ऊसतोड्याचे ९ वीच्या मुलीवर प्रेम जडले.! म्हणे फक्त एकदा भेट, मग काय, पालत जाऊन ठोकला.! गुन्हा दाखल..


सार्वभौम (अकोले) :- 

घराजवळील शेतात ऊसतोड आली असता एक तरुण रोेज शेजारी पाणी मागण्यासाठी जात होता. तेथे इयत्ता ९ वीत शिकणार्‍या मुलीवर त्याचे प्रेम जडले. दोघांमध्ये फोनवर चर्चा देखील होऊ लागल्या. मात्र, प्रियकराला तो विरह काही सहन होईना. म्हणून त्याने थेट प्रपोज केला आणि तिला प्रेम करण्यास प्रवृत्त करु लागला. मात्र, मुलीने याबाबत वडीलांना माहिती दिली आणि ऊसतोड्या मुलाचा चांगलाच समाचार घेतला. ही घटना मे २०२२ पासून ते दि. २७ जानेवारी २०२३ या दरम्यान अकोले तालुक्यातील मेहेंदुरी शिवारात  घडली. यात ऋषी ऊर्फ विकास संजय शिंदे (रा. खरवंडी, ता. नेवासा) याच्यावर अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरोपी ऋषी शिंदे हा उसतोड करण्यासाठी नेवासा तालुक्यातून अकोल्यात आला होता. ऊसतोड झाल्यानंतर गाडी भरण्यासाठी ते मेहेंदुरी परिसरात थांबत असे. दरम्यान, पाणी हवे म्हणून तो पीडितेच्या घरी जाई आणि तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करीत असे. पीडित मुलगी ही इयत्ता नववीच्या वर्गात असल्यामुळे ती शिंदेच्या बोलण्याबाबत अनभिज्ञ होती. मात्र, वारंवार पाणी आणण्यासाठी जाणे आणि तिच्याकडे वाईट नजरेने पाहणे हे त्याचे कायमचे झाले होते. मे २०२२ रोजी त्यांची पहिल्यांदा भेट झाली होती. त्यानंतर तो कायम त्याच परिसरात गाडी लावत होता.

दरम्यान, त्याने पीडित मुलीला त्याचा मोबाईल नंबर दिला आणि मला फोन करत जा असे म्हणून त्याने तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलीने कधी आपल्या वडिलाच्या तर कधी चुलतीच्या मोबाईलहून त्याच्याशी संपर्क केला. त्यांच्यात बोलणे होत होते. मात्र, नंतरच्या काळात तो तिला भेटण्यासाठी अग्रह करु लागला. मात्र, मुलीने त्यास नकार दिला. मला तुझ्याशी खुप काही बोलायचे आहे, माझे तुझ्यावर प्रेम आहे, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. अशा प्रकारे मुलीस त्याने गोंधळुन टाकले होते. मात्र, तरी देखील लहान असणार्‍या मुलीने त्यास समजून सांगितले. की, मी अजून लहान आहे, शाळेत जाते. त्यामुळे, असा काही विचार करु नको. मित्र म्हणून किंवा ओळख म्हणून ठिक आहे. मात्र, भेटणे आणि बोलणे शक्य नाही.

मुलीचे असले बोलणे आणि वारंवार टाळाटाळ करणे यामुळे मुलगा तिला धमक्या देऊ लागला. मला फोन केला नाही किंवा भेटली नाही तर तुझ्या वडिलांचे काय करायचे ते मी करेल असे म्हणून तिला ब्लॅकमेल करु लागला. त्यामुळे, एकीकडे घरच्यांची भिती आणि दुसरीकडे त्यांचीच काळजी यात मुलगी घाबरुन गेली होती. तु जर मला फोन केला नाही तर मी तुझ्या घरी येईल आणि तुझ्या वडिलांशी बोलेल त्यामुळे, मुलीला भिती वाटत होते. म्हणून ती त्याच्याशी बोलत असेे. मात्र, तरी देखील त्याला हेच समजून सांगत होती. मात्र, मुलाने तिला वारंवार धमकावल्याने ती घाबरुन गेली होती. हे सर्व काही तिच्या विचारांच्या आणि सहनशिलतेच्या पलिकडे चालले होते. शाळेत देखील तिचे मन लागत नव्हते. आपल्या घरच्यांना समजले किंवा त्याने खोटेनाटे काही सांगितले तर काय होईल यामुळे ती घाबरुन गेली होती. मात्र, तिने धाडस करुन घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला आणि त्यांनी थेट त्याच्या थळावर जाऊन त्याचा समाचार घेतला. त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन ऋषी ऊर्फ विकास संजय शिंदे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

तर माणुसकी मरुन जाईल.! 

खरंतर सामाजिक भावना ठेऊन एखाद्याला पाणी देणे आणि त्याच घरावर एखाद्याने वाईट नजर ठेवणे हे योग्य नाही. विशेष म्हणजे १५ वर्षाच्या बालिकेवर अशा पद्धतीने भावनिक अत्याचार करणे हे नैतिकदृष्ट्या चुकीचेच आहे. असे झाले तर कोणी कोणाला मदत करणे संयुक्तीक राहणार नाही. विशेष म्हणजे, आपण रात्री अपरात्री एखाद्याला गाडीत घेतो आणि तोच व्यक्ती आपल्याला चाकू सुरे लावून लुटतो. त्यामुळे, आजकाल कोणी कोणाला लिफ्ट देत नाही. चांगल्या भावना अशा अंगलट येऊ लागल्या तर समाजातील माणुसकीच्या भावना मरुन जातील आणि कोणी कोणास मदत करणार नाही. त्यामुळे, वाईट कृत्य करताना सज्ञान व्यक्तींनी एक वेळा नव्हे.! हजार वेळा विचार करणे गरजेचे आहे.