विद्युत तारांनी चौघा भावांचा जीव घेतला, विज वितरण कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील पठारभागावरील येठेवाडी येथे वांदरकडा या परिसरात तलावात पोहण्यासाठी गेलेल्या चार चिमुरड्या मुलांचा विद्युतवाहक तारेचा शॉक लागुन जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना शनिवार दि. 8 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारच्या सुमारास घडली. यामध्ये दर्शन अजीत बर्डे (वय 6), विराज अजीत बर्डे (वय 5), अनिकेत अरुण बर्डे (वय 6), ओंकार अरुण बर्डे (वय 7) असे मयत चिमुरड्यांची नावे आहे. तर घटना कळताच घारगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व चारही चिमुरड्यांना गावकऱ्यांच्या सहाय्याने तलावाच्या बाहेर काढले. या घटनेनंतर गावकऱ्यांनी संताप्त व्यक्त करत ढिसाळ काम करणाऱ्या वीज वितरण कंपनीवर रोष व्यक्त करत दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. तर, वीज वितरण कंपनीचे वायरमन, विभागीय अधिकारी आणि जबाबदार व्यक्ती यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. या घटनेमुळे संपुर्ण संगमनेर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील पठारभागावरील घरगाव परिसरातील येठेवाडी येथे बर्डे कुटुंब राहते. अजीत बर्डे व अरुण बर्डे यांच्या घराजवळच एक तलाव असल्याने दोघांचे ही मुलं रोज तेथे एकत्र खेळतात. दररोज प्रमाणे आज देखील शाळा सुटली असता ते एकत्रच खेळत होते. खेळता-खेळता ते खेकडी पकडणे व पोहण्याच्या निमित्ताने तलावाकडे गेले. मात्र, तेथे वीजवाहक तार तुटुन पडलेली होती. हे चारही चिमुरडे खेळत-खेळत तलावाकाठी या विजवाहक तारेकडे गेले तेथे या चारही चिमुरड्याना विजवाहक तारेचा करंट बसल्याने ते तळ्यात पडले व त्यांचा दुर्दैवी जागीच मृत्यू झाला. ही घटना घडवून काही कालावधी गेला त्यानंतर परिसरातील लोकांनी पाहिले असता त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन या चारही चिमुरड्यांना तलावाच्या बाहेर काढले. अनिकेत व ओंकार हे दोघे सख्खे भाऊ तर दर्शन व विराज हे दोघे सख्खे भाऊ असे चार भावंडांचा जागीच मृत्यू झाला आहे. काल रात्री पासुन त्या परिसरात लाईट नव्हती. लाईटीचा फॉल्ट व्यवस्थित तपासला असता तर ही घटना घडली नसती असे प्रत्यक्षदर्शी लोक बोलत होते. याबाबत पुढील तपास घारगाव पोलीस करत आहेत.
दरम्यान, संगमनेरातील विजवितरण कंपनीचा निष्काळजीपणाचा कळस केला आहे. जो पर्यंत जीवजात नाही तोपर्यंत त्यांच्यामध्ये सुधारणा होत नसल्याचे वारंवार लक्षात येत आहे. आज देखील अशीच घटना घडली. किती दिवस झाले आहे ही तार तुटुन याची माहिती देखील त्यांच्याकडे नाही. आज निष्पाप चार चिमुरड्यांचा जीव संगमनेरातील विज वितरण कंपनीने घेतल्याचा आरोप स्थानिक लोक करत आहे. त्यामुळे, दोषी वीज वितरण कंपनीच्या विरुद्ध तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी स्थानिक गावकऱ्यांनी केली आहे. अनेकदा तारा तुटतात कधी पोल पडतात.तर कधी झाड तारांवर पडते याकडे वीजवितरण कंपनीने तात्काळ लक्ष दिले पाहिजे पण, तसे होताना दिसत नाही. अनेकदा जनावरांच्या अंगावर तारा पडल्याच्या घटना संगमनेरात घडल्या आहे. याकडे वीज वितरण कंपनीने काळजीने पाहिले पाहिजे.
घारगाव आणि करजुले पठार या विजवितरण कंपनीने पुढे वारंवार आंदोलने केली. चुकीचे काम लक्षात देखील आणुन दिले तरी ही संगमनेरातील वीज वितरण कंपनी सुधारण्याचे नाव घेत नाही. सुधारणा मात्र शुन्य वसुली मात्र जोरदार असे वागते. तारा तुटल्या काय, पोलपडले काय याकडे कधी लक्ष दिले नाही. त्यांच्या निष्काळजीपणा मुळेच आजची ही घटना घडली. याला सर्वस्वी जबाबदार फक्त वीज वितरण कंपनी आहे.!
- जनार्दन आहेर (शिवसेना तालुका प्रमुख)
वीजवितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळेच ही हृदयद्रावक घटना घडली आहे. पठार भागात डोंगर, झाडे हे मोठ्या प्रमाणात असल्याने या भागातील वीज वितरणाच्या कर्मचार्यांनी अलर्ट राहायला हवे. परंतु दुर्दैवाने तसे होत नाही. आज बर्डे कुटुंबातील चार मुले मृत्यू झाले.अजुन वीज वितरण कंपनी किती बळी घेणार देव जाणे.!
- गौरव डोंगरे (एन. एस. यु. आय अध्यक्ष)
दरम्यान, आजवर विज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे, अनेकांचे बळी गेले आहेत. तर शेतकर्यांना प्रचंड त्रास होत आहे. पठार भागावर अनेक शेतांमध्ये तारांना झोळ पडले आहेत, पोल वाकले आहेत, काही पोलांना करंट उतरले आहेत, काही पोलांवर विद्युत प्रवाह नाहीत. मात्र, वारंवार तक्रारी करुन देखील यांना जाग येत नाही. खरंतर वर्क ऑर्डर नसताना कामे करून घेण्यात यातील काही अधिकारी माहिर आहेत. कित्तेक ठिकाणी विज चोरी आजही प्रत्येक गावात सुरू आहे? कोणाच्या, तर वायरमनांच्या आशिर्वादाने. त्यांना कोठून कसा मलिदा खायला मिळतो. याकडे नेत्यांचे दुर्लक्ष आहे. मात्र, उर्जा मंत्र्याकडे याबाबत एक सामाजसेवक तक्रार करणार आहे. वायरमन ते अधिकारी कसा मलिद्याचा वाटा केला जातो. याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. इतकेच काय.! तर काही कामांच्या चौकशा देखील होणार आहे. त्यामुळे, यांना करंट बसण्यासाठी फार काळ लागणार नाही. परंतु, या चार मुलांचा बळी यांच्यामुळेच गेला आहे. त्यामुळे, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी देखील करण्यात येणार आहे.
या गोष्टींपासून सावधान.!
सर्व पालकांना एक विनंती आहे. की, जरी मुले शाळेत जात असतील आणि आपण मोल मजुरी करीत असला तसेच शेतात काम करीत असाल. तरी मुले घरी आल्यानंतर त्यांच्यावर शेजार्यांना किंवा आपल्या नातेवाईकांना लक्ष ठेवण्यास सांगावे. तसेच, मुले हे शाळेत असताना शिक्षकांच्या सानिध्यात असतात आणि ते त्यांचे एकतात देखील. त्यामुळे, प्रत्येक शिक्षकाने एक बांधिलकी म्हणून मुलांना पुस्तकाच्या पलिकडे जरा एखादा तास मुलांच्या स्वयंजागृतीसाठी वापरला पाहिजे. नदी, नाले, आग्नी, जीवघेणे खेळ, डोंगर, दर्या, विषारी प्राणी यांपासून आपल्याला कशा पद्धतीने धोका कसा आहे. याचे आकलन करुन दिले पाहिजे. ही जबाबदारी केवळ शिक्षकांचीच नाही तर सामाजिक संघटनांची आणि पालकांची देखील आहे. त्यामुळे, अशा घटना टाळण्यासाठी प्रत्येकाने नकळत छोटा तरी प्रयत्न केला पाहिजे.