आईला मारतो म्हणून मुलाने बापाचा केला खुन.! भाऊ सुद्धा गळा आवळु लागला.! गुन्हा दाखल, दोन तासात आरोपी जेरबंद.!
बाप कायम दारु पितो आणि आईला मारहाण करतो म्हणून मुलाने बापावर कोयत्याने वार केले व आपल्या चुलत्याच्या मदतीने दोरीने गळा आवळुन ठार केले. ही घटना खुद्द आईच्या डोळ्यादेखत घडली. मात्र, जेव्हा मेडिकल रिपोर्ट समोर आला. तेव्हा मात्र, घडलेला प्रकार सर्व समोर आला. ही घटना अकोले तालुक्यातील उडदावणे येथे शुक्रवार दि. १६ डिसेंबर २०२२ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. यात सुनिल सोमा गिर्हे (वय ४५, रा. उडदावणे, ता. अकोले) हे मयत झाले आहेत. तर, यांची पत्नी गंगुबाई गिर्हे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिर एकनाथ सोमा गिर्हे आणि मुलगा सुरेश सुनिल गिर्हे (दोघे रा. उडदावणे) यांना आरोपी करण्यात आले आहे. त्यानंतर राजूरचे सहा. पोलीस निरीक्षक गणेश इंगळे यांनी अवघ्या दोन तासात आरोपींचा छडा लावला असून त्यांना बेड्या देखील ठोकल्या आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मयत सुनिल गिर्हे हा गेल्या कित्तेक दिवसांपासून दारु पित होता. इतकेच काय.! घरात येऊन पत्नीला शिविगाळ करणे, रात्री अपरात्री मारहाण करणे यामुळे, घरात कायम राडा होत होता. मात्र, वयात आलेल्या मुलास हा प्रकार सहन होत नव्हता. त्यामुळे, तो आपल्या चुलत्यांकडे जाऊन जास्तवेळ थांबत होता. दरम्यान, शुक्रावार दि. १६ डिसेंबर २०२२ रोजी ठरल्याप्रमाणे सुनिल हा शेंडी येथून प्रचंड दारु पिऊन आला होता. सायंकाळी पाच वाजता त्यांनी चिकन आणून ते आपल्या पत्नीच्या स्वाधिन केले आणि तो गावात गेला. मी पाहुण्यांना घेऊन येतो तोवर ही भाजी करुन ठेव असे आदेश असल्यामुळे गंगुबाई त्यांच्या कामत व्यस्त होत्या.
दरम्यान, रात्रीचे ९ वाजले होते. गंगुबाई यांनी सर्व स्वयंपाक आटपून जेवणाासाठी आपल्या पतीची वाट पाहत होत्या. त्यावेळी यांची स्वारी अगदी डूलत डुलत आली आणि त्यांनी पत्नीला नेहमीप्रमाणे शिविगाळ सुरू केली. त्यांना समजून सांगत असताना त्यांनी मागचा पुढचा विचार न करता थेट पत्नीस मारहाण केली. त्यामुळे, घरात एकच आरडाओरड झाला. हा गदारोळ ऐकल्यानंतर शेजारी असणारा मुलगा सुरेश आणि दिर एकनाथ ही दोघे धावत आले. आईला कशाला मारा? अशी विचारणा मुलाने केली असता सुनिल यांनी त्याला सुद्धा शिविगाळ सुरू केली. या दोघांचे भांडण सोडवत असताना दिर मध्ये पडला तर त्याला देखील सुनिलने शिविगाळ दमदाटी करण्यास सुरूवात केली. तेव्हा घरात एकाच गोंधळ माजला होता.
दरम्यान, रोजरोज आणि राजरोस होणारा हा प्रकार मुलास प्रचंड असहाय्य झाला होता. उठसुठ आईला मारणे आणि दारु ढोसणे हे त्याच्या डोक्याहून जात होते. त्यामुळे, त्याने रागाच्या भरात शेजारी असणारा कोयता घेतला आणि बापाच्या पाठीवर त्याने चार वेळा सापासप वार केले. त्याच वेळी जवळ असणारी दोरी घेऊन एकनाथ आणि सुरेश या दोघांनी त्याचा गळा आवळला. त्यावेळी, गंगुबार्ई त्यांना म्हणत होती. तो मरुन जाईल, त्याला ठार मारु नका. मात्र, तरी देखील रागाच्या भरात या दोघांनी सुनिलचा खुन केला. हा वारंवार दारु पितो, तुला मारतो, घरात काही सुखशांती नाही त्यामुळे, आता याला ठार केलेेेले योग्य राहिल असे म्हणून दोघांची त्याचा जीव घेतला आणि एका खाटावर त्यास झोपवून त्याच्यावर पांघरुन टाकून दिले.
दरम्यान, गंगुबाई आणि अन्य सगळ्यांनी ते घर सोडले आणि एकनाथ याच्याघरी मुक्काम केला. मात्र, दुसर्या दिवशी पोलीस पाटील यांना घटना कळाल्यानंतर त्यांनी मयत व्यक्ती म्हणून पोलिसांना माहिती दिली. मात्र, मयताच्या पाठीवर वार असल्यामुळे पहिला संशय आला. त्यामुळे, राजूर पोलीस अधिकारी इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेत स्पॉट पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी राजूर येथे आणले गेले. पोलिसांनी यात सखोल चौकशी केली असता गंगुबाई यांनी जे काही रात्री प्रत्यक्ष पाहिले. ते पोलिसांना कथन केले. तोवर आरोपी हे पसार झाले होते. मात्र, पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी अवघ्या दोन तासात आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.