संगमनेर कारखान्याचे व्हा.चेअरमन आणि भाजपाचे युवा अध्यक्ष यांच्यात ग्रामसभेत झक्कडपक्कड.! तिघांवर गुन्हा दाखल.!
सार्वभौम (संगमनेर) :-
माहितीचा अधिकार टाकून माहिती मागितली असता राजापूर ग्रामपंचायतीच्या सभेत कॉंग्रेस आणि भाजपा यांच्यात तुफान राडा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात कॉंग्रेसचे तथा भाऊसाहेब संतुजी थोरात साखर कारखाना संगमनेरचे व्हा-चेअरमन संतोष रखमा हासे यांची धिटाई पहायला मिळाली. तु कशाला माहिती अधिकाराचा अर्ज टाकतो आणि कशासाठी तुला माहिती हवी आहे? याला माहिती देऊ नका असे म्हणून कॉंग्रेसच्या तिघांनी भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष संदेश बाळासाहेब देशमुख (रा. राजापूर, ता. संगमनेर) यांना शिविगाळ दमदाटी करीत ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तिघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, राजापुर येथे नव्याने ग्रामपंचायत बांधण्यात आली आहे. त्यात अफरातफर झाल्याची शंका तेथील काही ग्रामस्तांना आहे. त्यांनी याबाबत भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष संदेश देशमुख याच्याकडे तक्रार केली होती. देशमुख हे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करीत असल्यामुळे त्यांनी राजापुर ग्रामपंचायतीकडे माहिती अधिकाराच्या माध्यामातून काही माहिती मागविली होती. हे काम कोणत्या निधीतून केले आहे, त्यासाठी किती खर्च आला आहे, एकूण खर्चाचे विवरण कशा पद्धतीने असे काही अन्य प्रश्न होते. मात्र, काही दिवस उलटून गेले तरी देखील देशमुख यांना माहिती दिली गेली नाही. त्यामुळे, यात खरोखर काही गौडबंगाल आहे का? याबाबत राजापुरमध्ये तर्क वितर्क सुरू होते.
दरम्यान, दि. ४ मे २०२३ रोजी सकाळी विठाई मंगलकार्यालय राजापुर येथे गावची ग्रामसभा भरली होती. तेव्हा अन्य काही विषयांवर चर्चा झाली आणि नंतर १२ वाजण्याच्या सुमारास देशमुख यांनी ग्रामसेवक यांना माहिती अधिकाराबाबत प्रश्न विचारले. नियमानुसार त्याचे उत्तर देणे हे ग्रामसेवक यांना बंधनकारक होते. मात्र, तेव्हा अधिकार्याऐवजी व्हा-चेअरमन संतोष हासे, विठ्ठल रखमा हासे आणि विशाल विठ्ठल हासे या तिघांनी देशमुख यांना विरोध सुरू केला. तुला माहिती कशासाठी लागते? आम्ही तुम्हाला माहिती देऊ शकत नाही, असे म्हणत तिघांनी देशमुख यांना शिवीगाळ, दमदाटी करीत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे, काही काळ वातावरण चांगलेच तापले होते. मात्र, गावातील काही समझदार व्यक्तींनी यात मध्यस्ती करीत या वादावर पडदा टाकला. मात्र, नंतर देशमुख यांनी तिघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
खरंतर, कर नाही त्याला डर कशाला अशा प्रकारे कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी भ्रष्टाचाराला विरोध केला आहे. त्यामुळे, जर माहिती अधिकार कोणी टाकला असेल तर त्याला उत्तर देणे प्रशासन परिस्थिीतीनिहाय बंधनकारक आहे. त्यामुळे, ग्रामसेवक यांनी याचे उत्तर का दिले नाही? याची बिडीओ साहेबांनी चौकशी करणे गरजेचे आहे. कारण, वादाचे मुळ कारण माहिती न मिळणे आहे. तर, दुसरीकडे शांत, संयमी, पारदर्शी कारभार करणार्या आ. बाळासाहेब थोरात यांनी आपला विश्वासू म्हणून संतोष हासे यांना व्हा.चेअरमन केले आहे. मात्र, त्यांच्याकडून जर ग्रामस्तांना शिविगाळ आणि ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जात असतील. तर, अर्थातच थोरात साहेबांच्या विश्वासाला हा तडा गेल्यासारखे आहे. त्यामुळे, शेजारीच्या नेत्यांना टिका टिपण्णी करायला जागा भेटते. त्यामुळे, नेत्याच्या राजकारणाचे प्रतिबिंब कार्यकर्त्यांवर पडेल अशी अशा ठेवली पाहिजी असे मत जाणकार मंडळींनी व्यक्त केले आहे.