पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने डोक्यात पाटा टाकला, पत्नी मयत, पतीला जन्मठेपेची शिक्षा.!
सार्वभौम (संगमनेर) :-
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने घरातील दगडी पाटा तिच्या डोक्यात टाकुन तिचा खुन केल्याची धक्कादायक घटना दि.12 नोव्हेंबर 2018 रोजी संगमनेर तालुक्यातील पठारभागावरील जवळेबाळेश्वर परिसरात घडली होती. हत्या करून आरोपी पसार झाला असता त्याचा शोध घेऊन आरोपी प्रकाश नामदेव धांडे (रा. आंबेवंगण, ता. अकोले) यास पोलीस उपनिरीक्षक योगेश मोहिते यांनी अटक केली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. आज गुरुवार दि. 6 एप्रिल रोजी जिल्हा सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. सरकारी वकील ऍड. मछिंद्र गवते यांचा युक्तिवाद आणि सबळ पुरावे यांच्या आधारे जिल्हा सत्र न्यायाधीश श्री. योगेश मनाठकर यांनी आरोपी प्रकाश धांडे यास जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मयत शांता हिचे काही दिवसांपूर्वी लग्न झाले होते. दोघांमध्ये न पटल्याने दोघे विभक्त झाले. त्यानंतर मयत शांता हिचे लग्न प्रकाश नामदेव धांडे याच्या सोबत जवळेबाळेश्वर मंदिरात दुसरे लग्न लावुन दिले. मयत शांता व आरोपी प्रकाश हे श्रीगोंदा भागात होस्टेलवर काम करत होते. मयत शांताच्या आईला भेटण्यासाठी पती प्रकाश व पत्नी शांता हे शिवडी मुंबई येथे गेले होते. त्यावेळी मयत शांता हिने आपल्या आईला सांगितले की, पती प्रकाश हे माझ्या चारित्र्यवर संशय घेत असुन त्याबाबत मी माझे सासरे व सासु यांना सांगितले असुन तु त्यांना समजावुन सांग. आई मयत शांताच्या सासऱ्याशी बोलते असे बोलुन शांताची समजुत काढते. त्यानंतर रविवार दि. 11 नोव्हेंबर 2018 रोजी मयत शांताच्या बहिणीच्या इथे जवळेबाळेश्वर येथे मयत शांता,आई, मुली सर्व नातलग मुंबई वरून जवळेबाळेश्वर येथे पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास येतात.
दरम्यान, जवळेबाळेश्वर येथे आल्यानंतर सर्वजण घरीच थांबतात. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास आरोपी प्रकाश हा साडुची गाडी घेऊन राजापूर येथील कामाचे राहिलेले पैसे घेऊन येतो असे सांगुन आरोपी प्रकाश हा गाडी घेऊन गेला व संध्याकाळच्या दरम्यान पुन्हा जवळेबाळेश्वर येथे आला. संध्याकाळी सर्वांनी एकत्र बसुन जेवण केले. जेवल्यानंतर सर्वजण झोपण्यासाठी गेले. झोपल्यानंतर मयत शांताची बहीण हिला अचानक जाग आली. तिने रात्री दोन वाजण्याच्या सुमारास पाहिले असता शांता ही एकटीच रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती. तिचा नवरा प्रकाश याने तेथुन धुम ठोकली होती. शांता हिच्या डोक्यात ठीक ठिकाणी जखमा झालेल्या दिसल्या. शांताच्या डोक्या शेजारी घरातील दगडी पाटा पडलेला होता. तो सर्व रक्ताने माखलेला होता. त्यावेळी शांताच्या बहीनेणे गावातील डॉक्टर बोलावला मात्र, तो पर्यंत शांता ही मयत झाली होती.
दरम्यान, हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर मयत शांताच्या आईचा राग अनावर झाला त्यांची तळपायाची आग मस्तकापर्यंत गेली. त्यांनी आपला जावई आरोपी प्रकाश याला पाठीशी न घालता घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर, पोलिसांनी खबरदारी घेऊन घटनास्थळ गाठले. तात्काळ घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. घटनास्थळा वरील भौतीक पुरावे गोळा करून असे अनेक ईव्हीडन्स पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांनी जमा केले. हा खटला 2018 ते 2023 या काळात सुरू राहिला. यामध्ये आठ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. यामध्ये फिर्यादी मयत शांताची आई,मयताची बहीण, वैद्यकीय अधिकारी लोहारे मॅडम,तपास अधिकारी अंबादास भुसारे,पोलीस उपनिरीक्षक योगेश मोहिते यांनी साक्ष महत्वाची ठरली. पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांनी अनेक सबळ पुरावे व परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयात सादर केले होते. त्यांच्या आधारावर जिल्हा सरकारी वकील मछिंद्र गवते यांनी प्रबळ युक्तिवाद करून प्रतिवाद्यांचा युक्तिवाद खोडुन काढला. त्यानंतर दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी प्रकाश नामदेव धांडे (रा.आंबेवंगण,ता. अकोले) यास दहा हजार रुपये दंडासह जन्मठेपेची शिक्षा सुनावली.