कॉलेजच्या मुलीचा पाठलाग केला, मजनुला झाली सहा महिने जेल अन २० हजार दंड.! गाडी आडवी लावत होता.!


सार्वभौम (संगमनेर) :- 

संगमनेर शहरातील फादरवाडी-जोर्वे रोड परिसरातून एक मुलगी कॉलेजला जात होती. तिचा पाठलाग करीत एक मुलगा रोज या विद्यार्थीनिला त्रास देत होता. समजून सांगून देखील त्याला कळले नाही. त्यानंतर पीडित मुलीने थेट त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी २०१६ साली न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केला होता. आज सेशन कोर्टात हा खटला निकाली निघाला. त्यात आरोपी मुद्दस्सर जाफर शेख (रा. नाईकवाडीपुरा, संगमनेर) यास न्यायालयाने दोषी धरुन सहा महिने सश्रम कारावास आणि २० हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. यावेळी सरकार पक्षातर्फे एन.पी.गवते यांनी काम पाहिले. तर, पोलीस उपनिरीक्षक विजय परदेशी यांच्यासह अन्य पोलीस कर्मचार्‍यांनी मोलाचे सहकार्य केले.

याबाबत सविस्तर माहिती अशी. की, जोर्वे रोड परिसरातील एक विद्यार्थीनी रोज कॉलेजला ये-जा करीत होती. मात्र, जाता-येता आरोपी मुद्दस्सर शेख हा तिला त्रास देत होता, तिचा पाठलाग करीत होता. तर कधी गाडी आडवी लावत होता. हा प्रकार दि. १ नोव्हेंबर २०१६ पासून सुरू झाला होता. मात्र, पीडित मुलीस शिक्षण अत्यंत महत्वाचे वाटत असल्याने असे काही घरी सांगितले. तर, तिचे शिक्षण बंद होण्याची भीती वाटत होती. त्यामुळे, तिने काही घरी सांगण्याचे धाडस केले नाही. मात्र, पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस असा हा प्रकार वाढतच गेला. आरोपी मुद्दस्सर शेख हा राजरोस आडवे होऊन तिच्या स्कुटीला गाडी आडवी लावू लागला होता.

दरम्यान, याचा मजल अधिक वाढत गेली होती. हा पीडित मुलीस एकटे पाहून तिच्या खांद्याला खांदा घासत होता. त्यामुळे, पीडित मुलगी घाबरत होती. मात्र, तरी देखील तिने मोठ्या धाडसाने त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो इतका मजनू झाला होता. की, त्याने पीडितेचे काही ऐकले नाही. या प्रेमवेड्याला लवकर आळा घातला नाही तर पुढे काही अनुचित प्रकार होऊ शकतो. म्हणून पीडित मुलीने जे काही घडते आहे. त्याची माहिती आपल्या पाल्यास दिली. ४ नोव्हेंबर २०१६ रोजी पालकांनी थेट या मजनुला छेडछाड काढताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर चारदोन मानसांनी मुद्दस्सर जाफर शेख यास समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, झाले काय? तर, उलट यानेच पालकांना शिविगाट दमदाटी सुरू केली.

आरोपी मुद्दस्सर जाफर शेख याला समजून सांगून देखील त्याच्यात कोणताही सुधार झाला नाही. त्यामुळे, पुन्हा छेडछाड झाली असता पीडित मुलीने थेट संगमनेर पोलीस ठाणे गाठले. तेथे मुद्दस्सर जाफर शेख याच्या विरोधात कलम ३४५ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल केला. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास करुन पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले होते. सहा वर्षे हा खटला चालला. यात सरकार पक्षातर्फे एकुण ३ साक्षिदार तपासण्यात आले. सत्र न्यायाधिश यांनी आरोपी मुद्दस्सर जाफर शेख यास दोषी ठरवून त्यास सहा महिने सश्रम कारावास आणि २० हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. यात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक विजय परदेशी, प्रविण डावरे, आर.व्ही.भुतांबरे, स्वाती नाईकवाडी, पी.बी.थोरात यांनी मोलाचे सहकार्य केले.