सहावीच्या मुलीची जवळच्या व्यक्तीकडून छेडछाड, आईने जाब विचारला तर तो पळत सुटला.! गुन्हा दाखल.!
सार्वभौम (संगमनेर):-
संगमनेर तालुक्यातील पठारभागातील अंबीखालसा परिसरात नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. घरातील चहा पावडर संपली आहे, चहापावडर दे असे म्हणुन पस्तीस वर्षीय व्यक्ती घरात घुसला आणि दहा वर्षीय मुलीसोबत त्याने अश्लील कृत्य केले. या झटापटीत पीडित मुलीच्या शर्टचे बटन तुटले ती कशीबशी त्याच्या हातातुन निसटून घराबाहेर पळाली. ही सर्व धक्कादायक घटना गुरुवार दि. ८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार ३५ वर्षीय चंद्रकांत रामचंद्र गाडेकर याच्यावर पोक्सो, विनयभंग या कलमान्वये घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील करत आहे. खरंतर, संगमनेर तालुक्यात महिला अत्याचारासह अल्पवयीन मुली गर्भवती राहण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. यामध्ये पोक्सो सारखे गंभीर गुन्हे वारंवार घडत आहे. त्यामुळे, इथे शाळा, कॉलेज, वाडी वस्तीवर सामाजीक कार्यकर्त्यांनी, लोकप्रतिनिधीनी, महिला आयोगाने वेळीच जनजागृती करणे गरजेचे आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, आंबीखालसा परिसरात एक कुटुंब आहे. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. त्यांचा शेतमजुरीबरोबर किराणा दुकानाचा छोटासा व्यवसाय देखील आहे. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. गुरुवार दि. ८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ६ वाजता पिडीत मुलीची आई आणि वडील दुकानात काम अवरण्यासाठी गेले होते. तेव्हा पिडीत मुलगी घरी होती, तिला आईने घरातील काम अवरण्यासाठी सांगितले होते. पिडीत मुलीचे आई वडील काम आवरून ७:३० वाजता आले तेव्हा पिडीत मुलगी बाहेर खाटावर तोंड सोडून घराबाहेरील पलंगावर बसलेली होती. त्यावेळी आईने पिडीत मुलीला विचारले की, तु का तोंड सोडुन बसलेली आहे? तेव्हा पिडीत मुलगी आईला म्हणाली की, चंद्रकांत गाडेकर हा घरी चहा पावडर घेण्यासाठी आला होता. तेव्हा मी त्यास म्हणाले. की, चहापावडर शिल्लक नाही. तेव्हा तो म्हणाला की स्वयंपाक घरात पहा तिथे असेल. पिडीत मुलगी घरात गेली असता आरोपी चंद्रकांत गाडेकर हा देखील पिडीत मुलीच्या पाठीमागे घरात घुसला.
दरम्यान, आरोपी चंद्रकांत गाडेकर हा पिडीत मुलीच्या पाठीमागे जाऊन तिच्या अंगाला झटु लागला व अश्लील चाळे करू लागला. पिडीत मुलीने आरडाओरडा करत आरोपीच्या हातातुन सुटण्यासाठी धडपड केली. या झटापटीत पिडीत मुलीच्या शर्टचे बटन तुटले, त्यामुळे ती प्रचंड घाबरुन गेली. मात्र, तरी देखील प्रसंगावधान राखून तिने त्याच्या हातातुन पळत काढण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान, पस्तीस वर्षीय आरोपीने पिडीत मुलीची पँन्ट ओढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पिडीत मुलगी घाबरून ओरडत-ओरडत घराच्या बाहेर पळाली. यावेळी फार बोभाटा होताच आरोपी चंद्रकांत गाडेकर याने तेथून पळ काढला आणि कोणाला काही सांगितले तर मी तुला जीवे सोडणार नाही अशी धमकी दिली. त्यामुळे, पीडित मुलगी ही पुर्णत: घाबरुन गेली होती. तो पळुन गेल्यामुळे, ती घरात देखील जाण्याचे धाडस करत नव्हती.
दरम्यान, हे सर्व तिने आपल्या आईला सांगितले असता पिडीत मुलीच्या आईने आरोपीला जाब विचारण्यासाठी त्याचे घर गाठले. मात्र, तो घरी नव्हता. त्याचा शोध घेत असताना तो दिसला आणि तिने त्यला रस्त्यात अडवले. तु माझ्या लेकरासोबत असे का केले? असा जाब विचारला असता त्याने तेथुन पळ काढला. त्यानंतर, पिडीत मुलीच्या आईला राग अनावर झाला त्यांनी यात आरोपी चंद्रकांत गाडेकर याला पाठीशी न घालता थेट घारगाव पोलीस ठाण्यात जाऊन आपली कैफियात मांडली. त्यानंतर पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन घेत आरोपीचा शोध सुरू केला आहे.