अकोल्यात चोरट्यांच्या मारहाणीत एकाची हत्या, अर्धनग्न चोरटे घरात घुसले, हाती लागले फक्त बेन्टेक्सचे सोने, कोयत्याने वार केले, गुन्हा दाखल.!
सार्वभौम (राजूर) :-
अकोले तालुक्यातील राजूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असणाऱ्या वाकी परिसरात चोरट्यांच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा खुन झाल्याची धक्कादायक घटना आज पहाटे 1:00 वाजण्याच्या सुमारास घडली. तिन चोरट्यांनी कोयता हाती घेऊन घरात प्रवेश केला आणि घरातील पती-पत्नीस बेदम मारहाण केली. यात मधुकर किसन सगभोर (रा. वाकी, ता. अकोले) यांचा जागीच मृत्यु झाला आहे. तर, अर्धनग्न आवस्थेत आलेल्या चोरट्यांना घरात एक रुपया देखील सापडा नाही. मात्र, बेन्टेक्सच्या बांगड्या आणि हार असा दोनशे रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. मधुकर यांना मारहाण करत असताना त्यांची पत्नी सोडविण्यास गेली असता तिला देखील चांगलाच मार लागला आहे. तर, मुलांनी आई वडिलांकडे धाव घेतली असता त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. काहीच हाती न लागल्याने चोरटे पसार झाले. मात्र, यात एकाचा जीव गेला आहे. त्यामुळे, आज सायंकाळी पायल सगभोर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही लवकरच आरोपींना बेड्या ठोकू असे अश्वासन सहा. पोलीस निरिक्षक गणेश इंगळे यांनी व्यक्त केले आहे. त्यासाठी त्यांनी काही पथकांची नेमणूक केली असून काही व्यक्ती त्यांच्या रडारवर आहेत.
याबाबत फिर्यादीत दिलेली माहिती अशी. की, दि. 08 मे 2023 रोजी सकाळी 07.30 वा. चे सुमारास सगभोर कुटुंब झोपेतून उठले होते. त्या दिवशी त्यांना हिलम व्यक्तीकडून जनावरांच्या चाऱ्याचा पेंढा विकत घ्यायचा होता. मात्र, घरात पैशाच्या कारणाहून पुष्पा आणि मधुकर या दाम्पत्याचे भांडणे झाले होते. मात्र, ते शेजारच्या आजी पुनाबाई यांनी सोडविले होते. त्यानंतर मयत व्यक्तीचा मुलगा आदित्य व पत्नी पुष्पा तसेच पायल हे पेंढा आनण्यासाठी गेले आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने ते घेऊन आले. तेव्हा मयत मधुकर हे काम करण्यासाठी आले नाही. मात्र, ते दारु पिण्यास गेले होते. या दरम्यान मधुकर सगभोर यांनी दारु पिण्यासाठी त्यांचा मुलगा आदित्य याचेकडे दारु पिण्यास 200 रुपये मागितले होते. मात्र, त्याने पैसे न दिल्याने त्याच्या वडीलांनी आदित्यला लाथाबुक्यांनी मारहाण केली. तेव्हा मोठ्या कसोशिने आदित्याला तेथील कुटुंबातिल व्यक्तींनी सोडविले होते. तेव्हा रागात मयत मधुकर हे घरी गेले आणि घराला कुलुप लावुन ती चावी त्यांची मुलगी पायल हिच्याकडे देऊन ते ट्रॅक्टरजवळ जावुन झोपी गेले.
दरम्यान, पुढे फिर्यादीत म्हटले आहे. की, जरावेळाने मद्यपी मधुकर सगभोर हे उठून घरी आले. तेव्हा, त्यांची मुलगी व पत्नी हे घरातील स्वयंपाक व इतर कामे करत होते. तेव्हा मधुकर हे घरात आले, वाकडी तिकडी बडबड केली आणि ते घरात झोपी गेले. घरातील सर्वांनी जेवण केले मात्र, मधुकर यांनी जेवन न करता झोपणे पसंत केले. त्यावेळी, घराच्या मागच्या खोलीत मुलगी पायल, झोपली आणि बाहेर लावलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये तिचा भाऊ आणि मावशीची दोन मुले झोपले होते तर मधुकर सगभोर यांची पत्नी पुष्पा ही त्यांच्याच खोलीत झोपली होती. दि. 09 मे 2023 रोजी रात्री 01.00 वा. चे सुमारास पुष्पा हीचा अचानक मोठ्याने ओरडल्याचा आवाज आल्याने मुलगी पायल उठुन पुढे आली. तेव्हा तिने पाहिले. की, एका माणसाने राखाडी रंगाची पॅन्ट, राखाडी रंगाचे लाल पट्टे असलेले बनियन व तोंडास रुमाल बांधलेला होता. त्याच्या हातात कोयता घेवुन तो घरात असलेल्या कपाटातील सामानाची उचकापाचक करत होता. तर, दुसऱ्या दोन मानसांपैकी एकाने आकाशी रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट व तोडांला रुमाल बांधलेला होता. दुसऱ्याने अंगात राखाडी रंगाची पॅन्ट, अंगात कमरेपर्यंत अर्धनग्न व शरिराने सडपातळ होता. यातील एकजण पुष्पा हिचे जवळ उभा होता तर एकजन त्यांना मारहाण करत होता.
दरम्यान, हे सर्व चित्र पाहून मुलगी पायल मोठ्या धाडसाने तिच्या आईजवळ गेले. तेव्हा चोरटे म्हणाले की आम्ही तुम्हाला काही करत नाही. तुम्ही गप्प उभे रहा, असे म्हणुन त्यांनी दोघींना एका कोपऱ्यात उभे केले. तेव्हा चोरट्यांपैकी एक मानुस हा घराच्या खिडकीजवळ जावुन बाहेर ट्रॉलीत झोपलेल्या तिघांना दम देत होता. तेथेच उभे रहा नाहीतर तेथे येवून मारुन टाकील. त्यामुळे ते तेथेच ट्रॉलीत उभे होते. चोरट्यांपैकी एकजन कपाट व शोकेशची उचकापाचक करत होता. शोकेशमध्ये ठेवलेले बेनटेक्सचे हार व बांगड्यांची पिशवी घेतली व म्हणाले की आणखी कोठे माल ठेवला आहे? अशी दमदाटी करत घरातील साहित्याची उचकापाचक केली. तसेच घरातील मोबाईल फोन फेकुन देत त्याचे नुकसान केले. त्यांना काही जास्त न मिळाल्याने ते तिघेही घराच्या मागच्या दाराने निघाले. तेव्हा त्यांनी दम दिला की तुम्ही आरडा ओरडा केला तर आम्ही पुन्हा येऊ असे म्हणून निघुन गेले. त्यानंतर घरातील लोक मधुकर यांचे जवळ गेले असता त्यांच्या गालातुन रक्त आल्याचे दिसले. मात्र, त्यांची काही एक हलचाल होत नव्हती. यात पुष्पा यांना देखील फार लागले होते. त्यामुळे, त्यांना दवाखाण्यात हलविले होते. त्यानंतर लक्षात आले. की, मधुकर सगभोर यांचा मृत्यु झाला आहे. त्यानंतर राजूर पोलीस ठाण्यात तिन अज्ञात चोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.