संगमनेरात प्राध्यापकाला पैसे दुप्पट करण्याच्या नादात 45 लाख 23 हजार 512 रुपयांना चुना.! सुशिक्षित जोडपं पैश्याला भाळलं.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर शहरातील प्राध्यापकासह पत्नीची तब्बल 45 लाख 23 हजार 512 रुपयांची फसवणुक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आर.ओ.प्युरीफायर बसवण्याच्या संपर्कातुन प्राध्यापकाच्या घरी आला आणि वेगवेगळ्या कंपन्याच्या माध्यमातून तुम्हाला दुप्पट पैसे मिळवुन देतो असे अमिष दाखविले. आरोपीने त्याचे बँक स्टेटमेंट, पुणे येथे आलिशान बंगला, महागड्या कार यांचा पाढा वाचला आणि प्राध्यपकासह त्यांच्या पत्नीला भुरळच पडली. त्यानंतर या दोघांनी क्रिप्टो करन्सी, संकल्प सिद्धी प्रॉडक्ट्,आर. आर. वर्ल्ड फायनान्स कंपनी, मुंबई या सर्व कंपन्यामध्ये प्राध्यापकाने पैसे गुंतवून केली. ही रक्कम 45 लाख 23 हजार 512 रुपये इतकी होती. हा सर्व लॉस झाल्यानंतर प्राध्यापकासह पत्नीला चुना लावुन आरोपी फरार झाला. ही घटना डिसेंबर 2017 ते ऑगस्ट 2022 दरम्यान संगमनेर येथे घडली आहे. जेव्हा आपला विश्वासघात होत आहे हे लक्षात आले. तेव्हा प्राध्यापकांच्या पत्नीने पैश्याची मागणी केली. तेव्हा खोटे आश्वासन मिळू लागले. त्यामुळे, हे प्रकरण अधिक वाढण्यापेक्षा प्राध्यापकाच्या पत्नीने थेट संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठले आणि गणेश राधाकिसन वर्पे, मंगल गणेश वर्पे (रा. वरवंडी, ता. संगमनेर), रेश्मा आबासाहेब देसाई (रा.लोढा कॉम्प्लेक्स, पुणे), महेश विजय मांढरे (रा.आश्वि, ता. संगमनेर) आशा चौघांवर फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. संगमनेरात बँका, पतसंस्था, कंपन्या तर काही ठिकाणी वैयक्तिक लाभापोटी हायप्रोफाईल पद्धतीने कशा फसवणुका होतात याची देखील प्रचिती आली आहे. अशा व्यक्तीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
याबाबत फिर्यादीत म्हटले आहे की, संगमनेर शहरातील 132 केव्ही परिसरात प्राध्यापकाचे कुटुंब राहते. त्यांचे 2017 मध्ये एक दिवस आर,ओ,प्युरीफायर खराब झाले ते बसवण्यासाठी आरोपी गणेश वर्पे हा प्राध्यापकांच्या घरी गेल्याने त्यांची तेथे ओळख झाली. त्यावेळी आरोपी गणेश वर्पे हा म्हणाला की, बिग लाईफ केअर या आर.ओ.कंपनीत झोनल मॅनेजर म्हणुन मी काम करतो. वारंवार भेटुन त्यांची चांगली ओळख वाढली. त्यावरून आरोपी गणेश वर्पे व त्याची पत्नी मंगल वर्पे यांचे दोघांचे ही प्राध्यापकाच्या घरी येणे जाणे वाढले. त्यावेळी आरोपी गणेश हा प्राध्यापकाला व त्यांच्या पत्नीला नेहमी म्हणत की, मी एफ, एम,एल,सी.ग्लोबल मार्केटिंग हरियाणा, दास कॉइन(नेट लिडर), संकल्प सिद्धी प्रॉडक्ट प्रायवेट लिमिटेड नाशिक, आर,आर, वर्ल्ड फायनान्स कंपनी मुंबई आशा विविध मार्केटिंग कंपन्यांमध्ये हिस्सेदार म्हणुन काम करतो असे प्राध्यापकाला व त्यांच्या पत्नीला सांगितले. आरोपी गणेश वर्पे याने अनेक कंपन्यामधुन बक्कळ पैसा देखील मिळवला आहे. बंगला,महागड्या गाड्या, पुण्यासारख्या ठिकाणी लोढा कॉम्प्लेक्समध्ये फ्लॅट अशी माया कमविल्याचे बोलले जात आहे. तसेच कंपन्याद्वारे येणारा रिटन्स बँकेचे स्टेटमेंट दाखवुन आरोपी गणेश व त्याची पत्नी मंगल हिने प्राध्यापकला व पत्नीला या कंपन्यामध्ये पैसे गुंतवणुन करा तुम्हाला कमी काळात दुपटीने पैसे कमवुन देतो असे अशी हमी दिली.
दरम्यान, आरोपी गणेश वर्पे याने आरोपी रेश्मा देसाई हिच्या सोबत प्राध्यापकाची ओळख करून दिली. ती आरोपी गणेश वर्पेची बिजनेस पार्टनर दाखवुन तिला देखील बक्कळ पैसा कमवून दिला असे प्राध्यापकाला दाखवले. आरोपी रेश्मा देसाई हिने देखील प्राध्यापकाला व पत्नीला कमी कालावधीत दुप्पट पैसा कमवुन देऊ अशी हमी घेतली.तर महेश मांढरे हा मॅनेजर म्हणुन काम करतो व सोबत मार्केटिंग करतो असे प्राध्यापकाला व त्यांच्या पत्नीला दाखविले. डिसेंबर 2017 मध्ये आरोपी गणेश वर्पे व आरोपी मंगल वर्पे यांच्यावर विश्वास ठेऊन प्राध्यापकांच्या पत्नीने 7 लाख 50 हजार रुपयांची गुंतवणूक केली. कंपनीत प्राध्यापकाच्या पत्नीचा आयडी तयार केला. आरोपी गणेश वर्पे याच्या मार्फतीने प्राध्यापकाच्या पत्नीच्या अकाऊंटवर रिटन्स यायला लागला. त्यामुळे, प्राध्यापकाच्या पत्नीचा आरोपी गणेश वर्पे, मंगल वर्पे यांच्यावर विश्वास वाढला. त्यानंतर तुम्ही दास क्वाइन क्रिप्टो करन्सी मध्ये पैसे गुंतवा तुम्हाला दुप्पट करून देतो.असे प्राध्यापकाला व त्याच्या पत्नीला लॅपटॉपवर प्रेझेंटेशन देऊन पटवुन सांगितले. प्राध्यापकाचा व त्यांच्या पत्नीचा त्यांच्यावर विश्वास बसला.
दरम्यान, 2 जानेवारी 2018 रोजी प्राध्यापकाच्या अकाऊंट वरून आरोपी गणेश वर्पे याच्या अकाउंटवर 5 लाख 50 हजार ट्रान्स्फर केले. त्यानंतर आरोपी गणेश वर्पे याच्या मालकीची आदिराज एंन्टरप्राइजेस त्याच्या खात्यावर 14 मार्च 2018 रोजी प्राध्यापकाने 2 लाख 30 हजार रुपये ट्रान्स्फर केले. तसेच दि.14 मार्च 2018 रोजी 10 लाख रुपये रोख रक्कम आरोपी गणेश वर्पे, रेश्मा देसाई, महेश मांढरे यांना मालदाड येथील आदिराज एंन्टरप्रायजेस येथे दिले होते. हे पैसे क्रिप्टो करन्सी मध्ये गुंतवले आहे असे प्राध्यापकाला व पत्नीला सांगितले. त्यानंतर सहा महिन्यांनी प्राध्यापकाच्या पत्नीला एक लाख रुपये आरोपी गणेश वर्पे याने आणुन दिले व पुढील सहा महिन्यात क्वाइनची किंमत वाढली की सर्व रक्कम दुप्पट स्वरूपात देतो अशी हमी घेतली. आरोपी गणेश वर्पे याने स्वतःची संकल्प सिद्धीच्या बँक खात्यावर दि. 17 जानेवारी 2019 रोजी 7 लाख 74 हजार रुपये रक्कम आरोपी गणेश वर्पेच्या कंपनीच्या अकाउंटवर ट्रान्स्फर केली. पुन्हा प्राध्यापक कुटुंबाला टोपी टाकुन आर. आर. वर्ल्ड फायनान्स कंपनीच्या मुंबईच्या खात्यावर 14 लाख रुपये ट्रान्स्फर केले. त्यानंतर पुन्हा 24 जुन 2020 रोजी आरोपी मंगल वर्पे हिच्या खात्यावर 4 लाख रुपये आर. आर. वर्ल्ड कंपनी पेमेंट डीलेवरी करण्यासाठी व इतर मार्केट मधील अडचणीसाठी दिले होते.
दरम्यान, प्राध्यापकाची पत्नी सासरी बुरुडगाव रोड अहमदनगर येथे असताना दि.2 ऑगस्ट 2020 रोजी प्राध्यापक पत्नीच्या सासरी येऊन आरोपी गणेश वर्पे, रेश्मा देसाई, महेश मांढरे यांनी पुन्हा 15 लाख रुपये आर.आर. वर्ल्ड कंपनी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी रोख रक्कम दिली. आता ही रक्कम पुन्हा मिळावी म्हणून काही चेक व लिहून घेतले होते. मात्र, कंपनीचे चेक बाऊन्स झाले. जेव्हा पैसे मागण्यासाठी प्राध्यापक व पत्नी जात तेव्हा उडवा-उडवीचे उत्तर मिळू लागले. काही रक्कम प्राध्यापकांना मिळत असल्याने ते पैसे कमवण्यामध्ये वाहवत गेले. मात्र, 45 लाख 23 हजार 512 रुपये गेल्यानंतर प्राध्यापका डोळे उघडले. सुशिक्षित माणस पैसे दुप्पट करण्यासाठी फळले आणि आहे ते गमावून बसले. नंतर पोलिसांचे दार ठोठावले व आरोपी गणेश राधाकिसन वर्पे, मंगल गणेश वर्पे (रा. वरवंडी, ता. संगमनेर), रेश्मा आबासाहेब देसाई (रा.लोढा कॉम्प्लेक्स, पुणे), महेश विजय मांढरे (रा. आश्वि ता. संगमनेर) आशा चौघांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सातपुते करत आहेत.