अगस्ति कारखान्याचे सर्व संचालक पिचड साहेबांना भेटणार.! भ्रष्टाचार नाही तर गुन्हा का ठोकत नाही.!

 


सार्वभौम (अकोले) :-

महाराष्ट्र राज्यातील जे कारखाने आडचणीत आहेत. त्यात दहा कारखान्यांची नावे आहेत. त्यात विखे पाटील, पंकजाताई मुंढे, हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेकांची नावे आहेत. त्यात अगस्ति सहकारी साखर कारखान्याचे नाव देखील आहे. या दहा कारखान्यांना केंद्र सरकार ७५ कोटी रुपये १० वर्षासाठी तथा दिर्घकाळ मुदतीचे कर्ज म्हणून अदा करणार आहे. त्यासाठी ९.२७ असा व्याजदर असून त्याची परतफेड ही टप्प्या-टप्प्याने करायची आहे. आता माजी मंत्री मधुकर पिचड साहेब हे भाजपचे बडे नेते आहेत. त्यांना राज्यात तर आहेच, मात्र केंद्रात देखील मोठा सन्मान आहे. त्यामुळे, त्यांनी जर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब आणि गृहमंत्री अमित शहा यांना सांगितले. तर, सहकार मंत्री हे ७५ कोटी रुपये हे राज्य शासनाला वर्ग करणार आणि ते थेट कारखान्यांना मिळणार आहेत. ही योजना नॅशनल कार्पोरेशन डेव्हलपमेन्ट कार्पोरेशन (एनसीडीसी) म्हणून राबविली जात आहे. राज्यात जे १० कारखाने आर्थिक अडचणीत आहे. त्यांना ही योजना लागु होणार आहे. मात्र, त्यासाठी माजी आमदार वैभवराव पिचड आणि माजी मंत्री मधुकराराव पिचड साहेब यांनी पुढाकार घेतला तर ते अधिक सुलभ होऊ शकते. त्यामुळे, संपुर्ण संचालक मंडळ हा कारखाना चालविण्यासाठी त्यांची भेट घेणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे.

सन २०२२-२३ चा गाळप हंगाम आता पंधरा दिवसात पार पडणार आहे. आज अखेर ३ लाख ७५ हजार टन ऊस गाळप झाला आहे. तर ४५० हेक्टर ऊस कार्यक्षेत्रात शिल्लक आहे. त्यामुळे,  हंगामा अखेर सरासरी चार साडेचार लाख मे.टन ऊस गाळप होईल असा अंदाज आहे. खरंतर ६ लाख टन ऊस गाळप करण्याचा मानस संचालक मंडळाचा होता. मात्र, ते शक्य झाले नाही. तर, पुढील वर्षीचा हंगाम देखील कठीण परिस्थितीत काढावा लागणार आहे. कारण, कार्यक्षेत्रात फक्त पाऊनेदोन लाख टन असणार आहे. त्यामुळे, येणार्‍या काळात बाहेरुन १ ते दिड लाख मे.टन ऊस गेटकेनचा आणून कारखाना चालवावा लागणार असल्याची माहिती अगस्ति सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सिताराम पा. गायकर यांनी दिली आहे. कारखाना अडचणीत आहे, त्यात अनेक समस्या आमच्यापुढे आहे, त्यात अशा प्रकारच्या बदनामीने प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. तरी देखील मोठ्या कसोशीने कारखाना चालु ठेवणार असल्याचे पाटील म्हणाले. 

त्या शेतकर्‍यांना ५० रु अनुदान.!

कारखाना टिकला पाहिजे, तो चालु राहिला पाहिजे अशी प्रत्येक शेतकर्‍याची तळमळ असते. मात्र, दुर्दैव असे की, तळमळ करणारा शेतकरी ऊस लागवड करत नाही. काही पुढारी म्हणून वावरतात, बडीबडी भाषणे ठोकतात. मात्र, त्यांचा ऊस बाहेरील तालुक्यात जातो. त्यामुळे, गेटकेनच्या ऊसासाठी पाया पडण्याची वेळ येतेे. परिणामी कार्यक्षेत्रात ऊस वाढीसाठी मेळावे घ्यावे लागत आहे. आता सुरू असणार्‍या मेळाव्यांना शेतकर्‍यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेतकर्‍यांनी खोडव्याचे पीक ठेवले पाहिजे. येणार्‍या काळात खोडव्याच्या आणि नव्याने सुरू होणार्‍या पिकांना एकरी २० गोण्या किंवा ५०० रु टणाने कंपोष्ट खत देण्यात येणार आहे. १ मार्च २०२३ पासून पुढे ज्यांनी खोडवे राखले आहेत त्यांना टनामागे ५० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. ऊस थोडाफार लेट जरी झाला. तरी देकील त्यांना अनुदान मिळाल्यास फायदा होणार आहे. त्यामुळे, कारखाना टिकावा ही मानसिकता असली तरी त्यास कृतीची जोड असणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकर्‍यांनी ऊस लागवड करण्याचे आवाहन संचालक मंडळाने केले आहे. 

बदनामीने काय होतय.!

जेव्हा अगस्ति कारखान्याची बदनामी होते. तेव्हा, जे कोणी लेबर बाहेरुन येतात. तेव्हा त्यांच्या मनात शंका कुशंका असते. की, कारखाना पेमेन्ट करेल का? आपल्या घामाचे दाम अडकणार तर नाही ना? त्यामुळे, लेबर आणण्यास मोठी कसरत करावी लागते. जेव्हा जिल्हा बँक तथा अन्य कोणतीही बँक असो, तेथे अशा प्रकारच्या बदनामीचे संदेश जातात तेव्हा त्या बँका कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करतात. किंवा कर्ज देताना हजार वेळा अडवणुक करतात. कारखान्याचे अन्य साहित्य उधारीवर बाहेरुन घ्यायचे असेल तर अशा प्रकारची बदनामी झाल्यास कोणी साहित्य द्यायला धजत नाही. इतकेच काय.! सर्वात महत्वाचे म्हणजे अकोल्याच्या कार्यक्षेत्रात ऊस कमी आहे. त्यामुळे, बाहेरुन गेटकेनचा ऊस आणावा लागतो. अशा प्रकारे बदनामीपुरक मेसेज शेतकर्‍यांपर्यंत गेला. तर ते अगस्तिला ऊस देताना कित्तेक वेळा विचार करतील. त्यामुळे, आपण खुलेआम बदनामी करताना कारखाना बंद पाडायची सुपारी तर घेतली नाही ना? याचा विचार प्रत्येकाने करणे आवश्यक आहे.

कारखाना दावा का ठोकत नाही?

अगस्ति कारखान्याची निवडणुक लागण्यापुर्वी कारखान्याची बदनामी सुरू झाली ते निवडणुक सुरू असताना काय-काय आरोप प्रत्यारोप झाले हे सर्वश्रुत आहे. वारंवार आरोप करायचे, सोशल मीडियावर बदनामी करायची, प्रतिष्ठांचे नावे टाकून त्यांची आब्रु वेशिवर टांगायची. असला नंगाटपणा या तालुक्यात अनेक वेळा पहायला मिळाला आहे. मात्र, तरी देखील अशा व्यक्तींकडे कुत्ता भुंकता है.! हाथी चलता है असे म्हणून कारखान्याने आणि पुढार्‍यांनी दुर्लक्ष केले आहे. मात्र, वेळीच असल्या व्यक्तीद्वेषाने पछाडलेल्या विषारी सापांना कायदेशीर मार्गाने ठेचले असते. तर, आज त्यांची मजाल वाढली नसती. मात्र, कारखाना गुन्हे का दाखल करत नाही. तो मीडिया असो किंवा व्यक्ती. त्यांच्यामुळे जर अगस्ति बदनाम होत असेल. तर, कागदे रंगविली गेलीच पाहिजे. अशा व्यक्तींना तडीपार करेपर्यंत पाठपुरावा केला पाहिजे. मात्र, वारंवार माघार घ्यायची आणि उत्तरे देत बसायचे हा फालतुपणा कशासाठी? कारखान्याला अर्ज, चौकशा आणि आरोप-प्रत्यारोप नवे नाहीत. मात्र, हे कोठेतरी थांबले पाहिजे आणि जसे अन्य कारखाने, संस्था किंवा व्यक्ती कठोर पाऊले उचलतात तसे पाऊल उचलणे गरजेचे आहे.

गोपाळशेठ म्हणावं लागतं.!  

मराठीत एक म्हण आहे, गाढवाला गोपाळशेठ म्हणावे लागते. अन्यथा ते लाथा मारुन-मारुन दुसर्‍याला बेजार करीत असते. अशीच गत अकोले तालुक्यात काही व्यक्तींची आहे. आपण चर्चेत राहिले पाहिजे म्हणून सतत कोणावर तरी आरोप करायचे, बिचुकले प्रमाणे एखाद्या बड्या हस्तीला डिवचायचे, कायम टिकल्या वाजवून टिचक्या मारत रहायच्या. अशा प्रकारची घातक मानसिकता अकोल्यात काही व्यक्तींमध्ये रुढ झाली आहे. थेट सांगायचे झाले तर, अगस्ति कारखान्याच्या बाबत जी काही बदनामी सुरू आहे. त्यात अनेकांच्या झोपा आता चार महिन्यानंतर पुर्ण झाल्या आहेत. येथे भ्रष्टाचार दिसु लागला आहे, कर्मचारी अधिक वाटु लागले आहेत. पोत्यात हाप्तेखोरी आणि साहित्यांमध्ये टक्केवारी दिसू लागली आहे. इतकेच काय.! चार महिन्यात ५० कोटी रुपये भ्रष्टाचार झालाय आणि अधिकार्‍यांनी बंगले बांधले आहेत. वा रे पठ्ठ्यांनो.! स्वत:चे अस्थित्व टिकवून कायम चर्चेत राहण्यासाठी अगस्तिची बदनामी करण्याचा ठेका काही व्यक्तींनी घेतला आहे. पण, जैसी करणी वैैसी भरणी, सगळं इथेच फेडावे लागणार आहे. ज्या अगस्ति महाराजांनी एका घोटात समुद्र गिळला त्यांच्या नावे सुरू असणार्‍या कारखान्याची बदनामी केली तर यांचे देखील वाटोळे झाल्याशिवार राहणार नाही अशा प्रकारची तळतळ आता शेतकरी व्यक्त करु लागले आहेत.

हे कोठेतरी थांबले पाहिजे.

खरतर जर एखाद्याला चेअरमन, किंवा अधिकारी, संचालक, किंवा कर्मचार्‍याच्याविषयी व्यक्तीद्वेष असेल. तर त्याचा संबंध हा कारखान्याशी लावणे चुकीचा आहे. तुम्ही वैयक्तीक वाद हा कारखान्याच्या माथी मारायचा आणि त्याची बदनामी करायची हे कितपत योग्य आहे. चेअरमनने टेंटर दिले नाही किंवा कोणी म्हणेल असे वागले नाही. त्याचे हितसंबंध जोपासले नाही म्हणून लागचे कारखाना टार्गेट करायचा आणि नको ते आरोप करुन बदनामी करायची. किंवा एखाद्या संचालकाशी पटले नाही. त्याने आपल्या मनाजोगे काही केले नाही तर त्याने नावे व्यक्तीगत न बोलता थेट कारखाना बदनाम करायचा. अशा प्रकारची ब्लॅकमेल प्रथा अकोल्यात रुढ झाली आहे. हा प्रकार कोठेतरी थांबला पाहिजे. कोणाची संपत्ती वाढली असेल तर त्यांनी आयकर विभाग किंवा थेट इडीकडे चौकशीची मागणी करावी. मात्र, सोशल मीडियाचा आधार घेऊन थेट कारखाना बदनाम करणे हे कोठेतरी थांबले पाहिजे. यासाठी कारखान्यानेच कठोर भुमीका घेणे गरजेचे आहे.