एकतर्फी प्रेमातून सुरा दाखवून प्रेयसिवर अत्याचार केला अन दहा वर्षे जेलमध्ये गेला.! अकोले नाक्यावरील घटना, लैलापुढे मजनुगीरी नडली.!
सार्वभौम (संगमनेर) :-
चित्रपटातील गाणे म्हणून, फिल्मी डायलॉग मरुन, ती दिसली की शिट्टी मारुन नको तसे झोपडपट्टी प्रेम तो व्यक्त करीत होता. तु माझ्यावर प्रेम कर, नाहीतर माझ्याशी संबंध ठेव असे म्हणून तो तिला वारंवार छळत होता. मात्र, तिने त्यास कोणत्याही प्रकारची दाद दिली नाही. म्हणून त्याने तिला रात्रीच्यावेळी अंधारात गाठविले आणि धारधार सुरा दाखवून तिच्यावर अत्याचार केला. ही घटना दि. १६ एप्रिल २०२० रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली होती. त्यानंतर पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास करुन सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी दोषारोपपत्र दाखल केले होते. हा खटला जिल्हा सत्र न्यायालयात दोन वर्षे चालला. त्यानंतर आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू भिमराज शिंदे (रा. अकोले नाका, संगमनेर) यास १० वर्षे सश्रम कारावास आणि २५ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरोपी जितेंद्र शिंदे हा एका महिलेवर प्रेम करीत होता. त्याच्याकडून अकोले नाका परिसरात राहणार्या एका महिलेला २ ते ३ वर्षापासून प्रचंड त्रास होत होता. तिने यापुर्वी पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. मात्र, त्याचा फारसा काही फरक झाला नाही. त्यामुळे, अखेर हताश होऊन तिने काही व्यक्तींच्या माध्यमातून हायकोर्टात आपला अर्ज दाखल केला होता. आरोपी जितेंद्र हा महिलेकडे पाहुन पिक्चरची गाणी म्हणणे, शिट्ट्या मारणे, तु माझ्यावर प्रेम कर असे म्हणून वाट अडविणे, मुलीस, पतीस ठार मारण्याची धमकी देणे असे कृत्य वारंवार करीत होता. मुळात तो जुगार आड्डा चालवत असल्यामुळे त्याचे मलिदे योग्यवेळी पोहच होत असल्यामुळे त्याला कोणी बोलणे हे आपण गृहीत सुद्ध धरु शकत नाही. त्यामुळे, दादागिरी, गुंडगिरी आणि दहशत ही राजरोस होत होती. म्हणून तर महिलेला थेट हायकोर्टाची पायरी चढावी लागली.
हा सर्व प्रकार पीडित महिला निमुटपणे सहन करीत होती. घरात शौचालय नसल्यामुळे ती रात्री घराबाहेर पडली की तो तिच्यामागे चाकू घेऊन जात असे. तु माझ्याशी संबंध ठेव नाहीतर तुझ्या मुलीला आणि पतीला मी ठार मारेल असे म्हणून त्याने अनेकदा धमक्या दिल्या होत्या. मात्र, तिचा आवाज ऐकणारे कोणी नव्हते. त्यामुळे, जे घडते आहे त्याला प्रकषार्र्ने विरोध करणे आणि सहन करणे यापेक्षा तिच्याकडे पर्याय नव्हता. माझे लग्न झाले आहे. मला मुलगी आहे, मला समाजात वावरायचे आहे. त्यामुळे तु माझ्यामागे येऊन मला धमकावू नको. माझी आब्रु चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न करु नको अशी तिने त्याला वारंवार विनंती केली. मात्र, जुगारआड्ड्यावाला काही हटला नाही. त्याने त्याचे चाळे चालुच ठेवले.
दरम्यान, दि. १६ एप्रिल २०२० रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पीडित महिला आपल्या घराजवळ असणार्या अडोशाला शौचालयासाठी जात होती. तेव्हा आरोपी जितेंद्र शिंदे हा तेथे आला आणि तिला अचानक मागून कवळी मारली. तिने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. तोच त्याने तोंड दाबले आणि धारधार सुरा गळ्याला लावला. जर ओरडली तर तुझ्यासह मुलीला देखील ठार करुन टाकेल असे म्हणून धमकी दिली. तेव्हा जीवाची भिती असताना देखील त्यास विरोध केला. मात्र, त्याने सुर्याचा धाक दाखविल्यामुळे पीडित महिला हतबल झाली होती. तरी देखील तिने जोराने आरडाओरड केली असता आरोपी जितेंद्र हा तेथून पळून गेला. मोठ्या आवाजाने लोक गोळा झाले असता घडला प्रकार महिलेने कथन केला.
दरम्यान, मोठ्या संघर्षानंतर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्याचा तपास एस.डी.पाटील आणि नरेंद्र साबळे यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर सरकार पक्षातर्फे सहा साक्षिदार तपासण्यात आले. तर, यात पीडित महिलेची साक्ष महत्वाची ठरली. सरकारी वकील संजय वाकचौरे यांचा प्रबळ युक्तीवाद आणि सबळ पुरावे ग्राह्य धरुन जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू भिमराज शिंदे यास १० वर्षे सश्रम कारावास आणि २५ हजार रुपये दंड तर हा दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे. यात पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक म्हणून विजय तुकाराम परदेशी, पोलीस कर्मचारी भुतांबरे, प्रविण डावरे, दिपाली देवंगे, रुपाली नाईकवाडी, प्रतिभा थोरात यांनी मोलाचे सहकार्य केले.