संगमनेरचा लाचखोर ग्रामसेवक लाचलुचपतच्या जाळ्यात, शुल्लक कामासाठी 50 हजार घेतो.! बेड्या ठोकतच बीपी हाय.!

 

- सुशांत पावसे

सार्वभौम (संगमनेर) :- 

                   संगमनेर शहरातील रहिवासी ग्रामसेवक याने सिन्नर येथील पाथरे गावातील व्यक्तीकडुन गावठाण जागेतील अतिक्रमण नियमीत करून देण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच घेतली. हा खळबळजनक प्रकार काल बुधवार दि.12 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडला. यात नितीन सगाजी मेहेरखांब (रा. त्रिमूर्ती चौक, मालदाडरोड, ता. संगमनेर) याला नाशिक लाचलुचपत विभागाने कोपरगाव तालुक्यातील जवळके येथे बेड्या ठोकल्या आहेत. लाचखोर ग्रामसेवक नितीन मेहेरखांब यांनी ही रक्कम स्विकारली असता त्यास रंगेहात पकडण्यात आले. त्यांना लाचलुचपत नाशिक विभागाने ताब्यात घेतले असुन त्यांची संपत्ती, बँक खाते, घरझडती यासाठी पुढील प्रक्रिया सुरू केली आहे. यात सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर पोलीस निरीक्षक साधना इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक लाचलुचपत विभागाच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी तहसील कार्यलयातील लाचखोर लिपीकास चार वर्षांची शिक्षा लागली तरी देखील संगमनेरात लाच घेण्याचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.

            याबाबत सविस्तर माहिती अशी की, सिन्नर तालुक्यातील पाथरे गावी एक 49 वर्षीय माणुस राहत होता. तेथे त्याचे जुने घर होते, घराचा काही भाग व ओटा काढुन टाकला आणि तेथे त्याने दोन मजली इमारत उभी केली. हे घर बांधत असताना आपण अतिक्रमणात बांधतोय हे लक्षात आले नसावे. घर बांधल्यानंतर त्याने ग्रामपंचायतमध्ये घराची नोंद करण्यासाठी गेला. तेव्हा  त्याचे घर अतिक्रमणात असल्याचे सांगण्यात आले. त्याच्या घराची नोंद ओढण्यात आली नाही. तेव्हा त्याने कागदपत्रांची पूर्तता केली. मात्र, लाचखोर ग्रामसेवक नितीन मेहेरखांब यांनी कामात वारंवार टाळाटाळ केली. पाथरे गावातील राहिवास्याने सर्व कागदपत्रे देऊन नोंद होत नसल्याने हताश झाला. सर्व कागदपत्रे असताना ग्रामसेवकाला पैसे कशासाठी द्यायचे? मात्र, ग्रामसेवक ऐकतील ते कसले? त्यांनी तक्रादाराकडे अतिक्रमण नियमीत करून देण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी केली. मात्र, तक्रादार यांच्या वारंवार मागणीला वैतागल्याने थेट त्यांनी नाशिक लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर नाशिकचे पथक काल सायंकाळी थेट संगमनेरात दाखल झाले.

           दरम्यान, तक्रादार त्यांच्या मतावर ठाम होते. त्यामुळे नाशिक लाचलुचपत विभागाने थेट ग्रामसेवकावर सापळा रचला. तक्रादराकडून 50 हजारांची मागणी करून हो-नाही करता करता ग्रामसेवक नितीन मेहेरखांब याने तक्रारदाराकडून 25 हजार रुपये घेत असताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. काल सायंकाळ पासुन सखोल चौकशी सुरू होती. यात आणखी कोण आहेत का? यांच्या घरात तसेच बँकेत किती मालमत्ता आहे आशा प्रकारची पुढील कारवाई संगमनेरात सुरू आहे.

         दरम्यान, संगमनेर तालुक्यात किती भ्रष्टाचार बोकाळला आहे याची प्रचिती येऊ लागली आहे. जिल्ह्यातून सर्वात जास्त तक्रार संगमनेरातुन लाचलुचपत विभागाकडे जात आहे. काही दिवसांपूर्वी संगमनेरातील शाखा अभियंताने ठेकेदाराकडुन पाच टक्के कमिशन तर क्वालिटी कंट्रोल अधिकाऱ्यांचे चार टक्के कमिशन मागितले होते. त्यांना देखील लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले होते. गावागावातील गायरान वरील अतिक्रमण काढण्यासाठी राज्य सरकारला निर्देश दिले होते तेव्हापासून लोक अतिक्रमण नियमीत करण्यासाठी ग्रामपंचायतीत धाव घेत आहेत. त्याचा फायदा ग्रामसेवक उचलताना दिसत आहे त्याचीच ही प्रचिती समोर येत आहे. तर, अनेक अधिकारी संगमनेर शहरात वास्तव्यास  येत असून मोठ्या रकमांची प्लॉटींग खरेदी, बंगले खरेदी आणि मोठ्या रकमांची गुंतवणूक होत आहे. याची देखील चौकशी व्हावी अशी मागणी होऊ लागली आहे.