टिका आता होऊ लागली आहे. मात्र, येणार्या काळात फक्त नारळ फोडण्याचा उपक्रम पहायला मिळेल आणि सत्ता गेल्याने कामे प्रलंबित राहिले असे ऐकायला मिळेल यात तिळमात्र शंका नाही.
क्रमश: भाग - 5