बस-आल्टोच्या धडकेत मुख्याध्यापक व शिक्षक जागीच ठार.! अचानक भेट झाली अन थेट जीव घेऊन गेली.! दोघांचे मृत्यु, एक जखमी.!


सार्वभौम (अकोले) :- 

पारनेर तालुक्यातील धोत्रे फाटा येथे बस आणि आल्टो या दोन वाहनांचा अपघात झाला. यात अकोले तालुक्यातील नाचणठाव येथील कन्या शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचा मृत्यु झाला. ही घटना शुक्रवार दि. १७ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास घडली. यात मिलिंद दादाभाऊ बर्वे (वय ५०, रा. कोतुळ, ता. अकोले) व ईश्‍वरचंद्र पोखरकर (रा. कोतुळ) अशा दोघांचा जागीच मृत्यु झाला आहे. तर यातील अविनाश पवार हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही तिघे शैक्षणिक कामानिमित्त नगर येथे गेले असता काम आटोपल्यानंतर माघारी परतत असताना हा अपघात घडला. घटनेनंतर दोघांना टाकळी ढोकेश्‍वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. मात्र, तोवर उशिर झाला होता. तेथेच डॉक्टरांनी दोघांना मयत घोषित केले. ही घटना अकोले तालुक्यात समजली असता सर्वांना सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली.

याबाबत सविस्तर माहिती अशी. की, मिलिंद उर्फ नामदेव बर्वे हे नाचनठाव माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. शैक्षणिक कामानिमित्त ते सकाळीच त्यांच्या एम.एच १७ एझेड ३४९१ या आल्टो गाडीने नगरकडे निघाले होते. जाताना गाडीत फक्त बर्वे आणि त्यांच्या शाळेतील क्लार्क अविनाश पवार असे दोघेच होते. त्यांचा नगरपर्यंतचा प्रवास हा सुखकर झाला होता. तेथे गेल्यानंतर त्यांनी आपली कामे तत्काळ पार पाडली. लांबचा प्रवास असल्यामुळे दुपारी २ वाजेच्या दरम्यान ते माघारी निघणार तोच यांना ईश्‍वरचंद्र पोखरकर यांची भेट झाली. पोखरकर हे देखील अकोले तालुक्यातील कळंब येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे, त्यांना देखील नगरहून अकोल्याला यायचे होते.

दरम्यान, एकाच तालुक्यातील आणि एकाच मार्गाने जायचे असल्यामुळे बर्वे, पोखरकर आणि पवार यांनी आल्टो गाडीने परतीचा प्रवास सुरू केला. खरंतर अकोले तालुका आणि नगर हे अंतर फार असल्यामुळे आणि त्यात रस्ता प्रचंड खराब असल्याने त्यांनी पारनेर मार्गे अकोले जवळ करण्याचा प्रयत्न केला. अपघातापुर्वी तिघांच्या शैक्षणिक गप्पा चालु होत्या अवघ्या काही तासात त्यांनी टाकळी ढोकेश्‍वर पार केले आणि धोत्रे फाट्यावर असताना अचानक समोरुन बस आली. बस आणि आल्टो यांच्या अपघातात काही क्षणात होत्याचे नव्हते होऊन गेले. बस चालकाच्या बाजुने आल्टो धडकली आणि गाडीचा पुढून अक्षरश: चेंदामेंदा झाला. गाडी छोटी असल्याने पुढील बाजु न बघण्यासारखी झाली. तर, मागील काच देखील पुर्णत: फुटून गेली होती. त्यात मुख्याध्यापक मिलिंद बर्वे आणि ईश्‍वरचंद्र पोखरकर यांना जबरी मार लागला होता. तर पवार हे जखमी झाले होते.

दरम्यान, अपघात झाल्यानंतर स्थानिक मानसांनी तिघांना टाकळी ढोकेश्‍वर येथील रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्याचा काही फायदा झाला नाही. मात्र, पवार यांच्या पायाला गंभीर जखम झाल्याने त्यांना थोडेफार उमजत होते. मात्र, डोळ्याने इतका मोठा अपघात आणि त्यात दोघे उघड्या डोळ्यादेखत अशा आवस्थेत पाहिल्याने त्यांची काय परिस्थिती असेल. हे नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यानंतर पारनेर तालुक्यातील काही व्यक्तींनी संबंधित गाडीचे फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले. दोघे शिक्षक अकोले तालुक्याचे असून त्यांचा मृत्यु झाल्याची बातमी काही क्षणात अकोले तालुक्यातील व्हाटसऍप गृपवर सोशल मीडियातील वार्‍यासारखी पसरली आणि दोघांचे ओळख पटली. त्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र, तोवर फारच दु:खद घटना घडली होती. बर्वे हे आंबेडकरी चळवळीतील फार चांगले नाव होते. त्यामुळे, अनेकांनी त्यांच्याबाबत आश्रृ ढाळुन आपल्या भावना व्यक्त केल्या.