विनय सावंत यांच्यावर हल्ला, मा. सरपंच देशमुख यांना जातीवाचक शिविगाळ, ऍट्रॉसिटी दाखल.! राजुरचे घाणेरडे राजकारण.!

   

 सार्वभौम (अकोले) :-

      अकोले तालुक्याच्या राजकारणाला यत्किंचितही संस्कृती राहिली नाही आणि येथील समाज व्यवस्थेला संस्काराचा लवलेश राहिला नाही. शुल्लक करणांहुन वादंग आणि जातीयवाद होऊन सामाजिक वातावरण दुषित होऊ लागले आहे. कारण, राजुर येथील किरकोळ रस्त्याचा वाद थेट एकमेकांच्या कॉलरपर्यंत केला आणि त्यास जातीचे स्वरुप आले. त्यामुळे, विनय सावंत यांनी राजुरचे माजी सरपंच गणपत देशमुख यांच्यावर जीवघेणा हल्ला आणि देशमुख यांनी सावंत यांच्यावर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे, हे दोन्ही व्यक्ती सामाजिक क्षेत्रातील असून त्यांचे समाजासाठी योगदान देखील आहे. मात्र, दोन्ही राजकीय आणि वैचारिकदृष्ट्या विभिन्न पक्षाचे असल्याने हा वाद अधिक चिघळल्याचे आपल्याला पहायला मिळते. मात्र, शांततापुर्ण राजुरच्या इतिहासाला हे घातक असल्याच्या प्रतिक्रिया आता उमटु लागल्या आहेत.

याप्रकरणी विनय सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. की, राजुर येथील बांडे चाळ येथे आरसीसी रोडचे काम सुरू होते. तेथे ठेकेदार देखील आलेले होते. याच दरम्यान तेथे माजी सरपंच गणपत एकनाथ देशमुख हे देखील आले आणि आरडाओरड करीत म्हणाले. की, मी हे काम होऊ देणार नाही. तेव्हा देशमुख यांनी मद्य प्राषण केलेले असल्याने मी घरात बसून होतो. मात्र, मला पाहताच त्यांनी माझ्या घरात प्रवेश केला आणि माझी गच्ची पकडून मला शिविगाळ दमदाटी करु लागला. मी तुला आता जिवंत सोडत नाही असे म्हणून धक्काबुक्की केली. तर, कॉलर धरुन त्यांने खाली पाडले, रस्त्यावर पडलेला दगड हा माझ्या डोक्यात टाकणार तोच मी बाजुला झालो. परंतु, पुन्हा दगड घेऊन ते माझ्या पाठीमागे आले आणि म्हणाले. की, तुझा मेंदु आज बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. मात्र, याच वेळी तेथे उपस्थित असणारे राहुल वरे आणि गोरख लहामगे यांनी देशमुख यास पकडून मागे नेले असे सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

तर, गणपत देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. की, मी २०२२ पासून ग्रामपंचायत राजूर येथे सदस्य म्हणून कार्यरत असून तेथील माजी सरपंच आहे. वॉर्ड क्र. सहा मध्ये जेव्हा-जेव्हा कामास सुरूवात झाली तेव्हा-तेव्हा सावंत हे कामास विरोध करीत असतात. त्यांना अनेकांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते कोणाचे एकत नाहीत. दि. २० जून २०२३ रोजी सकाळी १० वाजता बांडे चाळ येथे काम सुरू होते. तेव्हा मी पहाणी करण्यासाठी गेलो होतो. तेव्हा सावंत म्हणाले. की, तुझा या कामाशी काय संबंध आहे? तेव्हा सावंत यांनी मला जातीवाचक शब्द वापरुन तुम्ही झापावरच रहायचे, गावात राजकारण करायचे नाही असे म्हणत धक्काबुक्की केली. तुझे तंगडे मोडून हातात देईल, आम्हाला कसे काम करायचे आम्ही करुन घेऊ, तालुक्याचा आमदार मी केला आहे, तुझ्याकडे माझे काय वाकडे होणार आहे असे म्हणत दमदाटी केली असे गणपत देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

खरंतर, देशमुख हे वॉर्ड क्र. ६ चे सदस्य आहेत. संबंधित काम हे त्याच वॉर्डत चालु असल्यामुळे, त्यांना न सांगता किंवा त्यांना डावालुन एखाद्या ठेकेदाराने काम करणे हे मुळात लोकशाहीला अपेक्षित नाही. त्यामुळे, त्यांनी तेथे रोष व्यक्त करणे हे सहाजिक आहे. तर, दुसरीकडे सावंत हे खरोखर जातीवाचक शिविगाळ करु शकतात का? याची पोलिसांनी पुरावे शोधून कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे. अन त्यांनी तसे जातीवाचक शब्द वापरले नसतील तर ऍटॉसिटीचा गैरवापर करणार्‍यांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे. हे काम सपोनी गणेश इंगळे साहेब हे चोख पार पाडतील यात तिळमात्र शंका नाही. मात्र, या सगळ्यात एक बाकी नक्की. ते असे की, देशाला, राज्याला आणि अगदी अकोले तालुक्याला जात आणि धर्माचे गालबोट लागले आहे. तसाच कलंक म्हणून जातीयवादाचे गालबोट राजुरला लागणे चुकीचे आहे.