सख्या भावांचे वाद, पुतण्याने तीन वार करुन चुलत्याचा खुन केला. जनावरे शेतात गेल्याने वाद झाला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या.!
सार्वभौम (अकोले) :-
जनावरे शेतातून गेली म्हणून दोन सख्या भावांमध्ये वाद झाला. दोघांची बाचाबाची सुरू असताना पुतण्या फावडे घेऊन आला आणि थेट चुलत्याच्या डोक्यात तीन घाव घातले. त्यानंतर चुलता रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि मयत झाला. ही घटना दि. १६ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास अकोले तालुक्यातील गोडेवाडी कोतुळ परिसरात घडली. यात मनोहर सावळेराम लेंभे (रा. गोडेवाडी) यांचा जागीच मृत्यु झाला आहे. याप्रकरणी सोनाबाई लेंभे यांनी अकोले पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सुरेश सावळेराम लेंेभे व राजाराम उर्फ राहुल सुरेश लेंभे (रा. गोडेवाडी) या दोघांवर कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांनी आरोपींच्या तत्काळ मुसक्या आवळल्या आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, दि. १६ एप्रिल २०२३ रोजी सोनाबाई व तिचे दोन मुले जनावरे घेऊन रानात गेले होते. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास जनावरे घरी घेऊन येत असताना जनावरे आरोपी सुरेश लेंभे याच्या शेतात गेली. तेव्हा तो तेथे आला आणि त्याने नको तशा शिव्य देत जनावरे पुन्हा मागे हुसकावून दिली. त्यानंतर सोनाबाई हिने दुसर्या वाटेने जनावरे घरी आणली. त्यानंतर काही वेळातच सोनाबाई यांचे पती मनोहर लेंभे हे कामाहून घरी आले होते. तेव्हा त्यांना समजले. की, आपल्या भावाने आपली जनावरे आडविली होती. त्यामुळे, पत्नीने दुसर्या मार्गाने जनावरे घरी आणण्याची वेळ आली.
दरम्यान, हा सर्व प्रकार मनोहर यांना त्रासदायक वाटला, म्हणून ते आपल्या भावास जाब विचारण्यासाठी त्याच्या घराकडे गेले. सुरेश हा घरामागे काहीतरी काम करीत होता. मनोहर यांनी तेथे जाऊन त्यास विचारणा केली. की, तु आमच्या जनावरांचा रस्ता का आडविला? तेव्हा दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. त्यावेळी आरोपी सुरेश याने आपला भाऊ मनोहर यास घानघान शिविगाळ केली. यावेळी तेथे राजाराम उर्फ राहुल सुरेश लेंभे हा आला, त्याच्या हातात खोरे होते. त्याने कोणताही विचार न करता एकापाठोपाठ एक असे तीन वार केले. त्यामुळे, मनोहर लेंभे हे जाग्यावर कोसळले. त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाला. जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा मनोहर यांची पत्नी सोनाबाई हिने त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते निपचित पडलेले होते.
दरम्यान, हे सर्व सुरू असताना तेथे एकच कल्लोळ झाला. तेव्हा आरोपी सुरेश म्हणाला. की, याची बायको आणि मुलांना देखील सोडू नका. यांना देखील खल्लास करा. हे शब्द ऐकल्यानंतर सोनाबाई यांनी मुलांना हाताला धरुन तेथून पळ काढला. आरोपी यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र नुकताच अंधार पडल्यामुळे हे कोठे लपले हे लक्षात आले नाही. त्यानंतर काही वेळाने सोनाबाई यांनी गोडेवाडी गावचे एका व्यक्तीकडे जाऊन घडलेली घटना कथन केली. त्यानंतर त्यांनी पोलीस निरीक्षक भोये यांच्याशी संपर्क केला आणि रात्री गाडी गोडेवाडीत जाऊन पोहचली. तेथे पाहिले असता मनोहर यांची काही एक हलचाल होत नव्हती. त्यांनी ऍम्ब्युलन्समध्ये टाकून रुग्णालयात आणले होते. मात्र, तोवर फार उशिर झाला होता. त्यानंतर सोनाबाई यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून यात सुरेश सावळेराम लेंेभे व राजाराम उर्फ राहुल सुरेश लेंभे यांना आरोपी केले आहे. त्यानंतर पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अगदी पहाटेपर्यंत आरोपी ताब्यात घेऊन सर्व प्रक्रिया पुर्ण करण्याचे काम चालु होते.