पुन्हा लव जिहादच्या संशयाने तरुणास मारहाण, माझे नाव अमन शेख पण मी मुस्लिम नाही, हिंदू आहे.! पोलिसांची कारवाई.!
सार्वभौम (अकोले) :-
माझे नाव अमन शेख आहे पण मी मुस्लिम नाही असे तो जीव तोडून सांगत होता. पण, एकेल तो जमाव कसला? एकीकडे हजारो लोक रस्त्यावर उतरले होते आणि दुसरीकडे मंदीरात तो एका अल्पवयीन मुलीसोबत चाळे करत होता. त्यामुळे, भगवे वस्त्र धारण केलेल्या काही तरुणांनी याची चांगलीच धुलाई केली. दोघांना पोलीस ठाण्यात आणले. मात्र, मुलगी आणि तिच्या कुटुंबियांनी फिर्याद दिली नाही. त्यामुळे त्याच्यावरील विघ्न टळले. पण, अगस्ति ट्रस्टने तक्रार दाखल केल्यानंतर अमन शेखवर कारवाई करण्यात आली. मी शेख आहे पण मी मुस्लिम नाही या वाक्याहून अनेकांचा गोंधळ उडाल्याचे पहायला मिळाले. पण, हा विषय नंतर पोलिसांनी अगदी क्लेअर केला.
अमन हा समशेरपूर येथील तरुण आहे. तो एका मित्राच्या लग्नाला गेला आणि तेथे त्याची ओळख एका आदीवासी विद्यार्थीनीसोबत झाली. जी नुकतीच १२ वी पास झाली होती आणि तिला सीबीएससी पॅटर्ण मधून ७५ टक्के मार्क्स होते तर हा तरुण बेरोजगार होता. पण, दोघांमध्ये प्रेम झाले आणि त्यांच्यात फोनहून चर्चा सुरू झाली. त्यांची पहिली भेट समशेरपूर फाट्यावर आणि दुसरी भेट थेट अगस्ति ऋषींच्या आश्रमात. कदाचित हा जोडाच देवाला मान्य नव्हता. त्यामुळे, त्यांची सुरूवात आणि शेवट एकाच वेळी झाला. पण, हे सगळं जुगाड जमवून देणारा दुसरा तिसरा कोणी नव्हे.! तर उगले नावाचा हिंदु तरुण होतो. स्वत:चा जीव गेला तरी बेहत्तर, पण तो छातीची ढाल करुन अमनच्या पाठीशी अगदी पोलीस ठाण्यातील लॉकअप पर्यंत सोबत होता.
अगस्ति ऋषींच्या मंदीर परिसरात जेव्हा या जोडप्याला पकडले तेव्हा उगले सांगत होता. माझा मित्र मुस्लिम नाही त्यामुळे मी त्याला सपोर्ट करणार. तेव्हा तेथे त्याला देखील चांगला चोप दिला गेला. पण जेव्हा अमन शेख याला विचारले तेव्हा तो देखील म्हणाला, मला मारु नका. माझे नाव शेख असले तरी मी मुस्लिम नाही मी हिंदु आहे. त्यानंतर मात्र तेथील तरुण भांबावून गेले. हा काय प्रकार आहे? हे त्यांच्या समजण्यापलिकडे होते. पण, तरी देखील जमावाने त्याला चोप दिला आणि थेट पोलीसांना माहिती दिली. पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या जोडप्यास ताब्यात घेतले आणि नंतर दोघांच्या पालकांना बोलावून घेतले.
मी हिंदू आणि माझा मुलगी हिंदूच.!
जेव्हा आमची आई आली तेव्हा तीने सांगितले. गेल्या काही वर्षापुर्वी माझा प्रेम विवाह हा एका मुस्लिम तरुणाशी झाला होता. थोडे दिवस आमचा संसार चांगला झाला. मात्र, नंतर आमचे पटले नाही. त्यामुळे आम्ही एकमेकांपासून विभक्त झालो. त्यापुर्वी मला हा मुलगा झाला होता त्यामुळे त्याचे नाव अमन शेख आहे. आता आम्ही मायलेक गेल्या काही वर्षांपासून वेगळे राहतो. अमन याच्यावर माझ्या जातीचे संस्कार आहे. तो एक माळकरी असून जी पुजापाठ मी देवांची करते तो देखील तीच करतो. पण, आज असा दिवस उजडेल याची कल्पना नव्हती. मात्र, मी देखील हिंदु आणि माझा मुलगा देखील हिंदू आहे असे त्या माऊलीने सांगितले. त्याने चुक केली असेल त्याला माफ करा पण जात आणि धर्मावर जाऊन त्याचे आयुष्य बरबाद करु नका. तो पुन्हा कोण्या मुलीच्या वाटेवर जाणार नाही.
..तर आई ऍटॅक येऊन मरेल.!
संबंधित मुलगी ही शिक्षणासाठी इगतपुरी येथे होती. बारावीची परिक्षा झाल्यानंतर ती नवलेवाडी येथे मामाकडे आली होती. १२ वी सीबीएससीतून चांगले मार्क मिळाल्यामुळे तिला अकोले शहरात क्लास लावायचे होते. त्या क्लासचे पैसे देण्यासाठी मुलीची आई रोज लोकांच्या बांधावर जाऊन रोजंदारी करते आणि पै-पै जमवून मुलीच्या ट्युशनला पैसा जमा करते आहे. कारण, गेल्या काही वर्षापुर्वी तिचे कुंकू हरपले आहे. मुलगा संगमनेरला शिकतोय आणि त्याचे चुलते नेव्हीत चांगल्या पोष्टवर आहेत. जे भयानक आयुष्य त्या माऊलीच्या वाट्यला आले ते मुलांच्या पदरी पडू नये म्हणून एक दिवस देखील खाडा न करता ती मजुरी करून मुलांचे शिक्षण पुर्ण करत आहे. तिला तिच्या मुलीवर फार गर्व असून तितकाच विश्वास देखील आहे. त्यामुळे, तिच्या आईला जेव्हा हा प्रकार कळेल तेव्हा तिला ऍटॅक येऊन ती मरेल असे मुलीच्या मामीने सांगितले. त्यामुळे, हा मॅटर नातेवाईकांनी सलोख्याने मिटवून घेतला. यावेळी गुन्हा दाखल करण्यास हिंदुत्ववादी तरुणांनी त्यांच्यावर प्रचंड दबाव आणला. पण, मुलगी व नातेवाईक त्यांच्या मतावर ठाम होते.
तरुणांनी समाजभान ठेवावे.!
एकीकडे लव जिहादला विरोध म्हणून संगमनेरात भगवे वादळ रौद्र रुप धारण करीत होते. हिंदु-मुस्लिम तेढ निर्माण होऊ नये म्हणून मौलवी आणि पुजारी सलोखा टिकविण्याचा प्रयत्न करीत होते, प्रशासन दोघांच्या मध्यस्तीने सामोपचाराचा मार्ग काढत होते आणि अशा वेळी कोतुळमध्ये एक मुस्लिम तरुण घरात मुलीवर अत्याचार करीत होते. तर, एकीकडे हजारो-लोखांचा मोर्चा भर उन्हात रस्त्यावर उतरला होता आणि त्याच वेळी अगस्ति ऋषींच्या आश्रमात शेख नावाचा तरुण अल्पवयीन मुलीशी अश्लिल चाळे करीत होता. त्यामुळे, या तरुणांना समाजभान आहे का? आपण कोणते कृत्य कधी करतो आणि कोठे करतो आहे. आपल्या कृत्याचा आपल्या समाजावर काय विपरीत परिणाम होईल हे समजण्याची अक्कल त्यांना नसावी हे मात्र दुर्दैव आहे. त्या मुर्ख व्यक्तींमुळे समाजात चांगली लोक आहेत जे प्रतिष्ठीत आणि धर्मनिर्पेक्ष आहेत अशा लोकांना अक्षरश: खाली पहाण्याची वेळ येते आणि जणू आपणच गुन्हेगार आहोत की काय अशी मानसिकता होते. त्यामुळे, मुलांनी कोणतेही कृत्य करताना समाजभान ठेवले पाहिजे.
धर्म असे काही शिकवत नाही.!
गेल्या काही दिवसांपासून लव जिहाद या शब्दाने काहुर माजविला आहे. त्यामुळे हिंदु-मुस्लिम समाजात प्रचंड तेढ निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे. पण, खरोखर जी काही प्रकरणे घडत आहेत त्यास लव जिहाद म्हणावे का? याची देखील शहनिशा करणे आवश्यक आहे. पण हिंदुत्वाच्या नावाखाली अगदी शालेय मुले, कॉलेजचे तरुण हाती दगड घेऊन स्वत:चे करिअर बरबाद करताना दिसत आहेत हे चित्र त्याहून अधिक विदारक आहे. ज्यांची आयुष्य सरले संसार उभे राहिले त्यांना राजकीय भविष्याचे पडले आहे. पण, तरुणांनी याचे बळी न पडता शिक्षण, नोकरी आणि भविष्याचा विचार केला पाहिजे. कारण, कालच्या दंगलीत जे कोणी सीसीटीव्हीत दिसले आहेत त्यांचा शोध पोलीस घेत असून आज या मुलांना दडून बसण्याची वेळ आली आहे. कोणताही धर्म सांगत नाही दंगली करा, पेटवा, तोडा, फोडा, दगडी फेका. पण, संधीसाधू राजकारणी मात्र जाती धर्माच्या नावाखाली तरुणांचा वापर करुन घेत आहेत. त्यामुळे, धर्माचे वाचन करा आणि शंभर टक्के त्याचे अनुकरण करा. कारण, धर्म जगायला शिकवतो, गुन्हेगार व्हायला मुळीच नाही.!
समनापुर येथे काल दगडफेक झाली होती. याप्रकरणी इस्माईल फकीर मोहम्मद शेख यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यात 25 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात म्हटले आहे की. 20 ते 25 मुले भगवे झेंडे व भगव्या टोप्या घालून दुचाकीवर आले होते. त्यांनी फिर्यादीच्या घरासमोर येऊन दगडफेक केली आणि घोषणा दिल्या होत्या. तसेच दगडफेक करणाऱ्यांनी घरात घुसून नुकसान केले. फिर्यादीच्या तोंडावर लोखंडी रॉड मारल्याने त्यांचे चार दात तुटले. आरोपींनी यांच्या घराजवळ राहणारे फकीर मोहम्मद शेख यांच्या घरावरील करून घरासमोरील दुचाकीचे नुकसान केले. तसेच अन्य दोन घरांवर दगडफेक केली. याप्रकरणी पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी समनापूर येथे जाऊन तपास करुन आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले होते.
त्यानंतर तपासात काही नावे निष्पन्न झाली. त्यात उज्वल सोपान घोलप, शुभम बाळासाहेब कडू, तनुज शरद कडू, ऋषिकेश शरद घोलप, महेश विजय कडू (सर्व रा. पाथरे, ता. राहाता), दत्तात्रय संपत थोरात, आबासाहेब शिवराम थोरात, सुनील बाबासाहेब थोरात, ललित अनिल थोरात, प्रमोद संजय थोरात, सत्यम भाऊसाहेब थोरात (सर्व रा. वडगाव पान, ता. संगमनेर), भाऊसाहेब यादव जोंधळे, विकास अण्णासाहेब जोंधळे, अविराज आनंद जोंधळे (सर्व रा. कोकणगाव, ता. संगमनेर) कुणाल ईश्वर काळे, करण ज्ञानेश्वर काळे (दोघे रा. माळेगाव हवेली, ता. संगमनेर) व वैभव रंगनाथ बिडवे (रा. मनोली, ता. संगमनेर) यांना अटक करण्यात आले आहे. या सर्वांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.