पोलीस अधिक्षकांना संगमनेर पोलिसांकडून अपयशाची सलामी.! संकेत नवले मारला कोणी? १० दिवस उलटूनही पोलीस निरुत्तर.!



- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :-

एखादा गुन्हा घडल्यानंतर पोलीस जितकी तत्परता दाखवतील त्या वेगाने त्याची उकल होण्यास मदत होते. अन्यथा, रटाळ तपास आणि भर्कटलेल्या दिशा यामुळे, चुकीचे आरोपी आणि निर्दोष सुटका हेच शब्द कानावर पडल्याशिवाय रहात नाही. अर्थात आत्ताच नियुक्त झालेल्या राकेश ओला साहेबांनी यापुर्वी श्रीरामपूर विभागात काम करताना अनेक गुन्हे जे अशक्य होते त्याची उकल केली आहे. भल्याभल्या आरोपींचे सबळ दोषारोपपत्र तयार करुन त्यांना जेलमध्ये टाकले आहे. मात्र, दुर्दैवाने ते आल्यानंतर संगमनेर पोलिसांनी त्यांना एक अपयशाची सलामी दिल्याची चर्चा सुरू आहे. कारण, अकोले तालुक्यातील संकेत नवले या विद्यार्थ्याचा संगमनेरात खुन झाला. आता तब्बल १० दिवस झाले. तरी साधा एक धागादोरा हाती लागत नाही. त्यामुळे, पोलिसांची दिशा चुकते आहे का? पोलीस कमी पडत आहेत का? त्यांनी तपास यंत्रणेचा योग्य व तत्काळ वापर केला का? असे अनेक प्रश्‍न आता संकेतचे नातेवाईक विचारू लागले आहेत. जर यात पोलिसांना अपयश येत असेल तर पोलीस अधिक्षकांनी एक एसआयटी नेमावी, किंवा हा तपास सीआयडीकडे वर्ग करावा अन्यथा आदिवेशनात यावर चर्चा घडवून आणणार असल्याच्या भावना नातेवाईकांनी व्यक्त केल्या आहेत.  तर, मुलाचे मारेकरी शोधले नाही. तर, प्रशासनाला मदत व्हावी म्हणून एकदा आंदोलन थांबविले आहे. नंतर मात्र, असे होणार नाही. त्यामुळे, पोलिसांनी हत्येचे कारण आणि खरे आरोपी शोधून काढावेत अशी मागणी मधुभाऊ नवले, डॉ. अजित नवले, महेश नवले, सुरेश नवले यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

पोलीस नेमकी चुकले कोठे?

जेव्हा एखादा गुन्हा घडतो तेव्हा संबंधित पोलीस अधिकार्‍याने तेथे तत्काळ पहिली भेट देणे अपेक्षित असते. तेथे गर्दी होणार नाही याची काळजी घेऊन तत्काळ शॉन पथक बोलावून काहीतरी पुरावा मिळविण्यासाठी तपास करणे महत्वाचे होते. मात्र, घटनास्थळी श्‍वान आलेच नाही. इतकेच काय.! सन २०१६ मध्ये नगर जिल्ह्याला एक फिंगर प्रिंन्ट एक्सपर्ट व्हॉन दिली आहे, त्यात अनेक सुविधा आहेत. मात्र, त्याचा देखील वापर करण्यात आला नाही. त्यांना माहिती देताच ही व्हॉन हजर होते. मात्र, हे करायचे कोणी? आता संकेतचा मोबाईल गायब आहे. त्याचा सीडीआर आणि मेसेज याची माहिती एलसीबीने काढली. त्यात जे कॉल होते. त्यांची किती कसून चौकशी केली हे त्यांनाच माहित. मात्र, त्याच्या कॉलेजमध्ये जाऊन कोण उपस्थित कोण गायब याची माहिती पोलीस घेऊ शकले नाही. त्यामुळे, जसजसे दिवस वाढत चालले आहेत. तसतसे आरोपी निर्ढावून कदाचित संगमनेरातच अगदी सगळ्यांसोबत मिळून मिसळुन रहात असतील. त्यामुळे, १० दिवस म्हणजे तपास लावण्यासाठी पुरेसा होता. हे पोलिसांचे अपयशच म्हणावे लागेल.!!

गुन्हा दाखल झाला तर होऊद्या ना.! 

खरंतर, संकेत नवले याचा मृतदेह मिळुन आला तेव्हा त्याच्या डोक्याला कोणत्यातरी टणक किंवा धारधार हत्याराने मारल्याचे स्पष्ट दिसत होते. असे असताना देखील पोलिसांनी त्यावर अकस्मात मृत्युची नोंद केली. म्हणजे सरळसरळ खुन दिसतो तरी तो अकस्मात कसा होऊ शकतो? त्यानंतर पोलिसांनी सोशल मीडियाचा आधार घेतला आणि ओळख पटल्यानंतर पुन्हा कलम ३०२ दाखल केला. म्हणजे, दि. ९ ऑक्टोबर २०२२ रोजी संदिप मेंगाळ या तरुणाचा मृतदेह भाटनगर परिसरात पाण्यात सापडला होता. त्याला हेड इन्जुरी असल्याचे वैद्यकीय अहवालात आले होते. तरी देखील पोलिसांनी अकस्मात मृत्यु वगळता अधिकचा तपास करण्याचे कष्ट घेतले नाही. पोलीस अधिक्षक महोदयांनी याकडे गांभिर्याने पाहुन चौकशीचे आदेश दिले. तर, काही खळबळजनक गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे. मात्र, पोलिसांची मानसिकता हवी. यापुर्वी विश्‍वास नांगरेपाटील ते अगदी डॉ. सौरभ त्रिपाठी यांच्यापर्यंत सगळे एसपी म्हणत होते. गुन्हे दाखल करा. चौकशीत काय होईल ते पाहु. त्याच पठडीतले ओला साहेब आहेत. त्यांनी याकडे प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे असे विधीतज्ञांचे मत आहे.

पोलीस देखील निरुत्तर.!

खरंतर, संकेत नवले हा प्रचंड हुशार मुलगा होता. त्या कोणत्याही प्रकारा नादी नव्हता. मग अगदी संमोहन केल्यासारखा हा एकटाच त्या दिशेने जातो कसा? पैशाची गरज नसताना तो घटनेपुर्वी लॅपटॉप विकतो कसा? तो फॉरमेट करतो कसा? त्याच्या मोबाईलवर आरोपींचा संपर्क नाही, फोन नाही मग हे इतकं प्रि प्लॅनिंग कसे होऊ शकते? हे सर्व पाहता हा कोल्ड माईन्ड मर्डर म्हणावा लागेल. अगदी त्याची लॉब्ररी, तारापान, मार्केट यार्ड, बजाज शोरुम, मालपानी हॉल, होन्डा शोरूम, नंतर राजपाल गल्ली, पुढे फायनान्स बँक, जानकीनगर, दुधगंगा कॉलनी आणि पुढे तो एका गटारात उतरुन पुन्हा पुलावर चढतो आणि सुकेवाडी रोडला जातो. हे सर्व हॉरिब असल्यासारखे वाटते. विशेेष म्हणजे त्याचा कोणी मागोवा घेताना दिसत नाही असे पोलीस म्हणतात, त्याचे कोणत्या मुलांशी वैर नाही ना कोणत्या मुलींशी मैत्री.! मग, खुनाचे कारण काय? पोलीस देखील निरुत्तर आहेत.

पोलीस नेमकी करतात काय.! 

गेल्या कित्तेक दिवसांपासून सुकेवाडी परिसर हा चोर, दरोडेखोर यांचा आड्डा झाला आहे. तेथील स्थानिक नागरिकांना देखील त्यांचा त्रास आहे. पंचायत समितीत दोन वेळा चोर्‍या झाल्या. भर दिवसा शहरातून हायवा चोरी जाते. घुलेवाडी परिसरात सम्राट हॉटेलजवळ राहणार्‍या एका मुलीबाबत पोलीस ठाण्यात हेबीअर कॉर्पस सारखा गुन्हा दाखल असून तो कायम तपासावर आहे. एटीएम चोरीचे आरोपी पकडले त्यांना काही तासात जामीन झाला, भाटनगर परिसरात जो अकस्मात दाखल आहे त्याची सखोल तपास करण्याची मानसिकता पोलिसांची नाही. रोज दोन ते तीन दुचाकी चोरी होत आहे. चेन स्नेचिंग, महिला-विद्यार्थीनी छेडछाड सुरुच आहे. रोड अपघातांकडे तर पोलिसांचे लक्षच नाही. त्यामुळे, पोलीस नेमकी करतात काय? असा प्रश्‍न संगमनेरचे नागरिक उपस्थित करीत आहेत. त्यात संगमनेरचे राजकारण आणि त्याचा काच लागलेले पोलीस अधिकारी येथे थांबायला तयार नाहीत. वरुन संगमनेर विभागाला कायमचे पोलीस उपाधिक्षक नसल्याने सगळा सावळा गोंधळ सुरू असल्याचे दिसते आहे. त्यामुळे, सरकारने संगमनेरात फक्त वाळु बंद करण्याचा चंग करून जनता वार्‍यावर सोडण्याचा मानस केला आहे का? असा प्रश्‍न स्थानिक नागरिक उपस्थित करीत आहेत.