वा रं गड्या! 12 वी पास अन थाटला दवाखाना.! रुग्णांच्या जिवाशी खेळला, भाईंच्या बर्थडेला शिबिर लावले अन बिंग फुटले.! बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल,

 

सार्वभौम (संगमनेर) :- 

               संगमनेर शहरात एक बोगस डॉक्टर वैद्यकीय अभ्यासक्रमाची पदवी न घेता. तसेच कोणत्याही वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी न करता. बोगस डॉक्टर नाव लाऊन बेकायदा पध्दतीने नैसर्गिक उपचारा करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दि.10 एप्रिल 2023 पासुन ते 19 मे 2023 रोजी ही बाब प्रशासनाच्या लक्षात आली त्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा कचकुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी जावेद आयुब शेख (रा.नवरंग कॉम्प्लेक्स बागवानपुरा, संगमनेर) याच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महाले करत आहे. संगमनेरात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर आरोग्य विभागाचा कोणताही अंकुश नसुन वैद्यकीय शिक्षण नसताना ही बोगस डॉक्टर नाव लावुन तालुक्यात दवाखाने उघडत रुग्णांना उपचार करत आहेत. त्यामुळे, या डॉक्टरांमुळे रुग्णांचे आरोग्यच धोक्यात आले असुन चुकीच्या उपचारांमुळे एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे वेळीच आशा डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे. मात्र, तक्रार आल्यानंतरच आरोग्य विभागाकडून कारवाईची पाऊले उचलली जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

        याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरोपी जावेद शेख बोगस डॉक्टरने नुकतेच मोठेपद मिळवलेल्या "दादा"च्या वाढदिवसानिमित्त मागील वर्षी मोफत आरोग्य शिबीर भरवले होते.  त्या डॉक्टरची पदवी ही बोगस आहे. हे एका सामाजिक कार्यकर्त्याच्या लक्षात आले. या सामाजिक कार्यकर्त्याने ही बाब संगमनेर नगरपालिकेचे मुख्यअधिकारी यांच्या लक्षात आणुन दिले. बोगस डॉक्टर शोध समितीचे नगरपालिका कार्यक्षेत्रात अध्यक्ष हे मुख्य अधिकारी असतात. त्यामुळे, त्यांनी नगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी यांना चौकशी करण्याचे आदेश दिले.

        दरम्यान, तालुका आरोग्य अधिकारी यांना लक्ष घालायला सांगितले. त्यानुसार नगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी प्रतिभा कचकुरे यांनी व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी प्रत्यक्ष हॉस्पिटलला जाऊन चौकशी केली व कागदपत्रे ताब्यात घेतले. या बोगस डॉक्टर शोध समितीच्या चौकशी अंती असे निष्पन्न झाले महाराष्ट्र राज्यामध्ये मान्यताप्राप्त कोणत्याही वैद्यकीय पदवी आणि वैद्यकीय परिषदेची नोंदणी नसताना देखील हा बोगस डॉक्टर राजरोस पणे वैद्यकीय व्यवसाय निसर्ग उपचाराच्या नावाखाली गोरख धंदा करत होता. आणि स्वतः डॉक्टर असल्याचे भासवुन लोकांची व प्रशासनाची फसवणूक करत आहे. ही बाब लक्षात येताच तालुका आरोग्य अधिकारी व नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी यांनी थेट कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित असताना कागदाचा सारीपाट मांडला. वेळ काढु भुमिका घेऊन वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय यांनी ही कारवाई करावी असे पत्र दिले. त्यानंतर, या पत्राला उत्तर वैद्यकीय अधीक्षक यांनी थेट मुख्याधिकारी यांना पत्र लिहुन बोगस डॉक्टर शोध समिती त्याची कर्तव्य, कार्यकक्षा याची जाणीव करून तालुका आरोग्य अधिकारी यांच्या पत्रव्यवहाराच्या खेळावरच आक्षेप घेतला.         

दरम्यान, मुख्यअधिकारी यांच्याकडे अहवाल सादर झाला. त्यांच्या असे लक्षात आले की, आरोपी जावेद शेख याच्याकडे डॉक्टरकीची बोगस पदवी आहे. याने अनेकांना चुना लावला आहे. मुख्याधिकारी यांनी वैद्यकीय अधिकारी व सचिव बोगस डॉक्टर शोध समिती संगमनेर नगरपालिका यांनी या ठगावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर, संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. खरंतर, केंद्र शासन आणि सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानुसार वैद्यकीय प्रवेशासाठी NEET सारखी अत्यंत अवघड परीक्षा उत्तीर्ण होणे अत्यावश्यक असताना कला शाखेतून बारावीचा विद्यार्थी वैद्यकीय व्यवसाय कसा करू शकतो हे एक अनाकलनीय कोडे आहे आणि अश्या प्रवृत्तींना राजकीय पाठबळ मिळत असते ही शोकांतिका आहे. 

याचप्रमाणे 2007 साली संगमनेर शहरात दाखल झालेल्या बोगस डॉक्टरांच्या केस मध्ये आरोपी असलेले तीन बोगस डॉक्टर आजमितीला सबळ पुराव्यामुळे निर्दोष सुटले आहे. ते आता वैद्यकीय शिक्षण घेऊन उजळमाथ्याने डॉक्टर होऊन आपले हॉस्पिटल चालवत आहेत. काही ग्रामीण भागात बोगस डॉक्टर वैद्यकीय व्यवसाय करतात. यांनी डॉक्टर असल्याचे फसवुन खऱ्या डॉक्टर महिले बोरोबर लग्न केले आहे. असे ही फसवणारे डॉक्टर संगमनेरात कमी नाही.