अकोल्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही अध्यक्ष व कार्याध्यक्षांसह अनेकांचे तडकाफडकी राजिनामे.! नैतिकता, छे.! ही आमदारांवरील नाराजी.!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
असे म्हणतात की, यश मिळणे जितके कठीण असते त्यापेक्षा ते टिकविणे फार कठीण असते. अगदी तसेच अकोले तालुक्यात पहायला मिळत आहे. २०१९ साली राष्ट्रवादीला यश मिळाले खरे. मात्र, आमदारांपासून ते त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत ते कोणालाच पचणी पडले नाही. कधी आमदारांच्या विरोधात कार्यकर्ते बारामतीपर्यंत गेले. तर कधी मी जनतेत आहे असे म्हणून आमदारांनी सगळ्यांना कोलुन दिले. मध्येच भाजपातून एका टोळीने आपला डेरा पुन्हा राष्ट्रवादीत दाखल केला. तर, काहींना या पक्षात यायचे होते परंतु त्यावर सहकरी पक्षांनी निर्बंध घातले. त्यामुळे, राज्यात महाविकास आघाडी झाली खरी. परंतु अकोल्यात तो एकोपा दिसून आला नाही. याचे चित्र आपण दुधसंघ आणि नगरपंचायत निवडणुकीत पाहिले. वास्तवत: आमदारांचा स्वाभाव, येथील प्रस्तापित नेते, जनतेच्या आपेक्षा आणि कार्यकर्त्यांची वारंवार झालेली निराशा. यामुळे, राष्ट्रवादी पक्ष वाढू शकला नाही आणि स्वत:ची ओळख देखील कायम ठेऊ शकला नाही. परीनामी झाले काय? कार्यक्रमांना खुर्च्या रिकाम्या, निवडणुकांमध्ये अपयश, सततची नाराजी आणि आमदारांची एकला चलो रे ही भुमिका अशा अनेक घटना कार्यकर्त्यांना मरगळ देऊन गेल्या. आता पदाधिकारी राजिनामे देताना निवडणुकांच्या अपयशाचा निर्वाळा देतील आणि नैतिक जबाबदारी म्हणून मनातल्या वेदना दाबून ठेवतील. मात्र, उपरोक्त कारणे हिच राजिनाम्यांची कारणे असतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
हे कार्यकर्त्यांचे अपयश.!
ज्या पद्धतीने जनतेने राष्ट्रवादी पक्षाला मतदान केले होते. त्या पद्धतीने आमदार डॉ. किरण लहामटे यांनी शंभर टक्के त्या पदाला न्याय देण्याचे काम केले आहे. साहेब २४ तास पळण्याची क्षमता ठेऊन काम करताना या तालुक्याने पाहिले आहे. त्यांनी पाचशे कोटी रुपयांचा निधी आणून अनेक कामे केली आहेत. मात्र, ती कामे जनतेपर्यंत पोहचविण्यात त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अपयशी ठरले आहेत. मुळात कार्यकर्त्यांना बळ मिळणे म्हणजे ठेकेदारी होय.! रोजगार होय, पण तोच हेतू ठेऊन जर राजकारण असेल तर तो कार्यकर्ता होऊच शकत नाही. यात विशेष म्हणजे आमदारांना गाड्यांचा ताफा, बॅनरबाजी, घोषणाबाजी, उदोऊदो, मागेपुढे लोंडा घोळणारे नेते-कार्यकर्ते आवडत नाहीत. पक्ष आणि लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाणे त्याला आपलसं करणे त्यासाठी २४ तास पळण्याची तयारी ठेवणे हाच त्यांच्या कामाचा अजेंडा आहे. फुकट आणि इतकं पळण्याची मानसिकता कोण्या कार्यकर्त्यांमध्ये आजवर निर्माण होऊ शकली नाही. त्यामुळे, मी नेता-कार्यकर्ता आहे. पण, माझा फायदा काय? मला उपयोग काय? याच धारणेने अनेकांनी पक्षात राहुन झेंडे टाकून दिले.
ती लोकं नेमकी गेली कोठे?
जेव्हा पक्षात कोणी शिल्लक राहिले नव्हते. तेव्हा महेश तिकांडे सारखा कार्यकर्ता पुढे आला. त्याच्यासोबत अनेकजण जोडले गेले. पुढे सुरेश खांडगे (उपजिल्हाध्यक्ष), संपतराव नाईकवाडी, अरुणभाऊ रुपवते (उपाध्यक्ष), संदिप शेणकर, बाळासाहेब आवारी, भाऊसाहेब साळवे यांच्यासह अनेकांची नावे घेता येतील. पक्षात ज्येष्ठ म्हणून यांनी कामे पाहिली. मात्र, झालं काय? गायकर गट पक्षात दाखल होण्यापुर्वीच राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि आमदार महोदय यांच्यात मतभेद पहायला मिळत होते. मात्र, नंतरच्या काळात हे लोक आता पक्षात शोधून सापडत नाहीत. त्यामुळे, संघटन, निष्ठा, पदनिच्छिती, मतभेद आणि मनभेद यात कोठेही साम्य असल्याचे पहायला मिळत नाही. विशेष म्हणजे ज्यांनी पक्षासाठी कामे केली. त्यातील अगदी बोटावर मोजता येतील अशी मानसे पक्ष सोडून विरोधकांना मिळाली. मात्र, जी अदृश्य आहेत ती नामशेष नसून फक्त या व्यवस्थेला थिर होऊन स्थिर झाली आहेत. त्यांच्यात पुन्हा राष्ट्रवादीचा प्लाझ्मा भरणे गरजेचे आहे.
ते ह्या आमदारांना जमलेच नाही.!
संघटन हे एकमेकांना धरुन होत असते. त्यासाठी कार्यकर्ते उभे करावे लागतात, त्यांना बळ द्यावे लागते. तो चुकला तरी त्याला संभाळून घ्यावे लागते. ज्यांची पात्रता आहे त्यांना कामे द्यावी लागतात, ज्यांना आडचणी आल्या त्यांच्या पाठीशी उभे राहवे लागते. प्रत्येक कार्यकर्त्याला त्याच्या-त्याच्या गावात का होईना मान सन्मान देणे आवश्यक असते. काहींना पैसे, कामधंदा आणि प्रतिष्ठा नको.! पण, पाठीवर हात ठेऊन लढ म्हणण्याची उर्जा आवश्यक असते. सगळेच कार्यकर्ते सचिन नरवडे यांच्यासारखे उच्च पदे घेऊन स्वयंभू नसतात. फाटका का होईना, पण तो कार्यकर्ता एकसंघ ठेवण्यात आमदारांना जमले नाही. स्वत:चा स्वभाव आणि काही तत्वे यांच्याशी तडजोड करता आली नाही. मी जनतेत आहे, मला नेते आवडत नाही, मी कोणासाठी लवचिक होणार नाही. मी कामे करतोय त्यावर लोक मला पुन्हा पदरात घेतील असे म्हणून त्यांनी स्वत:जवळ असणार्या निष्ठावान कार्यकर्त्यांना देखील जवळ ठेवले नाही. अशा अनेक कारणास्तव साहेबांपासून मानसे दुर होत गेली. त्याचा तोटा त्यांना आत्ता नाही. पण, येणार्या काळात फार प्रकर्षाने जाणवणार आहे.
पुरुष व महिला अध्यक्षांचे राजिमाने.!
सन २०१९ पासून तालुकाध्यक्ष म्हणून भानुदास तिकांडे यांनी काम पाहिले. पहिल्यांदा या पदासाठी अनेकांनी कंबर कसली होती. मात्र, बारामतीहून फिल्डींग लागली आणि या नावावर शिक्कामुर्तब झाले. त्यानंतर त्यांच्या विषयी काही आतृप्त आत्म्यांनी फार मोठे रान पेटवून त्यांना खाली खेचण्याचा प्रयत्न केला. त्या पदावर विराजमान होण्यासाठी अनेकांनी डावपेच खेळले. मात्र, ते नाही तर दुसरे कोण? आणि राष्ट्रवादीच्या कोणत्या गटाचे? असे अनेक प्रश्न आमदारांपुढे होते. त्यामुळे, शांत, संयमी आणि सगळ्यांची मोट बांधून ठेवण्याचा प्रमाणिक प्रयत्न करणार्या तिकांडे यांची खुर्ची कोणी लोभी काढू शकला नाही. मात्र, नगरपंचायत गेली आणि आता दुधसंघ देखील गेला. त्यात अनेकांची नाराजी, विशेष म्हणजे त्यांना देखील काही गोष्टींतून वारंवार डावलले जात होते. त्यामुळे, झालेली सेवा पक्षाला अर्पन करुन आता फक्त राष्ट्रवादी निष्ठेचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. तर, महिला तालुकाध्यक्ष स्वातीताई शेणकर यांनी अत्यांत प्रमाणिकपणे काम करुन फार मोठे महिला संघटन उभे केले होते. त्यांच्याइतके काम येणार्या काळात कोणी इतक्या निष्ठेने आणि जिद्दीने करेल असे वाटत नाही. त्यामुळे, त्यांनी राजिनामा दिल्यानंतर त्यांच्यासोबत असणार्या सर्वच महिलांनी पदांना बायबाय केला आहे. ही राष्ट्रवादीची अंतर्गत नाराजी येणार्या काळात पक्षाला फार घातक ठरण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.