तहसिलदाराचा रगेल व रंगेलपणा, नाईट ड्युटीला मद्य पिवून त्या दोघींच्या अंगाहून अलगद हाथ फिरविला, गुन्हा दाखल.! नंतर लिहिला माफीनामा.!
सार्वभौम (अ. नगर) :-
कोरपगाव तालुक्याचे तहसिलदार हे नाईट ड्युटी करत असताना थेट ग्रामीण रुग्णालयात घुसले. तेथील महिला कर्मचाऱ्यांशी आर्वाच्या शब्दात बोलून थेट अधिकाऱ्यांवर इंग्रजी झाडत बिनडोक म्हणून तावतुगारी करु लागले. तुम्ही शासनाचा फुकटचा पगार घेताय का? तुम्ही दवाखाना सोडून घरी का गेलात, दोन तासात मला सर्वजण इथे पाहिजे असे म्हणत दवाखान्यात दहशत निर्माण केली. तर, जाताना तेथे उपस्थित असणाऱ्या एका महिलेच्या पाठीवर वाईट हेतून हात फिरवून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. हे साहेब येथेच थांबले नाही. तर, यांनी एका रुग्णाच्या मुलीस जवळ बोलावून असेच कृत्य केले. ही घटना शुक्रवाद दि. 25 फेब्रुवारी 2023 रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार कोपरगाव पोलीस ठाण्यात तहसिलदार विजय बोरुडे यांच्यावर विनयभंग, शिविगाळ, दमदाटी या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हा दाखल होताच कोपरगाव तहसिलदार बोरुडे यांनी जाहिर माफीनामा सादर केला आहे. नागरिकांना योग्य सेवा सुविधा मिळाव्यात म्हणून मी अशा प्रकारची झाडाझडती केली असे म्हणत काही चुकीचे गैरसमज झाल्यास दिलगिरी व्यक्त केली आहे.
या घटनेबाबत फिर्यादीत म्हटले आहे. की, दि. 24 ते 25 या कालावधित पीडित महिलेची रुग्णालयात ड्युटी होती. तिच्या सोबत आणखी एक पुरुष सहाय्यक होते. रात्री एका पेशन्टच्या इन्जक्शनची तयारी सुरु होती. सहायक व्यक्ती बाहेर बाकड्यावर बसलेला होता. त्यावेळी पहाटेचे 5 वाजले असावेत. तेव्हा अचानक दवाखान्याचा गेट कोणीतरी धाड-धाड वाजवत होते. म्हणून पीडित महिलेने तेथे उपस्थित असणाऱ्या व्यक्तीस गेट खोलण्यासा सांगितले. तो गेटकडे गेला आणि गेट उघडत असताना म्हणाला. की, मी गेट उघडत आहे. उगच वाजविता कशाला? तेव्हा या महोदयांनी अगदी फिल्मी स्टाईलने आत ऐन्ट्री करुन येथील इन्चार्ज कोण आहे? त्यांना बोलवा अशी सुचना केली. तेव्हा पीडित व्यक्तीने विचारले तुम्ही कोण आहे. त्यावर हिरोगिरी करणारे महोदय म्हणाले. मी तहसिलदार आहे तुमच्या मेन अधिकाऱ्यांना बोलवा. तेव्हा पीडित महिला म्हणाली. की, डॉक्टर क्वॉर्टरमध्ये आहेत. पेशन्ट आले की मी त्यांना बोलवत असते. ते ही लगेच येतात. तेव्हा तहसिलदार म्हणाले. की, त्यांना फोन लावा आणि लगेच बोलवा. तेव्हा पीडितेने तत्काळ फोन लावला आणि गाढ झोपलेल्या डॉक्टरांची झोप मोडत निरोप दिला. परंतु, नशेने तरर्र झालेल्या महोदयांनी महिलेच्या हातातून थेट मोबाईल हिसकवून घेतला आणि फाड,फाड, फाड इंग्रजी बोलायला सुरुवात केली.
बिनडोक, शासनाचा फुकटचा पगार घेता का, तु दवाखाना सोडून का व कोणाला विचारुन घरी गेला? मला दोन तासात सर्व डॉक्टर दवाखाण्यात उपलब्ध पाहिजे असे म्हणून त्यांनी मोबाईल फोन कट केला व पीडित महिलेच्या हाती दिला. त्यानंतर तेथे जो सहायक उभा होता. त्याला तहसिलदार यांनी बाहेर काढून दिले आणि पीडितेकडे ड्युटी चार्ट मागितला. तिने कर्मचारी ड्युटी चार्ट दिला असता तहसिलदार भडकले आणि म्हणाले. मला हा नको, डॉक्टरांचा हवा आहे. त्यावर पीडितेने उत्तर दिले. की, आमच्याकडे तो चार्ट नाही. तो डॉक्टरांकडेच असतो. तेव्हा तहसिलदार महोदय यांनी मोठ्या उर्मटपणे हातातील कर्मचाऱ्यांचा चार्ट फेकून दिला. त्यानंतर तहसिलदार विजय बोरुडे हे उठले आणि पीडित महिलेच्या जवळ गेले. तिच्या पाठीहून अलगद हाथ फिरवून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. ते जेव्हा जवळ आले. तेव्हा त्यांच्या तोंडाचा वास येत होता. त्यांनी मद्य पिल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. आता हा प्रकार येथेच थांबला नाही. तर, बोरुडे यांनी एका पेशन्टच्या सोबत असणाऱ्या नातेवाईक मुलीवर देखील अशाच पद्धतीने हात फिरविला. त्यानंतर ते पुन्हा पिडीतेजवळ गेले आणि म्हणाले. की, दवाखाने तपासा असा कलेक्टर साहेबांचा आदेश आहे. त्यामुळे, मी दारु पिवून येथे आलो होतो. याची जर कोठे वाच्चता केली. तर, मी पाहतो तुम्ही येथे नोकरी कशी करता. आता सर्व डॉक्टर दवाखान्यात हजर ठेवा असे म्हणत ते शिविगाळ करत दवाखान्यातून निघून गेले. असे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.
मी त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो.
दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर तहसिलदार बोरुडे यांनी लेखी पत्राद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, मी व्हिजीट करत असताना कोपरगाव शहर आणि ग्रामीण येथे भेट दिल्या, त्यानुसार ग्रामीण रुग्णालयास देखील भेट दिली. तेथे रुग्णांना योग्य सेवा मिळतेय का? कर्मचारी, अधिकारी कामावर हजर राहतात का यासाठी तेथे गेलो होतो. मात्र, तेथील अधिकारी व कर्मचारी यांना माझे बोलणे चुकीचे वाटले. परंतु, मी खात्रीशिर सांगतो. की, माझा हेतू वाईट नव्हता. रुग्णांना सेवा मिळावी याच प्रामाणिक हेतूने मी तेथे गेलो होतो. मात्र, माझे बोलणे चुकीचे वाटले असेल. किंवा कोणाच्या भावना दुखावल्या असतील. तर, प्रशासन प्रमुख म्हणून माफी मागण्यात मला कोणताही कमीपणा वाटणार नाही. मी प्रशासकीय प्रमुख अधिकारी म्हणून मी सेवेत कायम तत्पर आहे आणि राहिल. परंतु, जे काही गैरसमझ झाले आहेत. त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो.
विजय बोरुडे (कोपरगाव तहसिलदार)
पहा हे तुम्हाला पटतय का.!
दरम्यान, नाईट पेट्रोलिंग असो व ड्युटी, यावेळी अनेक अधिकारी व कर्मचारी मद्यपान करतात असे वारंवार आरोप होतात. ते किती खरे आणि किती खोटे हा भाग नंतरचा आहे। मात्र, अशा प्रकारे खरच अधिकारी कोणाचा विनयभंग करतील का? धाड-धाड गेट वाजवून कोणी छेडछाड करायला जाईल का ? किंवा प्रतिष्ठीत व जबाबदार अधिकारी असे कृत्य करु शकतात का? असे अनेक प्रश्न आहेत. खरं काय आणि खोटं काय, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. यात समोपचाराने मार्ग निघेल ना निघेल हा देखील नंतरचा विषय. मात्र, असे झाले तर अधिकारी खरोखर प्रामाणिकपणे काम करतील का? बदनामी आणि नको त्या आरोपामुळे प्रशासनावर वचक ठेऊ शकतील का? या प्रकरणाचा फायदा घेऊन असाच पायंडा जिल्ह्यात आणि राज्यात पडणार तर नाही ना? याचा सखोल विचार करणे गरजेचे आहे. कारण, लोकशाहीला टिकवायचे असेल तर नाण्याच्या दोन्ही बाजू तपासून पाहिल्या पाहिजे. तर, सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी स्वयंप्रेरणेने व्यसनमुक्त झाले पाहिजे.