जोर्वे नाक्याचा श्‍वास मोकळा.! १५० पैकी फक्त १६ जण अटक, पत्रकार व मौलानास मारहण, दोघे तटस्थ.! पोलिसांनी अजून किती मार खायचा.!

 

सार्वभौम (संगमनेर) :-

जोर्वे नाक्यावर जो काही राडा झाला त्यानंतर पोलीस आणि नगरपालिकेला जाग आली. जोर्वे, निंबाळे, वाघापूर, रायते अशा अनेक गावांनी जोर्वे नाक्यावरील अतिक्रमण हटविण्याचा ठराव करुन प्रशासनाकडे मागणी केली होती. त्यात अनेक गंभीर प्रश्‍न उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे, महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घातले आणि जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांना आदेश करुन तत्काळ कारवाई करण्यास सांगितली. त्यानंतर मोठ्या पोलीस बळाचा ताफा जोर्वे नाक्यावर गेला आणि त्यांनी अतिक्रमण काढले. यावर माध्यमांमध्ये फार उलट सुलट चर्चा सुरु होती. एकीकडे समाधान व्यक्त केले गेले. तर, ठराविक लोकांनाच त्रास देऊन सुड बुद्धीने ही कारवाई केली जात आहे. अतिक्रमण फक्त जोर्वे नाक्यावरच आहे का? असा प्रश्‍न उपस्थित करुन अनेकांनी कारवाईवर बोट ठेवले. मात्र, सर्वाच्या आरोप प्रत्यारोपाकडे दुर्लक्ष करीत वरिष्ठांच्या आदेशामुळे प्रशासनाने घाई करून जोर्वे नाक्याचा श्‍वास मोकळा केला.        

१६ अटक बाकी गेले गावाला.!

गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी दोन दिवसात फक्त 16 जणांना अटक केेली आहे. एकूण 150 आरोपी त्यात १६ जण ताब्यात आहेत. म्हणजे, या घटनेत पोलिसांची इच्छा असली तर जास्तीत जास्त 10 जणांची नावे पुढे येतील. यातील 134 आरोपी हे मोकाट राहतील. जोवर हे वातावरण टिकूण आहे. तोवर कोंबिंग ऑपरेशन होतील. पथके रवाना होतील आणि नंतर नावे वगळ्यासाठी मलिदा वाटप होईल ह्या गोष्टी आता वर्दीला काही नव्या नाहीत. त्यामुळे, या गुन्ह्यातील बहुतांशी आरोपी हे संगमनेर सोडून पसार झाले आहेत. ते नेहमीप्रमाणे सर्व वातावरण निवाळल्यानंतर दुसरा गुन्हा करण्यासाठी सज्ज होतील. तोवर पोलिसांचा गुन्हा दोषारोप दाखल होऊन देखील कायम तपासावर राहिल. आता या गुन्ह्यात नईम कादर शेख, रेहान गुलाफाज पठाण, शेहबाज गफार शेख, आदत सय्यद अन्सार शेह बाज याकुब शेख, मोबीन मुबारक शेख, अमीर रफिक शेख आणि शेख इमरान दुश्मन पठाण, अल्ताफ मुस्तफा अन्सारी, सलमान साजिद शेख, अहमद गुलाब नबी शेख, शकील नासीर पठाण, तोफिक आबू जर बिलाल शेख, शफीक शेख वइस्माईल, निसार पठाण अशा १६ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांना चार दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे.  

सगळेच अतिक्रमण काढा की.!

आपला तो बाबुराव आणि दुसर्‍याचा तो बाब्या अशा पद्धतीने अनेकदा संगमनेर प्रशासनाकडून कारवाया झाल्याचे पहायला मिळाले आहे. काल जोर्वे नाक्यावर वाद झाला आणि अचानक तेथील लोकांचे अतिक्रमण काढले गेले. मुळात अतिक्रमणाचे समर्थन नाहीच.! पण, काढायचे तर संगमनेरात असणारे सर्वच अतिक्रमण का काढण्याचे धाडस प्रशासन करत नाही. कत्तलखाने जमिनदोस्त करायचे त्यासाठी दिवसरात्र आंदोलने करायची तेव्हा प्रशासनाला जाग येणार, अतिक्रमणे काढायची त्यासाठी कोणीतरी जीव गमवायचा, सशस्त्र मारामार्‍या होऊ द्यायच्या मग अतिक्रमणे काढायची. म्हणजे, पहिला बळी दिल्याशिवाय पालिकेेला किंवा पोलिसांना म्हणा किंवा प्रशासनाला जागच का येत नाही? इतका भोंगळ कारभार वरिष्ठ अधिकारी आणि हे नेते खपवून घेतात तरी कसे? आता या अतिक्रमणात राजकीय रंग येत असला तरी प्रशासन आणि शासन यांनी यावर ठोस भुमिका घेतली पाहिजे.   

पत्रकारावर हल्ला का केला?

जोर्वे नाका येथे जेव्हा ही घटना घडली. तेव्हा वाहन चालक आणि तेथील जमलेला जमाव यांच्यात शाब्दीक चकमक चालु होती. तेव्हा तेथे एक पत्रकार उपस्थित होता. जमावाची दादागिरी पाहून त्याने मोबाईल काढला आणि तो कानाला लावला. कदाचित तो घडलेला प्रकार पुढे वाढु नये म्हणून पोलिसांना फोन करीत असेल. मात्र, तो शुटिंग काढतो आहे असा गैरसमज करुन जोर्वे नाक्यावरील काही तरुणांनी त्यास बेदम मारहाण केली. आमचे पुरावे गोळा करतो काय? असे म्हणून चारदोन कानाखाली वाजविल्या. दुर्दैवाने म्हणा की सुदैवाने तो एका सोशल मीडियाच्या चॅनलचा प्रतिनिधी होता. त्याच्या गळ्यात मोठ्या हौसेने आयकार्ड देखील लावलेले होते. पण, नाव पाहूून त्याच्यावर हाथ उचलला. इतके सगळे झाल्यानंतर तो मोबाईल देखील काढून घेतला आणि त्या पत्रकारास काढून देण्यात आले. आजही तो मोबाईल गायब आहे आणि नवोदीत पत्रकार घरी आहे. असल्या दादागिरीला पोलिसांनी नक्कीच जरब बसविली पाहिजे.

मौलाना यांना मारहाण.!

खरंतर काही निरापराध व्यक्तींना या समाजद्वेशाला बळी जावे लागते. हेतू चांगला असतो. मात्र, मॉब सायकॉलॉजी फार भयानक असते. जेव्हा ही घटना घडली तेव्हा एक व्यक्ती हा प्रकार सोडविण्यासाठी गेला होता. मात्र, तो कोण आहे हे कोणाच्या लक्षात आले नाही. नंतर ते एक मौलाना आहेत अशी माहिती मिळाली. दरम्यान, जेव्हा त्यांना किरकोळ मारहाण झाली त्यानंतर ते पोलीस ठाण्यात देखील गेले होते. मात्र, त्यांनी नंतर गुन्हा दाखल केला नाही. कारण, गुन्हा दाखल करुन प्रश्‍न वाढेल. प्रश्‍न हे मिटले पाहिजे असे म्हणून दोन्ही गटांना एक चांगला संदेश देखील दिला. त्यानंतर हे व्यक्तीमत्व तेथून निघुन थेट आपल्या गावी निघुन गेले. त्यांना ना कोणावर रोष व्यक्त केला ना कोणाला दोष दिला. त्यामुळे, आपण भारतीय नागरिक आहोत, आज भांडलो तरी उद्या एकमेकांना एकमेकांची गरज लागते. रक्ताची गरज पडल्यानंतर कोणी कोणाची जात शोधत नाही. जीव आणि गरज महत्वाची वाटते. त्यामुळे, दोन्ही गटांनी सलोख्याने हा प्रश्‍न मिटवावा अशा मुक संदेश त्यांनी दिला आणि या जातीय व समाजद्वेषी वातावरणातून ते बाहेर पडले.

पोलिसांनी अजून किती मार खायचा?

राज्यात जितके हाल्ले पोलिसांवर होत असतील, तितके हाल्ले एकट्या संगमनेरात होत असतील. म्हणजे, पोलिसांना देखील पळुन लावण्याचे धाडस आणि त्यांच्यावर हात उचलण्याची ताकद संगमनेरच्या काही नागरिकांमध्ये आहे. अगदी वर्षापुर्वी दिल्लीनाका येथे पोलिसांचे काय हाल झाले होते. ह्या जखमा अजून ताज्या असताना काल देखील पोलिसांवर दगडफेक झाली. पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला म्हणजे संगमनेरात कायदा व सुव्यवस्था आहे का? की संगमनेर म्हणजे बिहार किंवा पाकीस्तान आहे? खरंतर तत्कालिन पीआय मुकुंद देशमुख गेल्यानंतर मथुरे यांची नेमणुक झाली. तेव्हा आल्याआल्या त्यांनी रस्त्यावर उतरुन नव्या नवरीसारखे नऊ दिवस काढले. मात्र, नंतर साहेब रस्त्यावर दिसलेच नाही. त्यांची वाहतुक यंत्रणा बस स्थानकाचे दोन्ही कोपरे सोडले तर शहरात कोठे दिसत नाही. दिल्ली नाका ते सय्यदबाबा चौक आणि पुण्याकडे जोर्वेनाका या ठिकाणी प्रचंड वाहतुक कोंडी होत असते. मात्र, साहेब आणि त्यांची एक टोळी जरा वेगळ्या कामात मग्न आहे. दुर्दैवाने जर जोर्वे नाक्यावर पोलीस असता तर ही घटना घडली नसती. त्यामुळे, या गोष्टीला जबाबदार कोण? असा प्रश्‍न पुढे येतो. तत्कालिन अधिकारी देशमुख यांच्या विरोधात संगमनेरकरांनी एक जंग उभी करुन मथुरे संगमनेरात आणले. पण, गंगाधर काय आणि शक्तीमान काय.! दोघे एकाच माळेचे मनी अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.