शिवसेनेचा नेता दारुचा गुट्टा चालविताना अटक.! बाबो.! थेट बंगल्यात दारुचे भुयार.! नेतेच हाप्ते घेतात..!
सार्वभौम (अकोले) :-
अवैध धंदे किंवा दारु हा काही अकोले तालुक्यापुरता मर्यादित विषय मुळीच नाही. तो देशभरात माजलेला प्रश्न आहे. मात्र, ज्यांच्यावर हे अवैध धंदे रोखण्याची जबाबदारी आहे. ते मात्र मुग गिळून मलिदा खाण्यात व्यस्त आहे. मुळात अवैध दारुवर कारवाई करण्याचे मुळत: काम हे राज्य उत्पादन शुल्क यांचे आहे. परंतु, संगमनेर विभागाकडून काय दिवे लावले जातात.! हे सर्वश्रूत आहे. अन्नभेसळ, रेशन घोटाळा आणि गुटखा यांच्यावर कारवाई करण्याचे काम अन्न व औषध प्रशासन विभागाचे आहे. मात्र, दुर्दैवाने पोलीस कारवाई करतात आणि गुन्हे दाखल करण्यासाठी सुद्धा हा विभाग तत्परता दाखवत नाही. वाळुवर कारवाई करण्याचा अधिकार महसुल विभागाचा आहे. मात्र, तलाठी ते तहसिल काय करतात हे नव्याने सांगण्याची गरज नाही. असे अनेक मुद्दे आहेत. परंतु, एकीकडे अवैध धंद्यावाल्यांना पाठबळ देऊन त्यांच्याकडून हाप्ते वसूल करणारे पुढारी, बुकींकडून मलिदा खाणारे प्रशासन आणि कायद्यात असणाऱ्या तृटी यामुळे हे स्तोम माजले आहे. यामुळे अनेक तरुणांचे बळी गेले असून हजारो संसार उध्वस्त झाले आहेत. हे खरे असले तरी जे कोणी दारुबंदीवर काम करतात. त्यांनी पहिल्यांदा मटका, जुगार, दारु, बिंगो, सट्टे यावर टेबल जामिन दिले जातात त्या कायद्यात बदल करणे आवश्यक आहे. त्यासाठी कायदेशिर लढाई उभी करणे आवश्यक आहे. यू अटक आणि यू घरी.! असे असेल तर कोणी कितीही ओरडले तरी काही फरक पडणार नाही. त्यामुुळे, जागृती आणि कायदेशिर मार्ग. यापेक्षा दुसरा मार्ग शंभर टक्के निष्फळ आहे.
दबावाचा फायदा रेट वाढीला...!!
अकोले शहरात बालाजी व सुरभी दोन ठिकाणी पोलीस व उत्पादन शुल्क यांनी करवाई केली आहे. तर, डोंगरे यांच्यासह दोन जणांच्या लायसन्सला महिनाभर स्थगिती दिली होती. इतकेच काय १९ जणांना ९३ प्रमाणे प्रांतांकडून नोटीस सुद्धा बजावली आहे. २० दिवसात १९ कारवाया आणि वर्षभरात १२५ कारवाया अकोले पोलिसांनी केल्या आहेत. यापलिकडे ज्या दोघांनी लेखी दिलेले नियम तोडले, बॉन्डचा भंग केला त्यांच्या स्थावर मालमत्तेवर सहा.पोलीस निरिक्षक मिथुन घुगे यांनी बोजा चढविला आहे. ही जिल्ह्यातील पहिली कारवाई असावी. मात्र झाले काय? जसे बार बंद झाले तसे अवैध दारुविक्रीला प्रोत्साहन मिळाले. रेट आवाच्या सव्वा झाले. अर्थाच बनावट आणि अवैध उत्पादनाचे कोणी समर्थन करणार नाही. मात्र, मोर्चे, आंदोलने आणि ठिय्या हा त्यावरील उपाय होऊच शकत नाही. त्यासाठी न्यायालयीन आणि सुधारणात्मक लढा लढणे गरजेचे आहे. तर, प्रतिबंध करुन कोणी दारु सोडली असे वाटत नाही. उलट त्याची उपयोगिता अधिक प्रबळ होते आणि हव्या त्या किमतीला व्यक्ती खरेदी करतो. म्हणून जागरुती करणे, संघटन करणे, शिक्षण आणि कायदेशिर लढा हेच यासाठी मोठे हत्यार आहे.
नेते अवैध धंद्यांचे हाप्ते खातात...
अकोले आणि संगमनेर तालुक्यात काही नेतेच अवैध धंदे करीत आहेत. एकीकडे पांढरे कपडे घालुन राजकारण करायचे आणि काळे कपडे घालुन हस्तकाकरवी धंदे करायचे ही निर्लज्जपणाचा धंदा यांनी मांडला आहे. अनेकांना विश्वास पटणार नाही. पण, अकोल्यात अनेक कार्यकर्त्यांचा जुगार, मटाका यांचा धंदा आहे. तर, वाळुतस्करी ही प्रोफेशनल पुढारी गुन्हेगारी झाली आहे. तर, ज्या नेत्यांचे धंदे नाहीत, ते मात्र अकोल्यात अवैध धंद्यावाल्यांना पाठीशी घालुन त्यांच्याकडून हाप्ते वसूल करताना दिसत असल्याचे बोलले जात आहे. शाहुनगर परिसरात देखील नेतेगिरी करणारे लोक आहेत. खरंतर, या परिसरात आज मुलभूत गरजांचा आभाव आहे. त्याचे फार कोणाला गद्य-पद्य वाटत नाही. तर, तेथेच राहणाऱ्या व्यक्ती दारु विकतात त्यांचे मन वळविण्यात कोणाला धन्यता वाटत नाही. विशेष म्हणजे याच परिसरात तीन ते चार बार आहेत. त्यातून कोणी दारु पिले तर मरत नाही का? मग ते बार बंद करण्यासाठी का कोणी खटाटोप करीत नाही ? हे सर्व अनभिज्ञ वाटण्यासारखे असले तरी तो विषय मुळात तसा नाही...!! अर्थात हे सर्व अगदी सारांश शुन्य आहे....!!
शिवसेनेचा लोकप्रतिनिधी दारुत अटक.!
अकोले तालुका नेमकी काय वळण घेतो आहे. हेच कळत नाही. कारण, चक्क शिवसेनेचे जबाबदार लोकप्रतिनिधी तथा पंचायत समिती सदस्य देवराम सामेरे हेच आपल्या गावात दारु विकताना मिळून आले आहेत. यात दुर्दैव असे की, देवगाव हे क्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे गाव आहे. त्यांचे विचार आणि त्यांच्या जन्मभुमिचा वसा सामेरे यांनी देशभर घराघरात पसरवायचा, तर हे महाशय दारु ढोसा हे घराघरात पोहचवत आहेत. हे किती मोठे दुर्दैव आहे. दि. ३१ आक्टोबर रोजी रात्री हे महाशय स्वत:च्या घराच्या आडोश्याला हे क्रांतीकारी कृत्य करीत होते. त्यांना पोलिसांनी अटक केली असून याप्रकरणी विजय फटांगरे यांनी फिर्याद दाखल केला आहे. या एकाच दिवशी पोलिसांनी १० दारु गुट्ट्यांवर कारवाया केल्या आहेत. त्यात तडीपार आरोपी संजय आदालतनाथ शुक्ला (राजूर, रा. दिगंबर रोड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर, वारंघुशी येथे छापा टाकून सुनिता सुखदेव पंडित (रा. वारंघुशी, ता. अकोेले) वाकी येथून सोमनाथ धर्मा कवटे (वाकी बंगला, राजूर) देवठाण येथून देवराम लहानू सामेरे (देवगाव, ता. अकोले) केळुंगण येथून नवनाथ नामदेव लांघी (रा. केळुंगण, राजूर) रध्यातून भगवान रामचंद्र मुर्तडक (रा. रंधा खुर्द, राजूर) राजुर येथून जंगिलाल आमृतलाल बिंद (दिगंबर रोड, राजूर) आणि शिसवद येथून रमेश देऊ पोरे (रा. शिसवद, राजूर) यांना अटक केली आहे. या व्यतिरिक्त १० ते १२ कारवाया असून यांच्याकडून हजारो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दरम्यान, नाशिक पोलीस महानिरिक्षक यांच्या पथकाने रात्री अचानक राजुरमध्ये धाड टाकली. त्यांनी संजय अदालतनाथ शुक्ला (वय ४०, रा. दिगंबर रोड, राजूर) यांच्या घरात भुयार करुन दारु त्यात ४० हजार रुपयांची दारु लपविण्यात आली होती. त्यामुळे, कट्टर दारु विक्रेता शुक्ला यास पोलिसांनी अटक केली आहे. आता शुक्ला यास पुर्वीच तडीपार म्हणून घोषीत केले होते. मात्र, त्याने तडीपारी रद्द करुन दारु विकणार नाही असे हमीपत्र लिहून दिले होते. मात्र, झाले काय? दोन दिवसांपुर्वी स्थानिक पोलिसांनी छापा टाकला आणि तिसऱ्या दिवशी आयजी यांच्या पथकाने पुन्हा रेड केली. म्हणजे हे दारुविक्रेते किती सराईत आहेत. त्यामुळे, अशा व्यक्तींची तडीपारी पुन्हा करुन तो बॉन्ड रद्दबातल केला पाहिजे. पोलिसांनी प्रस्ताव पाठवून प्रांताधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे गांभिर्याने पाहिले पाहिजे. यासाठी खऱ्या अर्थाने समाजसेवकांनी कायदेशिर प्रयत्न केले पाहिजे. कारण, जशी अन्नधान्याची कोठारे असतात तशी हे लोक दारुची कोठारे करु लागली आहेत. म्हणून तर यांच्यावर कठोर कारवाई आपेक्षित आहे. तर याच पथकाने केळुगंण परिसरातील कोल्हार घोटी रोडजवळील हॉटेल हिरा येथे छापा टाकला. त्यात एकनाथ नामदेव लांघी (वय २२ वर्षे रा. केळुगंण ता. अकोले जि. अ.नगर) हा हॉटेल हिराचा मालक व नवनाथ सुरेश देशमुख (रा. केळुगंण ता. अकोले) याला देखील अटक केली आहे. ही कारवाई पोलीस महानिरिक्षक नाशिक यांच्या पथकातील पोलीस निरिक्षक बापू रोहोम, सहायक पोलीस उपनिरिक्षक बशीर तडवी, कर्मचारी शकील शेख, प्रमोद मंडलिक, पो. ना. मनोज दुसाने, महिला पोलीस छाया गायकवाड या पथकाने केली.