चार चिमुरड्यांच्या मृत्युनंतर वायरमनसह तिघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल.! सार्वभौमची महसुलमंत्र्यांकडून दखल.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील पठारभाग परिसरात वांदरकडा, खंदरमाळवाडी येथे शालेय मुलांना विद्युत वाहक तारेचा करंट लागून चौघा भावांचा मृत्यु झाल्याची घटना काल घडली होती. त्यात अनिकेत अरुण बर्डे (वय १२), ओमकार अरूण बर्डे (वय १०), दर्शन अजित बर्डे (वय ८) आणि विराज अजित बर्डे (वय ६) अशा चौंघांना जीव गमवावा लागला होता. ही घटना काही नैसर्गिक नव्हती. तर, यात अनेकांचा हालगर्जीपणा होता. त्यामुळे, या बालकांना न्याय मिळावा म्हणून दोषी व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अशा प्रकारचे वृत्तांकन रोखठोक सार्वभौमने केले होते. त्याची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित कुटुंबाला भेट देऊन ११ लाख रुपयांची मदत केली आहे. तर, तत्काळ दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलीस निरीक्षक सुनिल पाटील साहेब यांनी वायरमन विजय सयाजी भालेराव (रा. घारगाव, ता. संगमनेर) जालिंदर लेंडे व साहेबराव शिवाजी लेंडे (रा. खंदरमाळ, ता. संगमनेर) या तिघांवर गुन्हे दाखल केले आहे. तर यात सुनिल पाटील साहेब यांनी वायरमन विजय भालेराव यास अटक केली आहे.
याबाबत अरुण बर्डे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, दसर्याच्या दिवशी पठार भागावर जोरदार वादळी वार्यासह पाऊस झाला होता. तेव्हा, लेंडे यांच्या शेतात असणार्या पोलावर जी विद्युत तार होती. ती तुटून पडली होती. त्यामुळे, मी डिपीवर जाऊन लाईट हाप केली होती. तर तार तुटली आहे हे संतोष लेंडे यांना सांगितले होते. याबाबत वायरमन यांना कळवा अशी विनंती देखील केली होती. इतकेच काय.! बर्डे यांनी शेतमालक प्रभाकर कोल्हे यांना देखील कल्पना दिली होती. तर, कोल्हे यांनी बर्डे यांना सांगितले. की, तुम्ही वायरमनला स्वत: जाऊन भेटा आणि त्याबाबत कल्पना द्या. मात्र, बर्डे यांना त्या दिवशी शेतात काम होते. म्हणून ते वायरमनकडे गेले नाही.
दरम्यान, कोणताही अनर्थ होऊ नये म्हणून बर्डे हे स्वत: दुसर्या दिवशी सकाळी ११ वाजता घारगाव येथे जाऊन एम.एस.इ.बी अधिकार्यांकडे तक्रार करुन लाईन जोडून द्या किंवा त्याचा बंदोबस्त करा असे सांगितले होते. त्यानंतर काही काम झाले नाही. तर दि. ७ ऑक्टोबर २०२२ रोजी त्याच रोडने जालिंदर लेंडे व साहेबराव शिवाजी लेंडे ही दोघे जाताना दिसली होती. तर, या दोघांनी तार तुटलेली असताना देखील लाईटीचा खटका चालु केला आणि त्यात विद्युत प्रवाह चालु केला. हा सर्व प्रकार अरुण बर्डे यांनी व त्यांची पत्नी यांनी समक्ष पाहिला. कारण, ते जवळच एका शेतात झेंडू निंदत होते. या दोघांनी या उचापती केल्या आणि ते निघुन गेले. आता त्यांनी हा प्रकार का केला हे माहित नाही. त्यामुळे, बर्डे यांनी दोघांनाही विरोध केला नाही.
दरम्यान, दि. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ अनिकेत अरुण बर्डे, ओमकार अरूण बर्डे, दर्शन अजित बर्डे आणि विराज अजित बर्डे हे शाळेत गेले होते. ते ११ वाजण्याच्या सुमारास परत आले. त्यांनी जेवण केल्यानंतर ते जवळच असलेल्या तलावाकडे गेले होते. तेथे त्यांना तारीला करंट असेल असे वाटले देखील नव्हते. मात्र, ते खेळत असताना त्यांना करंट लागला आणि हा भयानक प्रकार घडला. त्यानंतर दुपारी २ वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीचा फोन बर्डे यांना आला. तेव्हा त्यांना सांगितले. की, मुलांना करंट लागला आहे. तेव्हा एका व्यक्तीने डिपी हाफ केली आणि मुलांना बाहेर काढले. त्यांना ऍम्बुलन्समध्ये रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तोवर फार उशिर झाला होता.
तर, यात अधिकची चौकशी करुन केवळ याच व्यक्तींना आरोपी करुन नये. तर, अधिकारी देखील यात तितकेच दोषी आहेत. तसेच ज्या कार्यालयात तक्रार केली. त्यांनी या घटनेची तत्काळ दखल का घेतली नाही. ज्या अधिकार्यांच्या अखत्यारीत हा भाग आहे. त्यांनी कधी पोलांची परिस्थिती, तारांची परिस्थिती पाहिली का? की केवळ ते मलिदे खात्यात व्यस्त आहेत? या घटनेची देखील सखोल चौकशी केली पाहिजे. जेव्हा नगर तालुक्यात एक शाळा पडली होती. त्यात इंजिनिअर्ससह अधिकार्यांनी आणि कर्मचार्यांनी एव्हाना शाळेची पहाणी केली नाही म्हणून मुख्याध्यापकांना आरोपी केले होते. तर, यात केवळ वायरमन हाच दोषी नसून निकृष्ठ यंत्रणेला देखील दोषी धरले पाहिजे. अशी मागणी पठार भागावरील नेत्यांनी केली आहे. तर, रोखठोक सर्वाभौमने याबाबत सडेतोड लिखान केले होते. अन्यथा हा सर्व प्रकार धकून गेला असता. माध्यमांच्या सतर्कतेमुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती स्थानिक नागरिक व नेत्यांनी दिली.