संकेत नवलेच्या मारेकर्‍याचा शोध लावा अन्यथा मामलेदार जीवंत जाळला होता हे लक्षात - नवले

 


- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :-

२८ जुलै १९१४ साली देशात पहिले महायुद्ध सुरू झाले होते. ते सन १९१८ पर्यंत चालले. यावेळी अकोले तालुक्यात पिरजादे नावाचा मामलेदार होता. तेव्हा आदेश निघाले होते की, वॉरलोन म्हणून पैसा वसुल करावा आणि जी तरुण मुले आहेत त्यांना बळजबरी का होईना सैन्यात पाठवून द्यावे. त्या आदेशाचे मामलेदाराने तंतोतंत पालन करताना प्रचंड अतिरेख केला होता. तो इतका की, त्याने तरुण साधुंना पकडून त्यांचे मुंडन केले आणि त्यांना सैन्यात पाठविण्याचा प्रयत्न केला. हा प्रशासकीय उन्माद येथील क्रांतीकारी व्यक्तींना सहन झाला नाही. त्यांनी अकोल्याच्या भाटे वाड्यात घुसून तेथे लपलेल्या मामलेदाराचा शोध घेतला. तो बाहेर आला नाही तर सगळा वाडा पेटवून देण्यात आला होता. त्या भर आगीत मामलेदार त्याच्या टांग्यासह जाळुन टाकला होता. त्यात नंतर २३ व्यक्तींना जन्मठेप आणि ३ व्यक्तींना फाशीची शिक्षा झाली होती. त्यात नवलेवाडीच्या तिघांचा सामावेश होता. आता हा सगळा इतिहास सांगण्याचे कारण काय? तर, संकेत नवले याचे मारेकरी अद्याप पोलिसांना सापडले नाही. तर, डॉ. अजित नवले म्हणाले. मारेकर्‍यांचा शोध लागला आहे. मात्र, कोण्या संस्थेची किंवा बड्या नेत्याची बदमानी होऊ नये म्हणून हे सर्व दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावर रोष व्यक्त करताना मधुभाऊ नवले म्हणालेे. संकेत नवलेच्या मारेकर्‍याला तत्काळ शोधा आणि त्याला फासावर लटकवा.! अन जर यात प्रशासन कोण्या चुकीच्या व्यक्तीला पाठीशी घालत असेल. तर, आम्ही मामलेदार जीवंत जाळला आहे हे विसरु नका.!

खरंतर, आज १५ दिवस उलटून गेले. तपास लागण्याची जी शक्यता असते तो काळ पुर्णत: संपत चालला आहे. माझा मुलगा का व कोणी मारला ही आर्त हाक संकेतची आई आजही देत आहे. त्यावर गावकरी, तालुका आणि प्रशासन निरुत्तर आहे. विशेष करून राज्याच्या आणि देशाच्या इतिहासात नवलेवाडी हे गाव सुवर्णक्षराने लिहीले गेले आहे. असे असताना मधुभाऊ नवले, डॉ. अजित नवले, महेश नवले, सुरेश नवले यांच्यासारखी मात्तब्बर नेते राज्यात नेतृत्व करीत असताना त्यांच्या घरावर जेव्हा संकट येते तेव्हा त्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ येते. ही बाब प्रशासनाचा अपमान आणि गावाला वेदनादायी वाटते. तरी देखील इतके मोठे दु:ख उराशी बाळगून प्रशासनाला सहकार्य करण्याची भुमिका गाव घेते हा संयम देखील वाखान्याजोगा आहे. मात्र, तो किती दिवस? म्हणून संबंध गावकर्‍यांनी काल भव्य मशाल मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध नोंदविला. काही झालं तरी हत्या करणारे शोधा आणि त्यांना फासावर न्या ही भुमिका सगळ्यांनी मांडली.

संकेतचा तपास कुठवर आलाय.!

दि. ९ डिसेंबर २०२२ रोजी पहाटेच्या सुमारास संकेतची हत्या झाली असावी. सकाळी मृतदेह सापडला आणि दुसर्‍या दिवशी सर्वात पहिली बातमी रोखठोक सार्वभौमला आली. त्यानंतर संबंध अकोले तालुका जागा झाला. पोलिसांनी त्याचे मित्र, मैत्रीणी, कॉलेज, राहती खोली, त्याचा विकलेला लॅपटॉप, त्याचे शिक्षण आणि बर्‍याच गोष्टींचा मागोवा घेतला. मात्र, अद्याप साधा एक सुद्धा धागा त्यांच्या हाती आलेला नाही. त्यानंतर, तो आयटी क्षेत्रात निष्णात होता म्हणून व्हाटसऍप, इन्स्टाग्रामसह अन्य गोष्टी ज्या पोलिसांना सुद्धा माहित नाही. त्याहून त्याचे फोनकॉल होत होते असे म्हणतात. त्यामुळे, त्या दृष्टीने सायबर शाखा काम करते आहे. एएसपींच्या म्हणण्यानुसार बाहेरुन एक्सपर्ट बोलविले आहेत. चार टिम १४ तास कार्यरत आहे. त्यात नव्याने मिथुन घुगे यांची त्यात नियुक्ती केली आहे. पण, वास्तवत: अद्याप गुन्हा कायम तपासावर आहे. आता हा तपास पुर्णत: टेक्निकल झाला असून तो तितकाच क्रिटीकल देखील झाला आहे. पोलिसांनी हात टेकले असून सर्व सायबर शाखेवर विश्‍वास ठेऊन आहेत. मात्र, पोलीस उपाधिक्षकांच्या पथकाने आजवर चांगली कामगिरी केली आहे. अनेक उकल न होणारे खुनाचे गुन्हे उघड केले आहेत. त्यांच्याकडून निकराचे प्रयत्न सुरू असून अनेकांना अपेक्षा कायम आहेत.  

संकेतचा वेदांत होऊ नये.!

तुम्हाला आठवतय? अकोले तालुक्यातील उंचखडक बु येथील वेदांत देशमुख.! अद्याप हा चिमुरडा न्यायावाचून वंचित आहे. थोडं कटू वाटेल. पण, तपास पुर्णत: भरकटला म्हणून वेदांतचे खरे मारेकरी अद्याप मोकाट आहे. वेदांत संदर्भात देखील अनेक अति शहान्यांनी विधाने केली होती. त्याची हत्या अशी झाली, हत्या तशी झाली, याने केली, त्याने केली आणि म्हणून दबावापोटी पोलीस त्या दृष्टीने तपास करीत गेले. परिणामी, तपास भर्कटला आाणि घटनेचे मुळ शोधता आले नाही. आजही वेदांत म्हटलं की आम्ही शरमेने माना खाली घालतो. दुर्दैवाने संकेत बाबात असे होऊ नये. हत्या का झाली आणि कशी व कोणी केली हे सांगण्याचे शहाणपण कोणीच करू नये. पोलिसांना पोलिसांचे काम करु द्यावे. काय सुचना असतील त्या वैयक्तीक सांगाव्यात. मात्र, तपास भर्कटून संकेत सुद्धा न्यायापासून वंचित राहू नये. तसेच भल्याभल्यांच्या शहानपणामुळे संकेतचा वेदांत होऊ नये हीच प्रामाणिक इच्छा.!

सुकेवाडी बनली गुन्हेगारांचा आड्डा.!

गेल्या कित्तेक दिवसांपासून सुकेवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकुळ सुरू आहे. चोर्‍यांचे रुपांतर आता दरोड्यात झाले आहे. काल, बंद घरे फुटत होती आता घरात घुसून चाकू तलवारी दाखवून दरोडे पडू लागले आहेत. हे का फोफावले? केवळ चोट्यांना पोलिसांचे भय राहिले नाही. संगमनेर पंचायत समिती तर वर्षभरात चार वेळा चोर्‍या झाल्या. काल दोन वेळा सुकेवाडीत दरोडे पडले. लोक गुन्हे दाखल करायला देखील धजत नाही. इतका अविश्‍वास वाटू लागला आहे. संकेत नवलेचा खुन करुन त्याला सुकेवाडीतच आणून टाकले. त्यामुळे, संगमनेरमध्ये गुन्हेगारी वाढली आहेच. मात्र, काही ठिकाणं ही दरोडे आणि खुन प्रवण क्षेत्र म्हणून नावारुपाला येऊ लागली आहेत. संकेतचा मारेकरी हा फार दुरचा असेल असे अनेकांना वाटत नाही. तो याच परिसरात असू शकतो असे काही व्यक्तींचे मत आहे. येणार्‍या काळात तरी पोलीस सुकेवाडीकडे लक्ष देतील आणि येथील खुन, दरोडे, चोर्‍या व लुटमार थाबेल अशी स्थानिकांची आशा आहे.

तपास करेंगे,पर तारीख नाही बताऐंगे.!

खरंतर अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर मॅडम यांनी तपास आम्हीच करु अशा प्रकारची शाश्‍वती दिली. मात्र, कधी आणि किती दिवसात यावर कोणतेही भाष्य झाले नाही. म्हणजे अच्छे दिन आऐंगे, पर तारीख नही बताऐंगे.! यापेक्षा वेगळे काय होते? खुद्द डॉ. अजित नवले साहेब जेव्हा-जेव्हा आंदोलने करतात तेव्हा-तेव्हा ते अधिकार्‍यांकडून लेखी घेतात. येथे मात्र उपस्थित जनता बुचकाळ्यात पडली. इतकेच काय.! प्रभाकर फापाळे यांनी त्यावर विचारणा केली तर त्यांना एक शब्दही बोलु दिला नाही. का? जर संबंध तालुका नवलेवाडीच्या लेकरामागे उभा राहिला आहे. तर, त्यांना सुद्धा प्रश्‍न विचारण्याचा अधिकार नाही का? संकेत सारखा विचारवंत आमचा देखील भाऊ नाही का? मग १५ दिवस काय केले हा तपासाचा भाग असू शकतो, तो गोपनिय ठेवा. मात्र, आणखी पुढे किती दिवसात शोध करणार हे लोकांना कळायला पाहिजे होते. अर्थात अधिकार्‍यांकडून बर्‍यापैकी प्रश्‍न हे अनुत्तरीत राहिले. त्या खोलात गेलं तर अनेकांचे चेहरे उघडे पडतील आणि अभ्यास देखील.! मात्र, संकेतबाबत तपासात आणि प्रत्यक्षात काही गोष्टी या न उलगडणार्‍या आहेत.!!