संगमनेरात उडीसाचा गांजा पकडला.! २४ लाखांच्या मुद्देमालासह दोघांना अटक.! पार्टी येण्यापुर्वीच पोलिसांची कारवाई.!

- sushant pawase 

सार्वभौम (संगमनेर) :- 

                   उडीसाहून आलेला उच्च दर्जाचा गांजा पारनेर येथे घेऊन जात असताना तो संगमनेर तालुक्यातील सगमनापूर येथे ताब्यात घेण्यात आला. ही कारवाई संगमनेर पोलीस उपाधिक्षक राहुल मदने यांच्या पथकाने शनिवारी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास केली. यात २३ लाख ८५ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तर १७२ किलो ८६ ग्रॅम गांजासह अन्य वस्तु आणि दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. मदने यांचे प्रमोशन झाल्यानंतर त्यांची ही एक मोठी कारवाई झाली आहे. या गुन्ह्यात संदिप लक्ष्मण भोसले (वय ३५, मलकापुर, ता. कराड, जि. सातारा) व बाळासाहेब भाऊसाहेब शिंदे (वय ३०, रा. वडगाव सावताळ, ता. पारनेर, जि. अ.नगर) अशा दोघांना अटक करण्यात आली आहे. हा गांजा उडीसाहून पारनेर आणि तेथून तो पिंपरी चिंचवड, मुळशी अशा काही ठिकाणी वितरीत केला जाणार होता अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अप्पर पोलीस उपाधिक्षक राहुल मदने यांना गोपनिय माहिती मिळाला होती की, लोणीकडून संगमनेरकडे एक ब्रिझा कारमधून गांजा जाणार आहे. तेव्हा मदने यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्यासह एक पथक समनापूर येथे रवाना केले. आलेल्या प्रत्येक वाहनांची पोलिसांनी चौकशी सुरू केली. ज्या काही संशयास्पद होत्या त्यांची तपासणी देखील केली. रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास एम.एच.५० एल.९९७० ही कार आली असता पोलिसांनी ती आडविली. गाडी बाजुला घेऊन त्यांना गाडीत काय आहे हे विचारले असता त्यांनी उडवाउडविची उत्तरे दिली. तर, गाडीची चौकशी करु नका असे म्हणून गांजा तस्करांनी विरोध केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना कायदेशीर समज दिली.

दरम्यान, दोघांनी पळापळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांचा मोठा फौजफाटा असल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना अपयश आले. पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता त्यात १७ प्लॅस्टीकचे बॉक्स दिसले. त्यातून उग्र वास येत होता. जेव्हा ते खोलुन पाहिले तेव्हा लक्षात आले. की, त्यात काळपण हिवरट रंगाची पाने, फुले, काड्या व बिया असलेले कॅनाबीस या वनस्पतीचे शेंडे होते. हा गांजा असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. जेव्हा या पॅकेटचे मोजमाप केले तेव्हा लक्षात आले की, एक पॅकेट ९० हजार रुपयांचे म्हणजे सरासरी लाखभर रुपयांचे होते. त्याचे संपुर्ण वजन हे १७२ किलो ८६ ग्रॅम असून तो एक उच्च प्रतीचा गांजा आहे. तर, पोलिसांनी कार, त्यांचे मोबाईल आणि गांजा असा मिळून २३ लाख ८५ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

दरम्यान, आरोपी बाळासाहेब भाऊसाहेब शिंदे (रा.पारनेर) याच्याकडे हा गांजा ठेवला जाणार होता. तर, तो पुणे जिल्ह्यात वितरीत करणार होता. त्यासाठी एक पार्टी देखील त्याच्याकडे येणार होती. त्यामुळे, आता संगमनेरसह हा गांजा कोठेकोठे जाणार होता. याचा तपास करणे पोलिसांसाठी आव्हान असणार आहे. तर, संगमनेरात अजून देखील गांजा येतो आणि तो जिल्हाभर वितरीत होतो हे लक्षात येत आहे. यापुर्वी नगर शहरात १ कोटी १४ लाख रुपयांचा गांजा राकेश मानगावकर यांनी पकडला होता. त्यात अनेक आरोप प्रत्यारोप झाले. चार पोलीस निलंबित देखील झाले होता. हा गांजा संगमनेर तालुक्यातून आला होता. मात्र, पुर्वीप्रमाणे संगमनेरात गांजा विक्री होत नसून त्यावर पोलिसांचा अंकूश असल्याचे दिसते आहे. तर अकोले तालुक्यात मात्र संगमनेरहून गांजा येत आहे. त्यावर अंकूश बसविण्यात पोलिसांना अपयश आले आहे. ही आयात कमी असल्याने चांगल्या सोर्स शिवाय ते शक्य नाही. ही कारवाई पो.कॉ. सुभाष बोडखे, पो.कॉ. अमृत आढाव,पो. ना. अण्णासाहेब दातीर, पो.कॉ. प्रमोद गाडेकर, पो.हे.कॉ अमित महाजन, पो.ना विजय पवार, पो.कॉ कानिफनाथ जाधव, पो.कॉ साईनाथ पवार, व संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पो.ना बाबासाहेब खेडकर, पो.कॉ अनिल उगले, चा.पो.हे.कॉ मनोज पाटील यांनी संगमनेर शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, संगमनेर, पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
 दरम्यान, संगमनेर हे गांजाच्या तस्करीसाठी प्रख्यात आहे. काही दिवसांपूर्वी याच संगमनेरातील कटारीयानगर परिसरात 10 लाख रुपयांचा गांजा पकडला होता. तर अनेक ठिकाणी गांजा तस्करीत संगमनेरचे आरोपी आढळून आले आहे. इतकेच काय! हैदराबाद मध्ये देखील गांजाचे संगमनेर कनेक्शन आढळले होते. तर ठाण्यातील पोलिसांनी संगमनेरातुन गांजा तस्करीचा आरोपीच्या मुसक्या आवळल्या होत्या. तर याच संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील गांजा तस्करीतील एक महिला आरोपी अद्याप फरार आहे. तिला पकडण्यात आजपर्यंत पोलिसांना अपयश आले आहे. हा गुन्हा घडुन वर्ष उलटले तरी देखील ही महिला आरोपी फरार आहे.