विखे साहेब.! तुमच्या तहसिलदारांना बोलण्याचे तारतम्य शिकवा.! २५ घरं उघड्यावर आले, संसार वाहून गेले, ते म्हणतात मी काय करू, मला तेव्हढेच काम आहे का?

 

- sagar shinde

सार्वभौम विशेष :- 

              अकोले तालुक्यात गेल्या तिनचार दिवसांपासून काही ठिकाणी मुसळधार पाऊस होतोय. तर, विरगाव, देवठाण, गर्दनी, गणोरे, पिंपळगाव निपाणी या भागात अक्षरश: ८० मिलिमिटर पाऊस म्हणजे ढगफुटीजन्य परिस्थिती पहायला मिळाली. त्यामुळे, या भागात तब्बल शंभर पेक्षा जास्त कुटूंब उघड्यावर आले असून त्यांचे संसार पाण्यात वाहुन गेले आहेत. तर, शेतातील उभे पिक मातीमोल झाले असून शेतकरीच उन्मळुन पडला आहे. आता ही तक्रार करणार कोणाला? तर निच्छितपणे तहसिलदार महोदयांना. जेव्हा त्यांना फोन केला जातो, तेव्हा ते म्हणतात मग मी काय करु? मला काय तेव्हढच काम आहे का? तुम्हाला कळतय का, तुम्ही कोणाशी बोलताय, तुम्ही कोणापुढे उभे आहात अशा पद्धतीची उर्मट उत्तरे ऐकायला मिळतात. नशिब.! हे साहेब जनतेचा पगार घेतात, लोकशाही देशात ते तहसिलदार आहेत. अन्यथा राजघराण्यातून त्यांची नियुक्ती झाली असती तर बाबो.! बोलायलाच नको.! हे सगळं कोणाच्या आशिर्वादाने? तर, महसुलमंत्री विखे साहेबांच्या. याचे कारण म्हणजे, या महोदयांच्या विरोधात शंभर तक्रारी त्यांच्याकडे आल्या असतील. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, साहेब.! यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून एक दिवस असा येईल, की संपुर्ण महसुल विभाग अन्यत्याग करुन यांच्या विरोधात तंबू ठोकून बसेल. तेव्हा जी महसूल खात्याची चव जाईल, हे विसरु नका.!

रंतर प्रशासन हे लोकाभिमुख असावे असे लोकशाही सांगते. तर, सहकार आयुक्त अनिल कवडे साहेब यांनी त्याचा एक उत्तम नमुना राज्याला दाखवुन दिला. प्रवासात सुद्धा काम, सुट्टीच्या दिवशी सुद्धा काम, रात्रीच्यावेळी साहेब पाड्यावर जाऊन संवाद सादत असे. अर्थात जे जिल्हाधिकारी होते. त्यांनी कधी तसा मिजास गाजविला नाही. नगरला जिल्हाधिकारी असताना त्यांनी अकोले तालुक्यात सर्वाधिक भेटी दिल्या, चक्क भर पावसात भाताची आवणी केली होती. कामाची वेळ संपली तरी त्यांनी फोफसंडीला गावसंवाद केला होता. अर्थात हे सांगण्याचा हेतू हा आहे. की, ते जिल्हाधिकारी असताना आपत्कालिन परिस्थितीत स्वत: घराबाहेर पडत होते. शेणाने सारवलेल्या घरात पोतं टाकून चटणी भाकर खात होते. अन आज अकोले तहसिलदार सतिश थिटे साहेब.. यांना संसार वाहून गेले, पिकांचे नुकसान झाले, आदिवासी लेकरं उघड्यावर आली हे पाहुन यावर उपायोजना करण्यासाठी फोन केला तर ते म्हणतात मला तेव्हढच काम आहे का? तुम्ही एका दंडाधिकार्‍याशी बोलताय हे समजत का? ही असली भाषा? ते ही तालुक्याच्या प्रशासकीय पालकाची.!! आपण खरोखर महाराष्ट्रात राहतोय का आणि अकोल्यात लोकशाही नांदतेय का? याचे आत्मचिंतन केले पाहिजे.

खरंतर रावसाहेब वाकचौरे साहेब यांनी जी काही भुमिका मांडली. त्यामागे त्यांची एक तळमळ होती. विरगावात २५ कुटूंबांचे संसार वाहून गेले, घरे पडली, पिकांचे नुकसान झाले, लेकरंबाळं उघड्यावर आली आता ही भयानक परिस्थिती पाहून यंत्रणा कामाला लावणे ही जबाबदारी तहसिलदार यांचीच आहे. मात्र, रोज पाऊस येतोय, नुकसान करून जातोय तरी साहेब साधं डोकायला सुद्ध येत नाही. त्यांना फोन केल्यानंतर मला काय तेव्हढेच काम आहे का? अशी उत्तरे देतात, भावना तिव्र असल्याने शब्दांचे प्लस मायनस होत असते. मग समोरुन उत्तर मिळते. तुम्हाला कळतय का? तुम्ही कोणाशी बोलताय, मी एक दंडाधिकारी आहे. आहो.! जो दंडाधिकारी नेमला आहे तो नागरिकांच्या मुलभूत गरजा आणि हक्कांवर गंडांतर आले तर त्यांचे संरक्षण करण्यासाठी आहे. याची जाणिव काय आम्ही करुन द्यायची का? असा प्रश्‍न आता संतप्त नागरिक करु लागले आहे. वाकचौरे यांच्याबाबत जो काही प्रकार तहसिल कार्यालयात झाला. त्याचा तालुक्यातून निषेध नोंदविला जात आहे. कारण, ते व्यक्तीमत्व कोणाच्या दुखण्यावर बांधले तरी सलणार नाही. मात्र, तहसिलदार यांनी जेव्हा मर्यादा सोडल्या तेव्हा थेट हमरातुमरी झाली. प्रशासनाचे हे असले वागणे तालुक्याला काही पटले नाही. त्यामुळे, याबाबत थेट महसुलमंत्र्याकडे काही कार्यकर्ते तक्रार करणार आहेत. 

मला काय तेव्हढंच काम आहे का?

कागदांवर वेळीच सह्या होत नाही, आजही हजारो रेशन कार्ड बाकी आहेत, त्या रेशनकार्डांच्या हकनाक चौकशा लावल्या आहेत, शासकीय योजनांच्या बैठका नाहीत, महसुल विभागात कोणाशी सलोखा नाही, अतिवृष्टी झाली तरी बांधावर कोणाच्या भेट नाही, शेतकरी मरायला आला तरी हे तेथे जात नाही, तालुक्यात गरिबांचे संसार वाहुन गेले, तरी हे पहायला धिर द्यायला जात नाही, कोणाचा फोन आला तर सोईने माहिती देत नाहीत, सलोख्याने कोणाशी बोलणे नाही. विशेष म्हणजे, शनिवार, रविवार यांचे वास्तव्य अकोल्यात नाही. तेव्हा कोणाचे काम आडले तर सहकार्य नाही. महसुलमंत्र्यांनी मुख्यालयी राहण्याचे आदेश दिलेले असताना यांचे आपत्कालिन वेळी दर्शन मिळत नाही. हे सर्व असे असताना मला काय तेव्हढंच काम आहे का? असे उत्तर मिळते. मग यांना काय काम असते. ते महसुलमंत्र्यांनी स्पष्ट केल्यास बरे होईल. अशी प्रतिक्रिया कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत. 

वाळुला संगमनेरच टार्गेट का?

अकोले तालुक्यात आजही राजरोस वाळु तसेच अन्य गौणखणिज चालु आहे. तालुक्यात प्रवराकाठी असणार्‍या बहुतांशी गावांमध्ये वाळुतस्करी अगदी राजरोस सुरू आहे. यासाठी जे अधिकारी स्वत:ला कर्तव्यदक्ष आणि तुकाराम मुंडे समजतात. त्यांना कोणते तलाटी गोड वाटतात याची चौकशी करा. संगमनेर तालुक्यात फक्त वाळु बंद करण्यात आली आहे. का? तर तो केवळ एक राजकीय वैर असल्याचे बोलले जात आहे. संगमनेरात होते मग २२ किलोमिटरवर असणार्‍या अकोल्यात का नाही? या मलिद्यात कोणाकोणाचे हाथ रंगले आहेत असा प्रश्‍न सहज पडतो. त्यामुळे, शुभ्रतेचा आव आणणार्‍यांनी नेत्यांवर ताव काढण्यापेक्षा अकोल्यातील अवैध धंदे, वाळुचे मलिदे, पेंडींग कामे केली तर खर्‍या अर्थाने कौतुकास्पद ठरेल अशा प्रकारची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.  

अडचण असल्यास संपर्क साधावा

अकोले तालुक्यातील गणोरे आणि  पंचक्रोशी परिसरासह संपूर्ण तालुक्यात तातडीने अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेती, कांदा चाळी, घरे, पडलेल्या भिंती आदींचे पंचनामे तातडीने करुन तत्काळ भरपाई द्या. तसेच या संदर्भात ग्रामस्थांनी ग्रामविकास अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक, यांचेशी संपर्क साधावा. आपल्या नुकसान भरपाई संदर्भात पंचनामे करून घ्यावेत. आपल्या नुकसानीचे फोटो, व्हिडिओ काढून ठेवावेत. प्रशासन लवकर आले तर ठिक, नाही आले त्याबाबत तक्रार करा. पावसामुळे नुकसानिची तिव्रता लक्षात येईल. प्रशासनाने सुट्टीच्या दिवशीही पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई संदर्भात माहिती तालुका प्रशासनाला द्यावी. तसेच काही अडचण असल्यास प्रशासनाशी अथवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी संपर्क साधावा.

  - सुशांत आरोटे (तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, अकोले)