प्राध्यापकांनी विद्यार्थी बेशुद्ध पाडला, चार तासाने शुद्धीवर येताच चौघांवर गुन्हा दाखल.! बाप कंपनीची लुट चव्हाट्यावर.!

सार्वभौम (संगमनेर) :-

संगमनेर तालुक्यातील सोनुशी येथील एका विद्यार्थ्याने  पारेगाव येथील द बाप कंपनीत बी.सी.ए साठी प्रवेश घेतला होता. तेथील प्राध्यापक त्याला म्हैसर युनिवर्ससिटीची डिग्री प्रमाणपत्र व नोकरी देण्याचे हमीपत्र देणार होती. मात्र, प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. म्हणून ही बाप कंपनी म्हैसुर युनिवर्ससिटीशी संलग्न आहे का? यासाठी या विद्यार्थ्याने मेल सेंड केला होता. तेव्हा, बाप कंपनीचा खरा चेहरा उघडा पडला. म्हणून, तेथील चौघांनी या मुलास कोंडून घेत त्याला प्रचंड टॉर्चर केले. त्यांच्या धमक्या आणि प्रचंड दबावामुळे हा मुलगा बेशुद्ध पडला. तब्बल चार तासानंतर शुद्धीवर आला असता त्याने पोलिसांना आपले जबाब दिले आहेत. ही घटना दि. २ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास घडली. त्यानंतर हनुमान अण्णा गर्जे (रा. जवळवाडी, ता पाथर्डी, हल्ली रा. सोनुशी, ता. संगमनेर) या तरुणाने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात प्रा. रावसाहेब रामनाथ घुगे, प्रा. श्रीकांत डुबे, ऋतुजा पुरी, सुष्मा आव्हाड (सर्व रा. पारेगाव, ता. संगमनेर) अशा चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत फिर्यादीत दिलेली माहिती अशी की, हनुमान गर्जे (वय २२)हा तरुण पाथर्डी तालुक्यातून शिक्षणासाठी त्याचे दाजी सुदाम गिते यांच्याकडे सोनुशी येथे आला होता. त्याला समजले होते की, पारेगाव येथे म्हैसुर युनिवर्ससिटीची बाप संस्था असून तेथे डिग्री प्रमाणपत्र आणि नोकरीची हमी दिली जाते. त्यानंतर त्याने बाप कंपनीत ऍडमीशन घेतले. तेव्हा प्रा. रावसाहेब घुगे व उपप्राध्यापक दिपक नामदेव नागरे यांनी गर्जे यास म्हैसुर युनिवर्ससिटीचे प्रमाणपत्र आणि नोकरी लावण्याचे एक बॉण्ड पेपरवर लेखी हमी दिली होती. तेव्हा गर्जे याने त्यांना दि. २० ऑगस्ट २०२२ रोजी ऍडमिशनपोटी ६० हजार रुपये दिले होते. तेव्हापासून कॉलेज देखील सुरू झाले होते.

दरम्यान, दिवाळीनंतर तथा ३ नोव्हेंबर २०२२ रोजी गर्जे याने प्रा. रावसाहेब घुगे याच्याकडे १०० रुपयांच्या स्टॅम्पवर नोकरीची हमी देणारा लेखी अश्‍वासनाचा स्टॅम्प मागितला. मात्र, घुगे याने त्याला आज उद्या करून नेहमी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. तर, संबंधित कोरा स्टॅम्प घुगे याने त्याच्याकडेच ठेवून घेतला. मी यावर आश्‍वासित केलेली माहिती टाईप करतो आणि देतो असे म्हणून वारंवार टोलवाटोलवी केली. हे लोक असे का करत आहे? ठरल्याप्रमाणे वागत का नाही? यात काही फेक प्रकार तर नाही ना? अशा प्रकारची शंका या तरुणास आली. तेव्हा त्याने काही ठिकाणी चौकशी करण्यास सुरुवात केली. मात्र, चौकशीबाबत या विद्यार्थ्याने कोणाला काही कळु दिले नाही.

दरम्यान गर्जे याने पुणे आणि म्हैसुर युनिवर्ससिटीला आरटीआय अंतर्गत काही माहिती मागविली. त्यांना मेल देखील केला. तेव्हा त्यांच्याकडून उत्तर आले. की, बाप कंपनीशी आमचा कोणाताही संबंध नसून ती आमच्या अधिपत्याखाली नाही. त्यानंतर यांचे खोटारडे उखळ पांढरे करण्यासाठी याने थेट बाप कंपनीतच आरटीआय टाकून काही माहिती मागविली. त्यानंतर मात्र, घुगे आणि त्याच्या सहकार्‍यांचे धाबे दणाणले. त्यांनी गर्जे यास केबिनमध्ये बोलावून घेतले. तेथे सर्व आरोपी उपलब्ध होतेे. त्यांनी विचारणा केली की, तु हे कोणाच्या सांगण्याहून करीत आहेस? तेव्हा गर्जे म्हणाला. की, मी आत्ता आजारी आहे. तुमच्या प्रश्‍नांची उत्तरे नंतर देतो. तेव्हा आरोपी म्हणाले. की, तु आता इथे मेला तरी चालेल. पण, तुला उत्तरे दिल्याशिवाय जाऊ देणार नाही.

संबंधित चौघांनी गर्जे याला प्रचंड त्रास दिला. मानसिक छळ केला. तुझ्यावर गुन्हा दाखल करु, तुला पोलिसांच्या ताब्यात देऊ अशा प्रकारे अनेक धमक्या देऊन तेथे होत असलेला सर्व प्रकार त्यांनी मोबाईलच्या कॅमेरॉत कैद केला. हा प्रकार ४:३० वाजण्याच्या सुमारास सुरू होता. गर्जे यास प्रचंड मानसिक त्रास दिल्याने तो जागीच बेशुद्ध पडला. त्यानंतर आरोपी यांनी गर्जेचे दाजी गिते यांना फोन करुन बोलावून घेतले. जेव्हा तो शुद्धीवर आला होता. तेव्हा रात्रीचे ९:३० वाजले होते आणि तो संगमनेर येथील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता. त्यानंतर त्याने घडलेली हकीकत पोलिसांना सांगितली. त्यानंतर प्रा. रावसाहेब रामनाथ घुगे, प्रा. श्रीकांत डुबे, ऋतुजा पुरी, सुष्मा आव्हाड (सर्व रा. पारेगाव, ता. संगमनेर) अशा चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तर, बाप कंपनीत अनेक विद्यार्थ्यांचे ऍडमिशन घेण्यात आले असून विद्यार्थ्यांकडून अवाजवी रक्कम वसुल केल्याच्या तक्रारी आहेत. आता आरोपी यांनी शिक्षणाच्या नावे जो काही धंदा मांडला आहे. त्याची चौकशी होणार असून पुणे व म्हैसुर युनिवर्ससिटी देखील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे. या पलिकडे संगमनेरमधील काही समाजसेवक आणि राजकीय व्यक्ती देखील यात हस्तक्षेप करणार असून अनेक विद्यार्थी याबाबत तक्रार करणार असल्याचे बोलले जात आहे. वेगवेगळ्या युनिवर्ससिटीच्या नावाखाली धंदा मांडणार्‍यांना विद्यार्थ्यांनीच धडा शिकविला असून बाप कंपनीच्या विरोधात अन्य गुन्हे दाखल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे, शिक्षणाचा बाजार मांडलेल्यांना ताब्यात घेऊन त्यांचे धंदे बंद करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून यांना त्यांचा बाप आठविल्याशिवाय सुट्टी नाही. अशी कठोर भुमिका सामाजिक संघटनांनी घेतली आहे.