संगमनेरहुन लग्न करुन निघालेल्या आठ इंजिनिअरींच्या विद्यार्थ्याचा अपघात, पाच जणांचा मृत्यु, चौघे गंभीर जखमी.!

 


 
सार्वभौम (सिन्नर) :-

संगमनेर शहरात एका मित्राचे लग्न होते म्हणून एकाने आपल्या मामाला सांगितले अर्ध्या तासात कॉलेजहून जाऊन येतो मला तुमची कार द्या.! मोठ्या विश्‍वासाने मामाने ती दिली. मात्र, भाचाने कॉलजहून त्याच्या आठ मित्र मैत्रीणी घेतल्या आणि तो संगमनेर येथे लग्नाला आला. पाच प्रवाशांची क्षमता असणार्‍या स्विप्टमध्ये आठ जण कसे बसले ही कल्पना होईलच.! मात्र, लग्नाहून परतत असताना सिन्नर तालुक्यातील मोहदरी घाटत स्विफ्ट चालकाचा ताबा सुटला आणि काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. ही घटना दि. ९ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. त्यात हर्ष दिपक बोडके (वय १७, कामटवाडा नाशिक), सायली अशोक पाटील (वय १७, राणेनगर, नाशिक), मयुरी अनिल पाटील (वय १६, त्रिमुर्ती चौक नाशिक), प्रतिक्षा दगु घुले (वय १७, रा. पाथर्डी फाटा, नाशिक) आणि शुभम तायडे (वय १७, शिवशक्ती चौक सिडको) अशा पाच विद्यार्थ्यांचा मृत्यु झाला आहे. तर, साक्षी घायाळ, साहिल वरके, गायत्री फड आणि सुनिल ज्ञानेश्‍वर दळवी या चौघांवर उपचार सुरू आहेत. जे विद्यार्थी आहेत ते सर्वच अल्पवयीन असून ते एटीएचएम आणि मातोश्री इंजिनिअरींगचे विद्यार्थी होते.


शुक्रवारी आठ विद्यार्थी हे ठरल्याप्रमाणे कॉलेजला आले होते. त्यांनी घरुन येताना कॉलेजचा गणवेश आणि आपापल्या बॅगेत दुसरा ड्रेस आणला घेतला होता. कारण, यांचे पुर्वीच ठरले होते. की, उद्या कॉलेजला दांडी मारायची आणि थेट एका मित्राच्या लग्नाला जायचे. घरी कोणाला याबाबत काही एक कल्पना नाही, मुले कॉलेजला गेली आणि ठरल्याप्रमाणे ती सायंकाळी घरी येतील या कल्पनेत पालक होते. या आठ मुलांनी मात्र वेगळाच पराक्रम केला आणि एकाने त्याच्या मामाकडून त्यांची एम.एच.०३ एआर १६१५ घेतली आणि आत्ता तासभरात येतो असे म्हणून त्याने मामाला टोपी घातली. मात्र, पुढे तो त्याच्या मृत्युला टोपी घालु शकला नाही. ना त्याच्या सोबत असणार्‍या अन्य पाच मित्रांच्या मृत्युला सुद्धा..!!

ठरल्याप्रमाणे मित्र मैत्रीणी कॉलेजला आले. सगळ्यांचे वय अवघे १७ ते १८ वर्षे होते. त्यांनी कोठेतरी आपल्या कॉलेजचा गणवेश काढला आणि आपापले फॅशनचे ड्रेस, जीन्स पॅन्टी परिधान करून एकाच स्विफ्टमध्ये आठ जण बसले. अर्थातच गाडीत आठजण किती दाटीवाटीने बसले असतील याची कल्पना सर्वाना होईल. मात्र, तरी देखील यांनी सकाळी थेट संगमनेर गाठले. तेथे जाऊन त्यांनी मित्राच्या लग्नाला हजेरी लावली. शुभमंगल सावधान झाले, फोटोसेशन झाले आणि भोजन करुन ही मुले माघरी निघाली होती. जसे दाटीवाटीने आले तसे पुन्हा बसले आणि पुन्हा गाडी नाशिकच्या दिशेने वेगाने निघाली. आता सगळेच अल्पवयीन तरुण त्यामुळे, गाडीत फुल इन्जॉय सुरू होता. त्यामुळे, हसत खेळत सुरू असणार्‍या प्रवासात अचानक फार मोठे विघ्न आले. कारण, गाडीत प्रवाशांची मर्यादा, गाडीची क्षमता आणि वाहन चालकाला जी काही मोकळी जागा हवी होती. ती अपुरी असल्यामुळे प्रसंगावधान राखता आले नाही.

त्या दिवशी सायंकाळी पाच वाजता या मुलांची कार सिन्नर तालुक्यातील मोहदरी घाटात असताना मंदिराच्या जवळ कारचा टायर फुटला. गाडीत जास्त प्रवासी असल्यामुळे गाडी प्रचंड व्हायबल झाली आणि ती एम.एच १२ एस.एफ ४५४२ या कारवर आदळली. त्यानंतर थेट दुभाजक पार करून पलिकडे असणार्‍या इनोव्हा एम.एच.१८ ए.एन १४४३ यावर जाऊन आदळली. त्यामुळे, एकाच वेळी तिन कार एकमेकांना धडकल्या. त्यात पहिल्या कारमधील कोणालाही काही झाले नाही. मात्र, इनोव्हा मधील सुनिल ज्ञानेश्‍वर दळवी हा गंभीर जखमी झाला आहे. तर, नाशिकच्या स्विफ्ट कारमधील पाच विद्यार्थी मयत आणि तिघांवर अद्याप उपचार सुरू आहेत. गेल्या आठवड्यात अकोले तालुक्यातील समशेरपूर येथील दोघांचा याच हायवेवर होरपळून मृत्यु झाला होता. तर, आज पुन्हा पाच जणांचा जीव गेला. त्यामुळे, रस्त्यांवरील खड्डे, पैसे वसुल करून देखील सुविधा न पुरविणारा शिंदे पळसे टोलनाका आणि वाहतुकीचे नियमन याकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे असल्याचे प्रवाशांचे मत आहे.   

पहा जरा विचार करुन.! 

अल्पवयात मुलांना आपण स्वत: काय करतो आहे हे फार काही लक्षात येत नाही. मात्र, आपले पाल्य काय करतात, किंवा आपले विद्यार्थी काय करतात हे शिक्षकांना माहित असते. परंंतु, मोबाईल आणि कामाचा व्याप यामुळे पालकांना वेळ नाही आणि मारण्याचे सोडा.! बोलण्याचे देखील स्वातंत्र्य शिक्षकाकडे राहिले नाही. त्यामुळे, विद्यार्थी पुर्णत: संस्कार आणि संस्कृतीच्या पलिकडे जाऊ लागले आहेत. मुळात अभ्यासक्रम आणि पुस्तके हे फक्त ब्ला-ब्ला बोलणारे बाहुले तयार करतात. मात्र, प्रसंगावधान आणि प्रॅक्टीकल ऐज्युकेशन देणार्‍या संस्था काही निर्माण होताना दिसत नाही. लाखो रुपयांची फी घेऊन मुलांना नोकरी आणि पैशाच्या बाजारात उतरविण्यासाठी पात्र केले जाते. मात्र, सदसद विवेकबुद्धी, संयम आणि जगण्यासाठी पुरक असणारे ज्ञान कोणी द्यायला तयार नाही. कारण, पाच प्रवाशांची क्षमता असणार्‍या वाहनात आपण आठ जणांनी बसावे का? आपण अल्पवयीन असताना गाडी चालवावी का? घरच्यांच्या विरहीत इतक्या लांब लग्नाला जाणे अनिवार्य होते का? कॉलेज बुडवून, खोटे सांगून असे कृत्य करणे संयुक्तीक आहे का? अशा अनेक कल्पना आजकालच्या मुलांच्या डोक्यात का येऊ शकत नाही? मग याला जबाबदार कोण?