४१ वर्षीय शिक्षकाचे २१ वर्षीय मुलीवर प्रेम.! नकार देताच दगडाने ठेचून केली हत्या, अकोल्यात तिघांना अटक.!
सार्वभौम (राजूर) :-
इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथे राहणार्या एका २१ वर्षीय तरुणीची प्रेमाच्या कारणातून हत्या झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हत्या करणारा हा ४२ वर्षीय शिक्षक असून त्याने प्रचंड शांत डोक्याने मित्रांच्या मदतीने ही हत्या केली आहे. मुलीस नोकरीचे कारण सांगून बनावट जॉब ऑफर केली आणि तिला ठाणे तालुक्यातील किनवली परिसरात नेवून दगडाच्या खाणित टाकून दिले. ही घटना जानेवारी २०२३ मध्ये घडली असून राजूर पोलिसांनी यात मुुख्य आरोपीसह तिघांना अटक केली आहे. भारती दत्तु खाडे (वय २१, रा. वासाळी, हल्ली शेंडी) असे मयत मुलीचे नाव आहे. तर, मुख्य आरोपी दत्तु धोंडू डगळे (वय, ४२, रा. वासाळी, ता. इगतपुरी) मनोहर पुनाजी कोरडे (रा. नाशिक) व अमोले शांताराम गोपाळ (रा. वासाळी, ता. इगतपुरी) अशा तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. हा गुन्हा अकस्मात मृत्यु म्हणून नोंद होईल आणि सगळं दडपून जाईल असे आरोपींना वाटत होते. मात्र, राजुरचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे यांनी या गुन्ह्याची उकल केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, मयत मुलगी आणि डगळे हे दोघे एकाच गावचे आहेत. मात्र, डगळे हा शिक्षक असून त्याचे वय वर्षे ४२ आहे. असे असताना देखील त्याची नियत फिरली आणि तो अवघ्या २१ वर्षाच्या मुलीवर प्रेम करु लागला. दोघे एकमेकांशी तात्विक बोलत होते. मात्र, याहून मुलीच्या घरच्यांना शंका आली आणि त्यांनी तिला कधी मोबाईल दिला नाही. त्यामुळे, या बेजबाबदार शिक्षकाचे प्रेम उतू चालल्याने त्याने एक शक्कल लढविली. गावातील अमोल गोपाळ आणि आणखी एक मित्र मनोहर कोरडे याच्या मदतीने तिच्या घरच्यांच्या मोबाईलवर फोन केला. तुमच्या मुलीस ठाण्यातील चांगल्या कंपनीत जॉब मिळणार आहे. त्यामुळे, तिला मुलाखतीसाठी पाठवून द्या असे सांगून त्यांची फसवणूक केली.
दरम्यान, मुख्य आरोपी डगळे याने तिला अशा प्रकारे घरातून काढले आणि तिला ठाण्याला नेले. तेथे त्यांच्यात काही चर्चा झाल्या. मात्र, मुलीने त्याच्या काही गोष्टींना नकार दिला. मुलीच्या विरोधामुळे त्याला राग आला आणि त्याने तिला ठाणे ग्रामीणमध्ये असणार्या साकुर्ली येथे नेले. तेथे देखील त्यांच्यात वाद झाला आणि तेथेच डगळे या शिक्षकाने तिच्या डोक्यात मोठा दगड टाकून तिची हत्या केली. या घटनेनंतर या तिघांना असा काही अविर्भाव गाजविला. की, आम्ही काही केलेच नाही. दरम्यान, राजूर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून झाली. या मुलीस ह्रदयविकाराचा झटका आला असे म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र, मुलीचे नातेवाईक या घटनेचा वारंवार पाठपुरावा करीत होते. त्यामुळे, पोलिसांनी त्यांची हकीकत ऐकून घेत तपासाला सुरूवात केली होती.
दरम्यान, या घटनेप्रकरणी ठाणे ग्रामीण येथील किनवली पोलीस ठाण्यात कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल होता. मुलीची माहिती मिळत नव्हती त्यामुळे, गुन्ह्याचा तपास सुरू होता. जेव्हा ठाणे पोलीस अधिकारी बच्छाव आणि राजूर पोलीस यात तपास करीत होते. तेव्हा समांतर तपासात मुलीची ओळख पटली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक इंगळे यांनी तपासाला अधिक गती दिली. मोबाईलचा सीडीआर, एसडीआर तपासून अधिक टेक्नीकल बाबी तपासण्यात आल्या. त्यानंतर पहिल्यांदा एक आरोपी ताब्यात घेतला. त्यानंतर त्याने दुसर्याचे नाव सांगितले आणि तिसर्याने मुख्य सुत्रधाराचे नाव सांगितले. अशा प्रकारे घटनाक्रम उघड झाला. यात शिक्षक दत्तु डगळे याचे कारनामे उघड झाले. त्यास राजूर पोलिसांनी आता बेड्या ठोकल्या आहेत. तर, यात मुलीच्या नातेवाईकांनी फार मोठा पाठपुरावा करुन आपल्या मुलीस न्याय मिळून देण्याचे काम केले आहे. ही कामगिरी सपोनी इंगळे यांच्यासह कर्मचारी डगळे, वर्पे, ढाकणे, गाडे, मुंडे कॉन्स्टेबल यांनी केली.