राजकारणातील अपवादात्मक अजातशत्रू व्यक्तिमत्व- कैलासराव वाकचौरे

 

- घनश्याम माने (लेखक)

सार्वभौम (विशेष) :- 

                  राजकारणात राहून कुणी अजातशत्रू राहू शकत नाही हे निर्विवाद सत्य आहे. मात्र, प्रत्येक गोष्टीला एखादा का होईना अपवाद असतोच. या बाबतीतला अहमदनगर जिल्हा परिषदेच्या राजकारणातील अपवाद म्हणजे अहमदनगर जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकामचे माजी सभापती, अगस्ति सह साखर कारखान्याचे माजी व्हॉइस चेअरमन मा कैलासराव वाकचौरे. कैलासराव अर्थात आमचे सोयरे भाऊंनी गेले 30 वर्षे राजकारणात अनेक पदांवर काम केलं, मात्र त्या पदांचा सर्वसामान्यांसाठी अनं त्या-त्या क्षेत्रातील काम करणाऱ्या लोकांसाठी जो काही उपयोग केला तसा तो तितक्याच निरपेक्ष भावनेने व कसलीही अपेक्षा न ठेवता. मला नाही वाटत तसे कुणाला करता आला असेल. जेष्ठ नेते मिनानाथ पांडे एका कार्यक्रमात म्हणाले होते. की, कैलासराव वाकचौरे हा तालुक्यातील ऐकमेव असा नेता आहे की जो कार्यकर्त्यांची कामे स्वतःच्या खिशाला झळ घालून करतो. गाडी त्यांची न पेट्रोलही त्यांचेच. ज्याच काम त्यानं फक्त गाडीत बसायच आणि हे अक्षरशः खरं आहे. कॉलेज जीवनापासून मी पाहत आलोय हे सारं. आणि नंतर त्यांची बहिन माझ्या आयुष्यात आल्यापासून तर अधिकच जवळून...!!

              कुटुंबियांच्या आणि आम्हा नातेवाईकांच्या जेव्हढे भाऊ वाट्याला आले त्यापेक्षा कितीतरी जास्त ते कळसच्याच नव्हे तर साऱ्या तालुक्याच्या वाट्याला आले.अनं कळसने आणि तालुक्यानेही भाऊंना भरभरून प्रेम अन सन्मान दिला. ग्रामपंचायत अनं सोसायटी पासूनचा त्यांचा सुरू झालेला प्रवास आज अगस्तीचे व्हॉईस चेअरमन, अकोले पंचायत समिती सभापती ते जिल्हा परिषदेचे अर्थ बांधकामचे दोन वेळेस सभापती असा झाला आहे. त्याच मोठं श्रेय हे  प्रथमत: कळसकरांना जात. भाऊंच्या 30 वर्षांच्या राजकीय जीवनात एखादा अपवाद सोडता एकही लाट कळसची सीमा ओलांडून अकोल्यात शिरू शकली नाही. लाटा होत्या त्या फक्त भाऊ जिथं असतील त्या त्या पक्षांच्या. कळस सारखं तालुक्यातील एक सर्वात मोठ, समृद्ध आणि जागरूक गाव 30 वर्षे भाऊंच्या नेतृत्वाखाली काम करतंय हे त्यांचं केव्हढं मोठं वैयक्तिक यश आहे. तालुका सोडा जिल्ह्यात हे किती धुरीणांना साध्य झालंय माहित नाही. त्याला कारनंही तशीच आहेत. गावातील अस एक घर नसेल की ज्यांच्या आयुष्याला भाऊंचा या ना त्या कारणानं स्पर्श झाला नसेल.भाऊंना त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे कदाचित कधी त्यांच्या आनंदात सहभागी व्हायला जमलं नसेलही. मात्र आख्या कळससाठी आधारासाठी पहिला आणि शेवटचा माणूसही भाऊच.! अन यात अतिशोयोक्ती नाही हे अवघा तालुका जाणतो. सगळं कळस हे त्यांच कुटुंबच. कितीही छोटं काम असो की मोठं सगळ्यांना भाऊच लागतात आणि भाऊंचाही कळसवासीयांसाठी कधी नकार नसतोच. अवघ्या कळसचा कायापालट केलाय भाऊंनी तोही सर्वांगानी. कळस देवस्थान परमपूज्य सुभाषपूरी महाराजांनी महाराष्ट्रभर पोहचवले. त्या बाबांचा भाऊंवर प्रचंड जीव होता आणि भाऊंची त्यांच्यावर श्रद्धा. महाराजांच्या पश्चात हे देवस्थान राजकाराविरहित ठेवलंय भाऊंनी.

              कळसच्या लोकांच प्रेम, स्वतःचं कर्तृत्व आणि विरोधी पक्षनेते मा अजितदादा पवार व माजी मंत्री मधुकरराव पिचड साहेब यांनी दिलेल्या संधी व मा आमदार वैभवराव पिचड यांचं सहकार्य याच्या जोरावर भाऊ जिल्ह्याच्या राजकारणातील एक सर्वाधिक स्वीकारार्ह नेता म्हणून उदयास आले. वयाच्या तिशीत त्यांनी अगस्ति साखर कारखान्याच्या व्हॉईस चेअरमन पदाचा कारभार पाहिला तेही पिचड साहेब मंत्री असल्याने मुंबईत असताना...., नंतरचा पाच वर्षे अकोले पंचायत समितीचे सभापती म्हणून भाऊंचा कार्यकाळ आजही सर्वजण आठवतात तो त्यांनी केलेल्या कामांमुळे आणि एक रुपयाचाही भ्रष्टाचार न होता झालेल्या पारदर्शक बदल्यांमुळे. नंतर गेले 10 वर्षे भाऊ नगर जिल्हा परिषदेचे सदस्य होते. 2 वेळेस त्यांना अर्थ व बांधकामच सभापतीपद मिळालं. एवढ्या मोठ्या आणि महत्वाच्या पदाबरोबरच राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते म्हणूनही मा.अजित दादांनी भाऊवरच विश्वास दाखवला. या दहा वर्षाच्या काळात एखाद्या आमदाराने करावीत एव्हढी कामे त्यांनी अकोल्यात केली आणि महत्वाचे म्हणजे जिल्ह्यातील सगळ्या दिग्गज घराण्यांच मग ते ना. विखे असो, आ. थोरात असो की गडाख साहेब साऱ्यांचा विश्वास आणि प्रेम मिळवलं. गेल्या 30 वर्षात अकोले तालुक्यातील सगळ्या निवडणुकांच काँग्रेस वा राष्ट्रवादीसाठीच त्यांच नियोजन हा तर संशोधनाचा विषय आहे. या बाबतीत ते आजही एकमेवाद्वितीय आहेत.भविष्यातही आमदार किरणजी लहामटे व सिताराम पा. गायकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुक्यात मजबूत  होण्यासाठी भाऊ नक्कीच रात्रीचा दिवस करतील यात तिळमात्र शंका नाही.

  या सगळ्यांच्या पलिकडचेही भाऊ मला दिसलेत. आपल्या आख्या सामाजिक आणि राजकीय आयुष्यात या माणसानं एक चुकीचा शब्द कधी कुणाविषयी जाहीरपणे उच्चारला नाही. स्वतःच्या वा अगदि पक्षाच्या फायद्यासाठीही राजकारण कधी खालच्या पातळीवर जाऊ दिलं नाही मग भले नाही पटलं तर गप्प का राहण होईना.! सगळ्या नातेवाईकांच्या बाबतीत प्रचंड अलवार असणारे भाऊ मी बघितलेत. मोकळा वेळ असेन तर क्षणार्धात सगळ्या घरच्या पोरांना आणि भाच्यांना बोलावून घेत त्यांच्याबरोबर गप्पा मारत, कॅरम खेळत रात्र जागवणारे भाऊ मी बघितलेत आणि हो.!  कुणालाही न सांगता एका होतकरू इंजिनीरिंगच्या विद्यार्थिनीचा खर्च उचलणारे भाऊही मला माहीत आहे. या पलिकडे शिक्षकांनी सुरू केलेल्या कोविड सेंन्टरसाठी लाखभराची देणगी हळूच आमच्याकडे सोपावणारे भाऊही मी पाहिलेत. मोठा भाऊ बाळासाहेब अत्यवस्थ झाल्याचा फोन आल्यानंतर आहे त्या कपड्यानिशी कळसकडे धाव घेणारे भाऊही आम्ही अनुभवलेत, त्या काळातील त्यांची अस्वस्थता आम्हाला बघवण्यापालिकडील झाली होती. पप्पाची छोटी गाडी घेऊन पुण्याला जाऊ नका मी सकाळी माझी गाडी पाठवतो असं मी ऐकतो की नाही म्हणून माझ्या आदीला बजावणारे भाऊ मी अनुभवलेत, आणि हो.! अगदीच वैयक्तिक म्हणाल तर माझ्या आईचा अंत्यविधी रात्री अकराला झाल्यानंतर रात्री दोन वाजता कुणालाही न सांगता आपल्या मित्राला घेऊन स्मशानभूमीत जाऊन सर्व सुरळीत होतंय का हे पाहणारे भाऊही मी त्यांच्या त्याच मित्राच्या सांगण्यातूनही अनुभवलेत. शेवटी एव्हढेच म्हणेन की भाऊ, आम्ही सारे कधीच आमचे सगळेच प्रश्न घेऊन तुमच्याकडे येत नाही कारण फक्त तुम्ही आमच्याबरोबर आहात हा आम्हाला त्या प्रश्नांना भिडायला पुरेसा असतो. जन्मदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा..!!