संगमनेर पोलीस ठाण्याच्या आवारात फिल्मी स्टाईलने चॉपरने हाणामारी, चाकू, दांडे, गज आणि राडा.! एक गंभीर जखमी, 11 जणांवर गुन्हे दाखल.!
सार्वभौम (संगमनेर) :-
बॅगा विकण्याच्या जागेवरून शुल्लक वाद झाले होते. ते मिटले पण, त्याची खुन्नस काढण्यासाठी रात्री दोन गट एकमेकाला भिडले. त्यामुळे, किरकोळ कारणाचे रूपांतर मोठ्या वादात होऊन दोन गटात तुंबळ हाणामारी झाली यावेळी तरुणांमध्ये फिल्मी स्टाईलने हाणामाऱ्या झाल्याचे पहायला मिळाले. यात उमेर या तरुणावर चॉपरने पाठीवर वार केल्याची धक्कादायक घटना संगमनेर शहरातील पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली. ही घटना बुधवार दि. 28 डिसेंबर 2022 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये आरोपी निखील मुर्तडक, श्याम अरगडे, नयन मुर्तडक, सुनिल धात्रक, सागर इतर 5 ते 6 सर्व. रा. संगमनेर यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शलमोन सातपुते करत आहे.
संगमनेर शहरात वारंवार कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. कोठे पोलिसांना मारहाण होतेय तर कोठे पुढारी कायदा हातात घेतात. राजरोस चोऱ्या होत असुन महिलांची मंगळसुत्रे हिसकावून नेली जात आहेत. जसे पोलीस निरीक्षक देशमुख आले तसे कायदा सुव्यवस्थेचा धिंदडे निघाले. त्यांच्या काळात पोलीस ठाण्यावर हल्ला झाला. पोलिसांवर हल्ला झाला आज पुन्हा पोलीस आवारातच चॉपरने हल्ला झाला. त्यामुळे, येथील कायदा व सुव्यवस्था वेशीवर टांगली जात असुन अद्याप गोहत्या मोठ्या प्रमाणावर सुरूच आहे. खरंतर, देशमुख यांच्या उचलबांगडी नंतर येथील कायदा सुव्यवस्था सुरळीत होईल असे वाटत असताना येथे राजरोस दरोडे पडत आहे. संकेत नवले सारख्या तरुणांचा खुन होत आहे. वीस दिवस उलटूनही त्याचा उलगडा होत नाही. निव्वळ गुन्हे घडत आहे ते तपासावर जात आहे. अनेक गुन्ह्यांचा तपास सुरूच असल्याने शहरातील नागरिकांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मेहबुब इब्राहीम पारवे याने दिलेल्या फिर्यादीनुसार 28 डिसेंबर 2022 रोजी अशोक चौक येथे दुपारी चार वाजताच्या दरम्यान निखील मुर्तडक व आशपाक खान या दोघांमध्ये बॅग विकण्याच्या जागेवरून भांडण झाले होते. हा वाद काही मध्यस्थीनी मिटवून या वादाचा समझोता करून दिला. त्यानंतर रात्री 9:30 ते 10 च्या दरम्यान महेश नागरी पतसंस्थेजवळ फिर्यादीचा मुलगा उमेर व त्याचे दोन मित्र गप्पा मारत बसले होते. त्याच ठिकाणी आरोपी निखील मुर्तडक,शाम अरगडे,नयन मुर्तडक,सुनील धात्रक,सागर व इतर पाच ते सहा जण आले त्यांच्या हातात लोखंडी गज,चाकू, लाकडी दांडे घेऊन आले. त्यांनी दुपारचा राग मनात धरून पिडीत उमेर यास शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली.
दरम्यान, मारहाण करत्यावेळी पिडीत उमेर याचा चुलत भाऊ सुफियान शेख व सोहेल शेख त्या ठिकाणी आले. ते उमेरला घेऊन तक्रार देण्यासाठी संगमनेर शहर पोलीसठाण्याकडे निघाले. पिडीत उमेर व त्याचे भाऊ पोलीस ठाण्याकडे जात असताना त्यावेळी रस्त्यातच पोलीस आवारा समोर बाप्ते किराणा दुकानाजवळच आरोपींनी पुन्हा पिडीत उमेर यास हटकवले. तु आमच्या विरुद्ध तक्रार देण्यास चालला आहे का. असे म्हणुन आरोपीतील एकाने उमेरच्या पाठीवर डाव्या बाजुस चॉपरने वार करून गंभीर जखमी केले. उमेर याचा मोठ्या प्रमाणात रक्तश्राव सुरू झाला. त्यावेळी तेथे लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. उमेर यास नातेवाईकांनी खाजगी दवाखान्यात उपचारासाठी हलवण्यात आले.
उमेर हा बोलण्याच्या स्थितीत नसल्याने उमेरच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात येऊन अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल केला. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सातपुते करत आहे. हा प्रकार घडल्यानंतर काही नेत्यांनी यावर पडदा टाकण्याचे काम केले पण, दुपारीच समोपचाराने मिटवले असते तर हा प्रकार घडला नसता. तर दुपारीच पोलिसांनी गुन्हे दाखल करून खाकी दाखवली असती तर हा वाद विकोपाला गेला नसता.