लोकनेते अशोकराव भांगरे यांचे निधन.! अचानक बातमी समजल्याने तालुक्यावर शोककळा.!

सार्वभौम (अकोले) :-

      अकोले तालुक्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा अगस्ति सहकारी साखर कारखान्याचे व्हा-चेअरमन अशोकराव भांगरे यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज दि. १२ जानेवारी २०२३ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. भांगरे यांना शुगर आणि अन्य काही किरकोळ आजार होते. त्यावर उपचार देखील चालु होते. मात्र, आज दुपारी त्यांना बरे वाटत नव्हते. त्यांना एसएमबीटी रुग्णालयात दाखल केले होते. तेव्हा रात्री त्याना अचानक ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी अखेरचा श्‍वास सोडला. ही घटना समजल्यानंतर अनेकांच्या काळजाचे पाणी पाणी झाले असून अद्याप असे काही घडले नाही किंवहुना असे घडू शकत नाही असे अनेकांना वाटत होतेे. मात्र, त्यांच्या कुटुंबियांनी ही दु:खद माहिती तालुक्यातील जनतेला दिली आहे. त्यांच्यावर दि. 13 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता अकोले तालुक्यातील शेंडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, भागंरे साहेब यांना दोनतीन दिवसांपासून बरे नव्हते. व्हायरल इन्फेक्शन असेल म्हणून त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या देखील घेतल्या होत्या. नेहमीप्रमाणे आजारी पडलो असेल. किंवा सध्या थंडीचे वातावरण असल्यामुळे सर्दी खोकला झाला असेल अशा प्रकारची चर्चा खुद्द माझ्याशी झाली होती. उद्या बरे वाटेल असे म्हणून ते उद्या अगस्ति कारखान्यात होणार्‍या मिटींगसाठी येणार असे देखील सांगितले होते. मात्र, आज दुपारपासून त्यांना जरा अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे, त्यांनी घोटी येथील एसएनबीटी रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, घरी असतानाच त्यांना त्रास होऊ लागला होता. त्यांना गाडीत टाकून नेले तेव्हा त्यांच्यासोबत असणार्‍या मुलांनी त्यांची छाती चोळली. त्यांच्यावर प्राथमीक उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भांगरे साहेबांकडून फार प्रतिसाद मिळाला नाही. तरी देखील त्यांनी मोठ्या धैर्याने रुग्णालय गाठले. तेथे गेल्यानंतर डॉक्टरांनी उपचार सुरू केले. मात्र, त्यावर देखील फार काही फरक झाला नाही. डॉक्टरांच्या परीने जे काही प्रयत्न आवश्यक होते. ते त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्रीपर्यंत त्यांना यश आले नाही.

रात्री ९ वाजण्याच्या सुमारास त्यांची तब्बेत अधिक खालावली आणि त्यांनी प्रतिसाद देणे बंद केले. तरी देखील डॉक्टर आणि भांगरे कुटुंबियांनी आपला धिर सोडला नाही. त्यांना हवी ती ट्रीटमेंन्ट करु. फक्त त्यांना सावध करा अशी विनंती केली. मात्र, तोवर फार उशिर झालेला होता. रात्री १० वाजेनंतर त्यांनी अखेरचा श्‍वास घेतल्याचे डिक्लेअर करण्यात आले. मात्र, फोनहून मिळालेल्या माहितीला कोणी खरे ठरविण्याचे धाडस करीत नव्हते. परंतु, नंतरच्या काळात त्यांच्या कुटुंबियांनीच त्यांची निधनाची माहीती दिली. त्यांच्यावर उद्या दि. १३ जानेवरी २०२३ रोजी सकाळी  ११ वाजता शेंडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.