जळत्या दंड्याने विद्यार्थ्यांना मारुनही मुख्याध्यापक, प्रकल्पाधिकारी, आमदार आणि पोलीस गप्प.!


सार्वभौम (राजूर) :-

अकोले तालुक्यात आदिवासी बांधवांची आणि विद्यार्थ्यांची अजून किती अवहेलना होणार आहे, आणखी किती अन्याय अत्याचार आणि किती गोष्टींपासून वंचित रहावे लागणार आहे हेच समजत नाही. कारण, रेशन पासून तर अगदी शिक्षणापर्यंत आणि आरोग्यापासून तर अगदी मुलभूत सुविधांपर्यंत हे लोक अन्यायाला सामोरे जात आहे. इतकेच काय.! तर, येथील बांधवांवर अन्याय करण्याची एक सुद्धा संधी काही समाजद्रोही व्यक्ती सोडत नाहीत. अगदी काल देखील शिरपुंजे आश्रमशाळेत एका अधिक्षकाने सहा विद्यार्थ्यांना अगदी जळत्या कोलीताने मारहाण केली. मात्र, दुर्दैवाने जखमी मुलांना राजूर रुग्णालयात दाखल करुन देखील डॉक्टरांनी एमएलसी पोलिसांना दिली नाही. किंवा इतका भयानक प्रकार असून देखील पोलिसांनी स्वत: चौकशी केली नाही. इतकेच काय.! प्रकल्पअधिकारी यांनी तत्काळ चौकशी आणि कारवाई करण्याचे काम केले नाही. या व्यतिरिक्त डॉ. आ. किरण लहामटे साहेब यांची देखील फार महत्वाची भुमिका होती. त्यांनी भेट दिली, चर्चाही केली. मात्र, २४ सात उलटून देखील पोलीस ठाण्यात साधी नोंद देखील नसल्याचे समोर आले आहे. जेव्हा रोखठोक सार्वभौमने याबाबत चौकशी केली. त्यानंतर रुग्णालयाला जाग आली त्यांनी सायंकाळी ५ वाजाता पुढे कागदी घोडे रंगविण्याचे काम केले. मात्र, ही दिरंगाई आणि सगळे मुग गिळून का बसले आहेत? याची खर्‍या अर्थाने पोलखोल होणे आवश्यक आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी शिरपुंजे आश्रमशाळेत मुलांना काही कचरा जमा केला होता. तो मुलांनी पेटविला होता मात्र काही शिल्लक राहिल्याने उर्वरीत संध्याकाळी पेटवा असे म्हणून मुले शाळेत गेले होते. त्यानंतर उर्वरीत लाकडे मुलांना पेटवून जाळ केला होता. हा प्रकार तेथे आलेल्या अधिक्षक अश्‍विन पाईक यांनी पाहिला. मुले जाळाजवळ शेकत असताना पाईक आले आणि त्यांनी जळती लाकडे हातात घेऊन मुलांना मारण्यास सुरूवात केली. इयत्ता ६ वे ९ वीच्या वर्गात शिकणार्‍या मुलांना संबंधित व्यक्तीने जळत्या लाकडाने मारहाण केली. त्यात काही मुलांच्या पायावर, पाठीवर आणि अन्य ठिकाणी जखमा झाल्या आहेत.

दरम्यान, हा सर्व प्रकार जेव्हा मुलांनी आपल्या पालकांना सांगितला. तेव्हा, जखमा पाहून पालकांनी मुलांना घेऊन थेट राजूर रुग्णालय गाठले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू झाले. खरंतर, जेव्हा मुलांना मारहाण झाली हे डॉक्टारांना सांगितले तेव्हा त्यांच्यावर उपचार करुन डॉक्टरांनी राजूर पोलीस ठाण्यात एमएलसी दाखल करणे अत्यंत गरजेचे होते. म्हणजे, पोलिसांनी तत्काळ जबाब नोंदविले असते. मात्र, जाणिवपुर्वक कायदेशीर गोष्टींना उशिर करण्यात आला. म्हणजे, प्रकल्प कार्यालय आणि काही राजकीय व्यक्तींना पालकांशी संपर्क साधून त्यांच्यावर दबाव टाकता येईल. म्हणजे, इतकी भयानक घटना घडून देखील अशा गोष्टींना पाठीशी घालणारे नाही नतद्रष्ट राजकारणी आणि प्रशासन देखील आहे. ही फार मोठी खंत आहे. तर, दुर्दैवाने असा प्रकार घडल्यानंतर बाल संरक्षण म्हणून पोलिसांनी याकडे वैयक्तीक लक्ष देणे गरजेचे होते. मात्र, नेहमीप्रमाणे वर्दीचा रटाळपणा तालुक्याला पहायला मिळाला.

दरम्यान, आता प्रशासनाने पालकांवर दबाव न आणता संबंधित शाळेचे मुख्याध्यापक किंवा पोलीस यांच्यातील कोणीतरी फिर्यादी होऊन यात गुन्हा दाखल करणे अपेक्षित आहे. कारण, पोलीस, कोर्ट आणि गुन्हे याबाबत आदिवासी भाग अद्याप अनभिज्ञ ठेवण्यात आला आहे. त्यामुळे, कायद्यात अशा प्रकारची तरतुद असून या गुन्ह्यात सरकार फिर्यादी होणे अपेक्षित आहे. तर, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पाईक हा जो व्यक्ती आहे. तो यापुर्वी देखील गैरवर्तनात सापडला होता. त्यानंतर त्याची बदली केली होती. आता पुन्हा याचे जीवघेणे उद्योग समोर आले आहे. त्यामुळे, याची बदली आणि निलंबन नको. तर याला बडतर्फ करण्यात यावे अशा प्रकारची मागणी आता नागरिक करु लागले आहेत.

एरव्ही आदिवासी बांधवांच्या संदर्भात काही घडलं तर त्याचे राजकारण करुन अनेक सामाजिक संघटना आणि राजकारणी तोंड घेऊन पुडे येतात. आज पालकांवर दबाव टाकला जात आहे. प्रशासन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. रविवार असल्यामुळे अनेक गोष्टींची टाळाटाळ होताना दिसत आहे. त्यामुळे, या मुलांना खरोखर न्याय मिळेल का? कोलीताने मारहाण करणार्‍यास शिक्षा मिळेल का? प्रशासन सहकार्य करेल का? राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप थांबेल का? असे अनेक प्रश्‍न अनुत्तरीत राहिले आहेत. मात्र, यात आमदार साहेबांनी प्रकर्षाने लक्ष घालणे गरजेचे होते. कारण, २४ तास उलटले तरी केवळ पाचशे मीटर आंतरावर साधी एमएनसी जाऊ शकली नाही म्हणजे किती दिरंगाई आणि किती दुर्लक्ष म्हणावे लागेल. या व्यतिरिक्त सामाजिक संघटनांनी देखील हाताची घडी आणि तोंडावर बोट का ठेवले आहे? कारण, साधं नळाला पाणी आलं नाही तर मोर्चे आणि आंदोलने करणारे राजुरकर आज मुग गिळुन बसताना दिसत आहे. खरंतर, काल जी काही गावात स्वत:च्छता झाली. यापेक्षा भ्रष्ट व्यक्ती, समाजद्रोही विचार, अन्यायाला पाठीशी घालणारी किड आणि निमुटपणे अत्याचार सहन करणारी प्रवृत्ती स्वच्छ करणे गरजेचे आहे. आशा करु, या विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी एक मोठे आंदोलन उभे राहिल.