मार्केट कमिटीवर भाजपा झेंडा.! लंगडा पॅनल घेऊन महाविकास आघाडी मैदानात.! तोवर नेते काय भाकरी खात होते का? संतप्त सवाल..!!

- सागर शिंदे     

सार्वभौम (अकोले) :- 

अकोले तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक लागली आहे. त्यासाठी राष्ट्रवादी पक्षाने नेतृत्व करीत महाविकास आघाडीचा धर्म पाळला आहे. मात्र, वेळ गेल्यानंतर आता काथ्याकुट सुरू झाला असून लंगडा पॅनल घेऊन महाविकास आघाडी मैदानात उतरली आहे. यात भाजपाच्या तीन जागा आधिच बिनविरोध झाल्या असून बाकी ठिकाणी देखील तुल्यबळ उमेदवार दिसून येत आहे. त्यामुळे, मार्केट कमिटीवर भाजपचीच सत्ता येणार असे मत बिनविरोध निवडून आलेले चक्रधर सदगिर यांनी व्यक्त केले आहे. तर, तीन जागा बिनविरोध होईपर्यंत आमचे नेते काय भाकरी खात होते का? असा सवाल जिल्ह्यातील नेत्यांनी केला आहे. त्यावर अनेकजण निरुत्तर असेल तरी. भाजपला सत्ता स्थापनेसाठी फक्त सहा जागा निवडणुन आणायच्या आहेत. त्यामुळे, त्यांचा विश्‍वास द्विगुणीत झाला आहे. तर यात महत्वाचे म्हणजे, ज्यांच्याकडे पुर्वी सभापती म्हणून कारभार होता. त्यांनी या निवडणुकीत अक्षरश: हात वर केल्याचे दिसते आहे. केवळ हजेरी लावून बघ्याची भुमीका घेतल्यामुळे महाविकास आघाडीवर हा पर्वत कोसळल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.

खरंतर तहाण लागली की झरा खोदायचा अशा प्रकारची मानसिकता कधीच विजयाकडे जात नाही. त्यामुळे, अक्षरश: तीन जागा बिनविरोध झाल्यानंतर महाविकास आघाडीला जाग आल्याचे पहायला मिळाले. भाजपाने आपली योग्यती रणनिती आखली आणि आता विजयाप्रत ते पोहचल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेना, रिपाई, शेतकरी संघटना असे अनेक पक्ष एकत्र असून देखील यांना उमेदवार मिळत नाही. म्हणजे यांच्या भविष्याचे वेध लक्षात घेण्याजोगे आहे. खरंतर चक्रधर सदगिर यांचे वडील भिमाजीकृष्णाजी यांनी कायम पिचड साहेबांच्या विरोधात निवडणुक लढविली. ते १० वर्षे दुधसंघावर संचालक तर एक वेळा पंचायत समितीवर सदस्य होते. त्यांच्या नंतर मात्र, चक्रधर यांनी वैभवराव पिचड यांच्याशी मैत्री केली आणि आज ती फळाला देखील आली आहे. त्यामुळे, राष्ट्रवादीला कार्यकर्ता टिकविता आला नाही. याचे हे उत्तम उदा. आहे.

या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटातला मानले पाहिजे. त्यांनी पुर्णपणे आपले स्वतंत्र अस्थित्व निर्माण करु पाहिले होते. म्हणजे जेव्हा राष्ट्रवादीला जाग देखील आली नव्हती. तेव्हा यांचा ७५ टक्के पॅनल तयार होता. मात्र, राज्यातील आघाडी धर्म पाळायचा म्हणून त्यांनी तडजोड करुन तीन जागा घेत समाधान मानले आहे. कॉंग्रेसला ०२ जागा तर कम्युनिस्ट पार्टीला ०१ जागा अशा पद्धतीने वाटाघाटी झाल्या आहेत. यात आणखी एक गोष्ट नमुद केली पाहिजे. की, काही राष्ट्रवादीत असणार्‍या नेत्यांचे जिवस्य कंठस्य मित्र भाजपाकडून उभेदवार आहेत. त्यामुळे, हातात घड्याळ आणि मनात कमळ असे चित्र पहायला मिळाले तर काही नवल वाटण्याचे काही कारण नाही. आता, जसे दुधसंघाच्या निवडणुकीत काही उमेदवार कोटीच्या बाता करीत होते आणि ऐनवेळी पांघरुन घेऊन झोपले. असे झाले तर अधिक अवघड परिस्थिती पहायला मिळणार आहे. तुर्तात फक्त वेट ऍण्ड वॉच..!!

अशी असते निवडणुक...

अकोले तालुक्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण १८ जागा आहेत. त्यात सोसायटी मतदार संघात ०७ जागा या सर्वसाधारण गटासाठी तर, ०२ जागा महिलांसाठी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीची ०१ जागा अशा १० जागा सोसाटीतून तर  ग्रामपंचायत मतदार संघात ०२ जागा सर्वसाधारण, ओबीसी ०१, दुर्बल घटकामध्ये ०१, अनुसुचित जाती- जमाती ०१ अशा ०५ जागा आहेत. तर, हमाल ०१, व्यापारी ०२ आहेत. अशा एकूण १८ जागा कृषी उत्पन्न बाजार समितीत असतात. त्यात भटक्या विमुक्त जाती जमातीतून चक्रधर सदगीर (मुथाळणे) हे बिनविरोध निवडून आले आहेत. तर, हमाल गटातून वैद्य (सुगाव) म्हणून बिनविरोध झाले असून अनुसुचित जाती- जमाती प्रवर्गातून तुकाराम खाडे (बारी) यांनी बाजी मारली आहे. विशेष म्हणजे ही तिघे भाजपचे उमेदवार असून महाविकास आघाडीचा एकही उमेदार बिनविरोध नाही. त्यामुळे, त्यांच्यातील सावळ्या गोंधळावर आता चर्चा रंगू लागली आहे.

अशी होईल निवडणुक...!

सोसायटी मतदार संघात एकूण १ हजार २७ मतदार आहेत, ग्रामपंचायत मतदार संघात १ हजार १८५ मतदार आहेत, व्यापारी मतदार संघात २०५ मतदार तर हमाल मतदार संघात ४७ असे एकूण २ हजार ४६४ मतदार आहेत. यात उद्याच्या निवडणुकीत सोसायटी मतदार संघातून १७ अर्ज आले आहेत त्यात तीन अपक्ष आहेत. तर, ग्रामपंचायत मधून ०४, व्यापारी मधून ०४ अर्ज, एसटी ०१ जो बिनविरोध झाला आहे. हमाल मधून १ जो बिनविरोध झाला आहे. एनटी मधून १ जो बिनविरोध झाला आहे. दुर्बल घटकातून ०२ अर्ज, महिला प्रवर्गतून ०४ ओबीसी मधून ०३ अशा प्रकारे एकूण ३७ अर्ज भरले गेले आहेत.