गणोरे ग्रामसभेत फुल राडा, उपसरपंचावर आरोप, चेअरमनला धक्काबुक्की, १५ जणांवर गुन्हे दाखल.! टाकी चोरली कोणी?
सार्वभौम (अकोले) :-
अकोले तालुक्यातील गणोरे ग्रामपंचायतीची पाण्याची टाकी चोरीली कोणी? याहून चर्चा चालु होती. मात्र, ग्रामपंचायतीचा विषय सोडून मध्येच एकाने सोसायटीचा विषय काढला आणि चेअरमन साहेबांना लक्ष केले. त्यामुळे, भलताच वाद पेटला आणि दोन गटात तुफान राडा झाला. ही घटना दि. २६ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता गणोरे ग्रामपंचायतीच्या सभेत घडली. यात परस्पर विरोधी १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे, कधी जातीयवाद, तर कधी शेजारील गावांशी वाद, कधी राडे तर कधी दोन गटात तुफान हाणामार्या त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने गणोरे गावाचे नाव बदनाम होत चालल्याचे बोलले जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. २६ जानेवारी २०२३ रोजी गणोरे गावात कायदेशीर ग्रामसभा भरली होती. अजेंड्यावर असणारे विषय झाल्यानंतर ऐनवेळी विषयांवर चर्चा सुरू झाली आणि गावातील पाण्याच्या टाकीवर विषय येऊन ठेपला. तेव्हा एका व्यक्तीने सरपंचास प्रश्न केला. की, पाण्याच्या टाक्या चोरी गेल्या होत्या, त्याबाबत अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केला होता त्याचे काय झाले? त्यावर उत्तर देताना सरपंच महोदय म्हणाले. की, सदर टाकी ही उपसरपंच प्रदिप रावसाहेब भालेराव यांच्या सांगण्याहून त्यांच्याच घरी नेवून ठेवली आहे असे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे, गावातील लोक म्हणाले. की, उपसरपंच यांनी चोरी केली आहे. तर, मग त्यांनी पदाचा राजिनामा द्यावा.
दरम्यान, ग्रामपंचायतीचा विषय सुरु असताना अचानक प्रदिप रावसाहेब भालेराव, विवेक रामदास शिंदे, गंगाधर एकनाथ आंबरे, तुषार राधाकिसन आंबरे, प्रताप रामचंद्र आंबरे (सर्व रा. गणोरे, ता, अकोले) हे सभेतून उठले आणि अशोक गांगाधर आहेर यांच्यावर वैयक्तीक आकसापोटी सोसाटीहुन वेगवेगळे आरोप करुन लागले. अशोक आंबरे हे त्यांना समजून सांगत असताना आरोपी सर्वजण त्यांच्यावर धावून गेले. त्यांना शिविगाळ, दामदाटी करुन धक्काबुक्ती केली. तर, आमच्या नादाला लागला तर तुझे पाय तोडून टाकू अशा प्रकारची धमकी दिली. मात्र, या दोघांमध्ये भाऊसाहेब चव्हाण, रावसाहेब आहेर, बाळासाहेब आहेर यांनी मध्यस्ती केली म्हणून दोन गटातील वाद क्षमला. मात्र, त्यानंतर अशोक आंबरे यांनी सामंजस्याची भुमिका म्हणून आरोपी यांनी तंटामुक्ती समोर बोलाविले होते. मात्र, आरोपींकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर आहेर यांनी थेट पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
...तर, विवेक रामदास शिंदे (रा. गणोरे) यांनी परस्पर दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. की, दि. २६ जानेवारी २०२३ रोजी गणोरे गावात ग्रामसभा भरली होती. तेथे ग्रामसभेला संबोधित करीत असताना गावात चोर्या झाल्या होत्या. त्याचे काय झाले असे विचारले असता अशोक गांगाधर आहेर, सुनिल गंगाधर आहेर, मधुकर सावळेराम दातीर, रावसाहेब राजाराम आहेर, गोरख राजाराम आहेर, समर्थ रामनाथ दातीर, दत्तात्रय कैलास आंबरे, बाळासाहेब राजेंद्र आहेर, सौरभ सुनिल आहेर, सागर चव्हाण (सर्व रा. गणोरे) यांनी शिंदे यांना लाथाबुक्क्य व चापटीने मारहाण केली. तु गावात कसा राहतो, तु गावात येऊन दाखव अशी धमकी दिली. तेव्हा ग्रामसभेला उपस्थित असणार्या संजय आंबरे, मच्छिंद्र आंबरे यांनी शिंदे यांची सोडवणुक केली. त्यानंतर शिंदे यांनी १० जणांवर अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, गणोरे गावात अशा पद्धतीने वाद होणे म्हणजे फार लज्जास्पद आहे. यापुर्वी देखील पिंपळगाव निपाणी येथील गोर्डे यांच्याशी वाद आणि नंतर माफीनामा, त्यानंतर जातीय तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे कृत्य घडले आणि आता पुन्हा राडा. त्यामुळे, गावात शांतता नांदतेय की नाही? असा प्रश्न निर्माण होतो. महत्वाचे म्हणजे २०१२ पासून ग्रामसेवक म्हणून एकनाथ ढाकणे यांनी ग्रामपंचायतीत पर्णकुटी बांधून ठेवली आहे. तब्बल १२ वर्षे त्यांची तेथे तपश्चर्या सुरू आहे. मात्र, तरी देखील ग्रामसभेत असे राडे होणे, टाक्या चोरी जाणे, भ्रष्टाचाराचे आरोप होणे? हे संयुक्तीक वाटते का? विशेष म्हणजे इतकं सगळं होऊन देखील ग्रामसेवक म्हणतात ग्रामसभा संपल्यानंतर तो राडा झाला. मग, ग्रामसभेत ऐनवेळी येणारे मुद्दे हा ग्रामसभेचा भाग नसतो का? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. यावर गटविकास आधिकारी दखल घेतील अशा अपेक्षा आहे. अन्यथा काही व्यक्ती थेट ग्रामविकास मंत्र्यांकडे यावर तक्रार करणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
टाकी चोरली कोणी?
गणोरे गावातील स्मशानभुमी येथे एका हजार लिटरची टाकी होती. ती २०२२ मध्ये चोरी गेल्याची फिर्याद कलम ३६९ अन्वये अकोले पोलीस ठाण्यात दाखल आहे. मात्र, यात चोर कोण? हे स्पष्ट नव्हते. त्यामुळे अज्ञात व्यक्तीच्या नावे गुन्ह्याची नोंद आहे. मात्र, जेव्हा या घटनेची चौकशी सुरू झाली. तेव्हा अचानक टाकीला पाय फुटले आणि टाकी मिळाली. मात्र, कोणी चोरली आणि का? यावर पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, यात काही व्यक्तींचे जबाब नोंदविले गेले असून त्यात गावच्या प्रतिष्ठीत व्यक्तीचे नाव समोर येत आहे. याबाबत पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्याशी संपर्क केला असता. त्यांना सांगितले. की, काही जबाब नोंदविले असून अधिक माहिती व चौकशी सुरू आहे. मात्र, यात आम्ही आरोपी निष्पन्न केल्यानंतर लवकरच गुन्ह्याची उकल करणार आहोत.