शब्दपुर्तीकडे कारखाना.! कारखाना कर्जमुक्त हवा.! पण बारीक साखर नको.! तेव्हा, अजित दादांनी जेवण थांबविले होते.!


सार्वभौम (अकोले) :- 

अगस्ति सहकारी साखर कारखान्यात कधी नव्हे असे ऐतिहासिक सत्तांतर झाले. कारखान्याला कर्जमुक्त करु, खर्चात काटकसर करु, तसेच आदिवासी बांधवांसह शेतकर्‍यांची दिवाळी गोड करु, कारखाना बंद पडू देणार नाही अशी नाना प्रकारची आश्‍वासने देऊन शेतकरी समृद्धी विकास मंडळाने कारखाना एकहाती ताब्यात घेतला. खरंतर, कारखाना कर्जमुक्ती ह्या गोष्टी तुप खाल्ले आणि रुप आले असे होणे शक्य नाही. त्यामुळे, संयम ठेवावा लागणार आहे. मात्र, आनंद या गोष्टीचा आहे. की, आ. डॉ. किरण लहामटे, चेअरमन सिताराम पाटील गायकर, व्हा.चेअरमन अशोकराव भांगरे, मधुभाऊ नवले यांच्यासह अनेकांनी जी आश्‍वासने दिली होती. त्याची पुर्ती होताना दिसत आहे. कारण, आज दिवाळी सरत असताना फक्त आदिवासी बांधवांनाच ११५ क्विंटल साखर कारखान्याने दिली आहे. तर, सगळ्यांना मिळून सहा हजार क्विंटल साखर वितरीत करण्यात आली आहे. इतकेच काय.! अगस्ति कारखान्यावर जे कर्मचारी बाहेर काम करत होते. त्यातील बहुतांशी कर्मचारी कारखान्यावर हजर झाले असून ज्यांनी योग्य ठिकाणी ड्युट्या केल्या नाही. त्यांच्यावर कायदेशिर कारवाई देखील सुरू केली आहे. इतकेच काय.! आता कारखान्यावर कोणालाही आगाऊ डिझेंल मिळत नाही आणि कोणताही कर्मचारी कारखाना सोडून बाहेर काम करत नाही. त्यामुळे, कारखान्याचा हजारो नव्हे.! लाखो रुपयांचा खर्च वाचला असून खर्‍या अर्थाने शेतकरी समृद्धी विकास मंडळाने आपली शब्दपुर्ती करण्यास सुरूवात केली आहे.


निवडणुकीच्या काळात आश्‍वासने हे द्यायची असतात. ती पाळायची नसतात अशा प्रकारचा राजकीय समज आहे. मात्र, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले अशी संतांची शिकवण आहे. त्याचा प्रत्येय अगस्ति कारखान्यात शेतकरी समृद्धी विकास मंडळाकडून पहायला मिळाला आहे. कारखान्यात बहुजनांचा चेअरमन करणार हे पहिले वाक्य सार्थ ठरले आणि तेव्हापासून कारखान्याच्या शब्दपुर्तीला सुरूवात झाली. त्यानंतर ३ हजार १०० आदिवासी बांधवांना १९९२ पासून ते आजवर कारखान्यातून साखरेचा दाना सुद्धा मिळाला नव्हता.  मात्र, यावर्षी दिवाळीत फुल ना फुलाची पाकळी म्हणून दिलेल्या शब्दाप्रमाणे साखर वाटप करण्यात आली. राजूर, कोहणे, समशेरपूर, शेंडी अशा ठिकाणी बुथनिहाय ११५ क्विंटल साखरेचे २५ रुपये दराने वाटप करण्यात आले. तर, महत्वाचे म्हणजे सर्व भागातून सरासरी ६ हजार क्विंटल साखर वाटली. म्हणजे जवळजवळ ८० टक्के लोकांनी ही साखर नेली आणि अद्याप त्यांच्यासाठी कारखान्याची दारे खुली आहेत. त्यामुळे, महत्वाचे म्हणजे इतिहासात पहिल्यांदा कारखाना आपला आहे आणि आम्ही कारखान्याचे आहोत ही भावना त्यांच्यात निर्माण झाल्याचे पहायला मिळाले.

अकोल्यात अजित दादा आले होते. तेव्हा त्यांनी भर सभेत सांगितले होते. की, ३८ कर्मचारी कारखान्याच्या बाहेर काम करीत आहेत. आता सरासरी यांचा पगार काढला तर १८ ते २० हजार रुपयांच्या घरात जातो. त्यामुळे, अशा सर्व कर्मचार्‍यांना हजर होण्याचे आदेश देण्यात आले होते. तेव्हा, काही कार्मचारी हजर झाले. कोणी आले नाही. कोणी चेअरमन साहेबांच्या भेटी घेतय, कोणी संचालकांना गळ घालतय. मात्र, जे काही मिटींगमध्ये ठरेल. तेच होईल अशी एकवाक्यता कारखाना व्यवस्थापनाने दाखविली. त्यामुळे, काहींच्या नोकर्‍या धोक्यात आहे. तर, काहींवर येणार्‍या काळात निर्णय होण्याची शक्यता आहे. आता अजित दादा यांनी सिताराम पाटील गायकर यांच्याकडे ही धुरा सोपवली असून एकेकाळी शांत, संयमी, मृदु आणि सर्वांना सामावून घेणारे गायकर साहेब सगळ्यांना ऍक्शन मुडवर दिसत आहे. कारण, कारखाना व्यवस्थित चालुन दाखविणे, तो कर्जमुक्तीकडे नेणे, सगळ्यांची वज्रमुठ कायम ठेवणे, काटकसर आणि पाच वर्षाच्या प्रदिर्घ कालावधीत अनेक बायप्रोडक्ट घेऊन कारखान्याचा श्‍वास मोकळा करण्याचा मानस त्यांनी आखला आहे. 

कर्जमुक्ती हवी पण बारीक साखर नको.!

खरंतर, दिवाळीची साखर वाटत हा काही शासकीय नियम नाही. मात्र, तरी देखील कारखान्याकडून ६ हजार क्विंटल साखर उत्पादक, अनुत्पादक यांना वाटली. यापुर्वी दिवाळीपुर्वीच कारखाना चालु होत होता. त्यामुळे, साखरेचे उत्पादन घेता येत होते. त्या भरोशावर एम (मोठी) सारखा शेतकर्‍यांना दिली जात होती. मात्र, स्थगित झालेल्या निवडणुका आणि पावसाळा यामुळे कारखाने चालु होऊ शकले नाही. पर्यायी जी साखर उपलब्ध होती. ती मेडिअम एम साखर दिवाळीसाठी वितरीत करण्यात आली. त्यातून सरासरी 50 लाख रुपये तोटा हा कमी भावात साखर दिल्याने होणार आहे. तरी देखील चेअरमन, व्हा.चेअरमन यांनी शेतकर्‍यांच्या आनंदी दिवाळीसाठी हा निर्णय कायम ठेवला. कदाचित कारखाना लवकर चालु झाला असता तर अधिक जाड साखर मिळाली असती. मात्र, हे देखील कटू सत्य आहे. की, कारखाना कर्जमुक्त पाहिजे. पण, थोडी सुद्धा झळ कोणी घेण्यास तयार नाही..!!!

तेव्हा अजित दादांनी तोंडातला घास काढला.!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी अगस्ति कारखान्यावर येऊन हा कारखाना बुडीताकडे कसा निघाला याबाबत सविस्तर माहिती दिली होती. तर, अनावश्यक खर्च टाळा आणि काटकसर करा अशा सुुचना त्यांनी दिल्या होत्या. मात्र, जेव्हा दादांची सभा संपली तेव्हा ते कारखान्याच्या गेस्टहाऊसला जेवणासाठी आले. त्यांनी जेवण सुरू केले आणि काही वेळानंतर त्यांनी विचारले. हे जेवण कारखान्याच्या वतीने आहे का? जर मी येऊन लोकांनी ज्ञान पाजले आणि जेवण करून गेलो तर शेतकरी मला नावे ठेवतील. तेव्हा स्वत: कैलासभाऊ वाकचौरे यांना सांगितले. साहेब.! हे सर्व जेवण मी माझ्या स्वत:च्या खर्चाने दिले आहे. कारखान्याचा यात काही संबंध नाही. तेव्हा दादांनी सर्वांचे कौतुक केले. अशाच पद्धतीने कारखान्यात काटकसर करा. त्यांच्या वाक्याप्रमाणे आज अनेक शब्दपुर्ती होताना दिसत आहे.