पीआयने लावली आरोपींना पुस्तकांची मेस.! बौद्धीक भुकेचे व्यकुळलेले कौदी झाले वाचनात तल्लीन.! वर्दीतील मानसाचे माणूस घडविण्यासाठी प्रयत्न.!

 - सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :- 

आरोपी तथा गुन्हेगार म्हणजे कोणी जगावेगळा नाही. तर, एका चुकीमुळे कायदेशिर दृष्ट्या सार्वभौमत्व गमविलेला व्यक्ती. ज्याला इतरांप्रमाणे मौज मजेने आपले जीवन जगता येत नाही. समाजाची दृष्टी त्याच्याकडे भलेही गुन्हेगार म्हणून वळते. मात्र, चुका कोणाकडून होत नाहीत? आणि क्रोध कोणाला येत नाही. त्यामुळे, अशा व्यक्तींना गुन्हेगार म्हणून हिनविण्यापेक्षा त्यांना समजून घेतले पाहिजे. त्यांना माणूस म्हणून चांगले जगण्यास प्रवृत्त केले पाहिजे. झालेल्या घटनांचा इतिहास उगळत न बसता वर्तमानाशी झुंजून आपला भविष्यकाळ घडविला पाहिजे अशा प्रकारची प्रेरणा या व्यक्तींना बंदिस्त कारागृहात दिल्या पाहिजे. अर्थात ते काम सहायक पोलीस निरिक्षक मिथुन घुगे यांनी केले आहे. म्हणतात ना.! पुस्तकाने मस्तक सुधारं आणि जे मस्तक सुधारलेलं असतं ते कधीच कुणापुढे नतमस्तक होत नाही. म्हणून स्वाभिमानी आणि वैचारिक जिवणासाठी पुस्तक वाचणे फार महत्वाचे आहे. त्यासाठी घुगे साहेब यांनी अकोले तालुक्यातील जनतेला एक अवाहन केले होते. कारागृहात असणाऱ्या कैद्यांसाठी एक पुस्तक माणूस घडविण्यासाठी हा उपक्रम राबविला होता. त्यास नागरिकांनी उत्स्पुर्त प्रतिसाद दिला. त्यातून सामाजिक संस्था, काही लेखक आणि वैचारिक व्यक्ती यांच्याकडून 175 पेक्षा अधिक पुस्तके पोलीस लायब्ररीत जमा झाले आहेत. त्यामुळे, आता पोलीस व न्यायालयीन कोठडीत असणारे 45 ते 50 व्यक्ती ही पुस्तके वाचणार आहेत. या उपक्रमामुळे घुगे यांचे तालुक्यातील नागरिक आणि पोलीस अधिक्षक राकेश ओला तसेच अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर व पोलीस उपाधिक्षक सातव साहेब यांनी कौतूक केेले आहे.

         खरतर, नगर जिल्ह्यात असे काही पोलीस ठाणे आहेत. जेथे आरोपींना पत्त्या, मोबाईल आणि नको - नको त्या वस्तू पुरविल्या जातात. हे उघड देखील झाले असून कित्तेकदा कर्मचाऱ्यांचे निलंबन देखील झाले आहेत. म्हणजे, वाम मार्गाने तथा गुन्हेगारी वृत्तीने आत गेलेला व्यक्ती निट करण्याऐवजी तो अधिक वाम मार्गाला कसा जाईल असे खतपाणी घालणारे लोक देखील आहेत. तर, दुसऱ्या बाजुने पाहिले तर वाम मार्गाला गेलेले व्यक्ती चांगल्या मार्गावर कसे येतील यासाठी प्रचंड मेहनत घेणारे अधिकारी देखील आपल्याला परिचित आहेत. त्यास मिथुन घुगे यांचा नंबर लागतो. अर्थात नगर जिल्हा आणि राज्यात असे फार अधिकारी आहेत. मात्र, अकोले पोलीस ठाण्याच्या संदर्भात सांगायचे झाले. तर, पुर्वी अविनाश शिळीमकर साहेब जेव्हा अकोल्यात होते. तेव्हा त्यांनी असा उपक्रम राबविला होता. स्वरुप इतके समग्र नव्हते. पण, आत्महत्या करु पाहणाऱ्या व्यक्तींना त्यांनी त्यापासून प्रवृत्त केेले होते. त्यानंतर, अकोल्याला फारच संवेदनशिल आणि समाजभिमुख अधिकारी लाभले आहेत. त्यामुळे, घुगे यांचे आजवर आमदार, खासदार आणि अन्य समाजसेवक यांनी फारदा कौतूक केले आहे. परिमनामी अकोले पोलीस ठाण्यात कधी अनुचित प्रकार घडलेला नाही. नगर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका अकोले आहे. त्यात शहरात मिथुनजी अकेले आहेत. तरी देखील अवघ्या 51 कर्माचाऱ्यांवर त्यांनी येथे कधी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दिला नाही. ही कौतुकाचीच बाब आहे.

         वास्तवत: गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश झाल्यानंतर फार मोठमोठी मानसे डॉन होऊन गेली आहेत. मुंबईचे गुन्हेगारी विश्व पाहिले तर लक्षात येते. की, मन्या सुर्वे, करीम लाला, हाजी मस्तान, दाऊद, राजन आणि अगदी डॉडी (गवळी) पर्यंत यांना गुन्हेगारी सोडू वाटली. पण, तरी त्यातून त्यातून माघारी येता आले नाही. कित्तेकदा जगणं नको वाटलं पण मृत्यू आला नाही. त्यामुळे, काहींनी स्वत:ला संपवून घेतले. केवळ योग्यवेळी योग्य व्यक्ती भेटला नाही. चांगल्या व्यक्तींचे मार्गदर्शन लाभले नाही. वाईट व्यक्तींच्या संगतीपेक्षा पुस्तकांची संगत लागली नाही. म्हणून असले अनर्थ होत गेले. पुस्तकात काय पावर आहे हे  जयंती सारखे अनेक वैचारिक चित्रपट पाहिल्यानंतर लक्षात येते. तर, एका अविद्येमुळे काय काय अनर्थ झाले हे महात्मा फुले यांनी सांगितले आहे. त्यानंतरच्या काळात देखील वाचाल तर वाचल असा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संदेश दिला आहे. त्यामुळे, पुस्तकांची किंमत ही मिथुन घुगे साहेब यांना समजली आणि त्यांनी हा आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे.

   पुस्तकांनी वैचारिक माणूस घडतील.!

एक पुस्तक , कैदी वाचनालयासाठी, कैद्यांमधील  "माणूस घडविण्यासाठी हा उपक्रम फारच कौतुकास्पद आहे.एक पुस्तक माणसाचं आयुष्य बदलू शकतं असं म्हणतात. म्हणूनच हे विशेष वाचनालय खास कैद्यांसाठी सुरू केले याचा आनंद आहे. आपल्या घरातील असं एखादं पुस्तक आपण या वाचनालयासाठी भेट द्यावं ज्यायोगे कैद्याच्या आयुष्यात बदल घडण्यास आपणही हातभार लावावा या हेतूने आज या वाचनालयास जवळपास 50 पुस्तके  व एक कपाट रोटरी क्लबतर्फे भेट दिले आहे. तसेच अजून वरिष्ठ कार्यालयाशी संवाद साधून 50 हजार रुपयांची पुस्तके भेट देण्याचा प्रयत्न करणार आहे. पुस्तकामुळे मत व मन परीवर्तन होऊन जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडतो. कैद्यांमध्ये एक वेगळी भावना तयार झालेली असते. रिकामे डोके, शैतानाचे घर असते. त्यामुळे कैद्यांचा वेळ चांगल्या कामासाठी लागल्यास त्यांच्यात सकारात्मक भावना तयार होईल. या उपक्रमामुळे कैद्यांच्या जीवनात नक्कीच परिवर्तन होईल.

         -  अँड. बी.जे वैद्य (अकोले)

 माणूस घडविण्याचा मी प्रयत्न करत आहे.! 

व्यक्ती कोणताही असो, त्याला माणूस म्हणून जगता आले पाहिजे. त्यासाठी सर्वात प्रभावी गोष्ट कोणती असेल. तर ती पुस्तक आहे. आज जे काही व्यक्ती कारागृहात आहे. त्यांनी बाहेर आल्यानंतर जुन्या गोष्टी सोडून नव्याने आणि प्रचंड सकारात्मक दृष्टीने जिवणाकडे पाहिले पाहिजे. पुस्तक हे जगायला आणि संघर्ष करायला शिकविते. त्यामुळे, पोलीस कोठडी किंवा न्यायालयीन कोठडीत असताना एकाही व्यक्तींने नकारात्मक विचार न करता स्वत:च्या आयुष्याला कलाटणी कशी देता येईल याचा विचार केला पाहिजे. वाईट वेळ आयुष्यात प्रत्येकावर येते, चुका प्रत्येकाकडून होतात. मात्र, त्या वारंवार होऊ नये म्हणून वैचारिक दृष्टीकोण स्वत:मध्ये वृद्धींगत होणे आवश्यक आहे. त्यासाठी हा उपक्रम राबविला आहे. माझ्या आवाहनाला तालुक्यातील नागरिक, सामाजिक संस्था, तसेच राज्यातील विविध भागातील व्यक्तींनी प्रतिसाद दिला याचा मला मनस्वी आनंद आहे. आज 175 पेक्षा जास्त पुस्तके जमा झाली आहेत. तर, अनेक व्यक्तींनी पोलीस ठाण्याचा पत्ता घेतला असून काही पुस्तके पोष्टाने येणार आहेत. या उपक्रमाचा मी स्वत: पाठपुरावा करणार असून मला जे आपेक्षित आहे. जे उद्दिष्ठ आहे. ते मी साध्य करण्याचा प्रयत्न करणार आहे. मला प्रतिसाद देणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानतो.

      -  सपोनी मिथुन घुगे (अकोले पोस्टे)