डुप्लिकेट बायको उभी करुन नवरदेवाकडून लांबविले अडिच लाख आणि साडेतीन तोळे सोने.! मावशी, मामासह तिघांना ठोकल्या बेड्या.!


सार्वभौम (अकोले) :- 

 वडिलांनी एका महिलेला पोरास पोरगी पाहण्यास सांगितले होते. या महिलेने थेट डुप्लिकेट बायको देणार्‍या टोळीशी संपर्क साधला. अडिच लाख रुपये देऊन बायको देण्याची डिल झाली. ठरल्याप्रमाणे पैसे दिले आणि लग्नाच्या दिवशी साडेतीन तोळे सोने सुद्धा नवरदेवाने सहखुशीने नवरीच्या अंगावर घातले. मात्र, चारदोन दिवस उजाडतात कोठे नाहीतर बाई झाली पसार.! ही घटना काही बाहेरील राज्यातील नसुन खुद्द अकोले तालुक्यातील पानसरवाडी परिसरात दि. १७ सप्टेंबर २०२२ रोजी घडली आहे. यात सहा. पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली महेश आहेर, कुलदीप पर्बत आणि विजय आगलावे यांनी इतका सुंदर केला. की, मुख्य रोल असणार्‍यांनी पहिल्या तिघांना ताब्यात घेऊन घटनेचा उलगडा केला आहे. यात पुजा समाधान देशमाने उर्फ प्रिया प्रकाश शेंडगे (रा. राहाता), सोनु खैरे उर्फ अभिजित संजय पाटील (रा. आमळनेर, जि. नाशिक) आणि सविता पक्षीराम भुजबळ (रा. शाहुनगर, ता. अकोले) अशा तिघांना अटक करण्यात आली आहे. तर, यशवंत जाधव (रा. मढ, बुलढाणा), साहेबराव माधव डांगे (रा. बोंबरे वस्ती, कोर्‍हाळे, राहाता) व निकम बाब (रा. कानमंडळ, नाशिक) ही तिघे पसार आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगरपंचायतीच्या हाद्दीत राहणार्‍या एका तरुणाचे लग्न जमविण्यासाठी त्याच्या वडिलांनी सविता भुजबळ महिलेशी संपर्क केला होता. तेव्हा हिने सांगितले की आमच्या देशमांने यांच्याकडे काही मुली आहेत. त्यासाठी आपल्याला प्रिया यांच्याशी संपर्क साधावा लागेल. म्हणतात ना.! गरजवंताला अक्कल नसते त्यामुळे, अकोल्यातून काही मानसे मुलगी पाहण्यासाठी थेट येवल्याला गेले. दि. ५ सप्टेंबर २०२२ रोजी यांची बैठक पार पडली आणि लग्न हे गावाकडेच करण्याचे ठरले. कारण, आरोपींनी असे सांगितले की, मुलीची आई मयत झाली आहे. तिचा बाप येथे नसून तो मुलीस संभाळत नाही. त्यामुळे, तिच्या लहानपणापासून आम्हीच संभाळ केला आहे. हे सर्व बनावट रचलेले कुभांड नवरदेवासह त्याच्या नातेवाईकांना पटले आणि त्यांनी तत्काळ गुढग्याला बाशिंग बांधले..!!

दरम्यान, येवल्याची नवरी, बुलढाण्याचा मामा, मयत आई  आणि शाहुनगरच्या मध्यस्तीनंतर अकोल्याच्या पानसरवाडी परिसरामध्ये दि. ८ सप्टेंबर २०२२ रोजी हा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात एकमेकांना खुनवाखुनव करत पार पडला. यावेळी नवरदेवाच्या मानसांनी मुलीच्या अंगावर चक्क साडेतीन तोडे सोन्याचे दागिने सुद्धा घातले होते. मात्र, ही नवरी बनावट आणि अल्पवयीन आहे याची कल्पना देखील नवरदेवाला नव्हती. लग्न झाले त्यानंतर नवरदेवाने नोटरी देखील करून घेतली होती. त्यात आरोपी यांना २ लाख ५० हजार रुपये देण्यात आल्याचे नमुद करण्यात आले होते. त्यामुळे, कागदोपत्री यांनी पुरावे तयार करुन कायदेशिर लग्न लावून घेतले होते. मात्र, तरी देखील डुप्लिकेट लग्नाचा त्यांना जरा सुद्ध सुगावा लागला नाही.


दरम्यान, लग्न झाल्यानंतर यांच्यातील काही तासांचा सुखी संसार सुरू झाला होता. दि. १५ सप्टेंबर २०२२ रोजी मुलीचे बनावट मामा आणि मावशी अकोल्याला आली. त्यांनी मुलीला नांदायला ठेवायचे असेल तर दोन लाख रुपये आणखी द्यावे लागतील असे म्हणून वाद घालणे सुरू केले. दुसर्‍या दिवशी नवरी सोबत नवरदेव आणि अन्य व्यक्ती येवला येथे गेले. त्यावेळी, आरोपी यांनी तिच्या गळ्यात जे साडेतीन तोळ्याचे दागिने घातले होते. ते सर्व काढून घेतले होते. तेथे गेल्यानंतर त्यांनी नवरदेव आणि नवरी याची भेट सोडा.! बोलणे देखील होऊ दिले नाही. तेथे देखील यांच्यात वाद झाला. आम्हाला तुमच्याशी काही घेणे देणे नाही. आम्हास आमची मुलगी परत करा असे म्हणून अनेकांनी आरोपींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी ठरला.

दि. १७ सप्टेंबर रोजी नवरदेवासह त्यांचे नातेवाईक ज्या रुमवर राहिले होते. तेथून आरोपी आणि नवरी देखील निघुन गेली होती. जेव्हा, ही लोक हताश झाली तेव्हा तेथील एका महिलेने यांना सांगितले. की, बनावट लग्न करुन फसवणुक करणारी यांची फार मोठी टोळी आहे. यांचा हाच प्रोफेशनला व्यावसाय आहे.त्यामुळे, तुम्ही यांच्या नादाला कशाला लागलात? तुम्ही आता पोलीस ठाण्यात जा. जेव्हा हे लोक येवला पोलीस ठाण्यात गेले. तेव्हा त्यांना समजले. की, उलट याच आरोपींनी नवरदेवासह अन्य व्यक्तींवर कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केलेली होती. म्हणजे करुन गेलं सारं गाव अन कागदोपत्री यांचे नाव.! या म्हणीप्रमाणे चोराच्या उलट्या बोंबा झाला. पोलिसांनी तेथे यांची चौकशी केली आणि हेच पीडित असल्याचे लक्षात येताच यांना अकोले पोलीस ठाण्यात जाण्याचा त्यांनी सल्ला दिला.

दरम्यान, आरोपी प्रिया हिने नवरदेवाकडच्यांना तीन ते चार वेळा फोन करुन तीन लाख रुपयांची मागणी केली. हे पैसे जर दिले नाही. तर, तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करु आणि आमच्या मुलीचे आणखी दुसर्‍या ठिकाणी लग्न लावून देऊ असे म्हणून वारंवार धमकी दिली. हा प्रकार कौटुंबिक आणि भावनिक नसून व्यावसायीक आहे. यांची मुलाच्या भावनांचा खेळ केला असून अडिच लाख रुपये आणि साडेतीन तोळे सोने नेले आहे. त्यानंतर पीडित नवरदेवाने थेट अकोले पोलीस ठाणे गाठले आणि दि. १२ ऑक्टोबर २०२२ रोजी सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर सहा. पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली महेश आहेर, कुलदीप पर्बत आणि विजय आगलावे यांनी या घटनेचा तपास करुन बनावट लग्न लावून देणार्‍या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे जर कोणाची फसवणुक झाली असेल. तर, तत्काळ पोलीस ठाण्यात संपर्क करा असे आवहान घुगे यांनी केले आहे.