पिचड-पितापुत्रांचा पराभव का झाला? कोण कोठे कमी पडले, काय चुका झाल्या आणि काय करायला पाहिजे.! हे कटु वाटले तरी सत्य आहे.!!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
अगस्ति सहकारी साखर कारखान्याची निवडणुक काल पार पडली. त्यात पिचड पिता-पुत्रांना फार मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. अर्थात माजी मंत्री मधुकर पिचड साहेब आणि त्यांचे चारदोन संचालक तरी निवडून येतील असे वाटले होते. मात्र, दिड ते दोन हजारांचे लिड घेऊन गायकर साहेबांचे उमेदवार निवडून आले. हा इतका मोठा पराभव तो ही एका २७ वर्षे चेअरमन असलेल्या, ४० वर्षे आमदार आणि राज्याचे मंत्रीपद स्विकारलेल्या नेत्याचा व्हावा.! ही फार लाजिरवाणीबाब आहे. या सर्व पराभवाचा अन्वयार्थ काय? सर्वच्या सर्व (२१) संचालक निवडून येतील अशी खात्री सांगणार्या भाजपाला साधं खात सुद्धा खोलता आलं नाही. याचे चिंतन ते करतील नाही करतील तो भाग वेगळा. मात्र, जनतेच्या मनात जी काही कुजबुज चालु आहे. ती मांडणे अनिर्वाय वाटते. म्हणून नेमकी भाजपाचे नेमकी चुकले काय? ते कोठे कमी पडले? त्यांनी काय करायला हवे होते? याबाबत मतदार निकालानंतर व्यक्त होऊ लागले आहेत. आता या वृत्तातून काही घेता आलं तर पहा.! नाहीतर सार्वभौमचे रोखठोक लिखाण हे मिर्ची झोंबणारे असतेे. विकले गेले, निर्भीड नाही हे असले टोमणे समोरून आले तरी त्यात काही नवल वाटणार नाही. मग फक्त पुढच्या परावभाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा म्हणजे झालं.!!!
भाजपा प्रवेश चुकलाच.!
आदरणीय पिचड साहेबांनी १९८० ते २०१४ असा एकमार्गी विजय घेऊन पुरोगामी तालुक्याचे नेतृत्व केले आहे. अर्थात त्यांनी स्वत: फुले-शाहु-आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार केला आहे. तर, सनातनी, जातीयवादी, धर्मवादी लोकांना प्रकर्षाने विरोध केला आहे. मात्र, दुर्दैवाने आज त्यांच्या कार्यालयात कोणत्या जयंत्या-पुण्यतिथ्या होतात. त्यांची नावे देखील तालुक्याला माहिती नाही. अर्थात हा सहवासाचा परिणाम असतो. यात कोणाच्या कार्याला कमी लेखण्याचा भाग नाही. मात्र, हा तालुका पुरोगामी विचारांच्या सहवासात नांदत आलेला आहे. त्यामुळे, जो काही २०१९ साली निर्णय झाला. तो जनतेला काही पटलेला नाही. त्यामुळे, त्यांनी तो निर्णय का घेतला, काही दबाव होता की नव्हता, त्याचा काय फायदा झाला याच्या खोलात जाणे उचित नाही. मात्र, विधानसभा, जिल्हा बँक, राजूर ग्रामपंचायत आणि आता कारखाना या सगळ्यात भाजपा प्रवेशाचा त्यांना तोटा झालाच. हे त्यांनी स्विकारले नाही, तरी ते सत्य आहे.
ती धडपड दिसली नाही.!!
अकोल्यात केंद्रीय मंत्री गडकरी साहेब आले. त्यांनी भाषण केले मात्र, तालुक्यासाठी साधा एक शब्द सुद्धा दिला नाही. ना. विखे साहेब देखील काही वेगळ्या माळेचे मनी नाहीत. त्यामुळे, हा खर्च खरोखर व्यर्थ गेला. तो उमेदवारांना अधिक सहाय्यभूत ठरला असता. तर, महत्वाचे म्हणजे जेव्हा निवडणुक स्थगित झाली. तेव्हा भाजपाकडून जरा देखील हलचाल झाली नाही. ना ती हायकोर्टात अपिल करण्यासाठी ना ती कारखाना सुरू करण्यासाठी. त्यामुळे, याच संधीचा फायदा अगदी योग्यवेळी गायकर साहेबांनी घेतला आणि त्यांनी पायला भिंगरी लावून कर्ज ते लेबर यासाठी प्रयत्न केले. त्यातून एक मेसेज जनतेपुढे गेला. की, कारखाना हे गायकरच चालु शकतात. जर, हिच धडपड भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी केली असती. फक्त नुसती लुडबुड जरी केली असती तरी एक सहानुभूती निर्माण झाली असती. मात्र, दे रे हारी खाटल्यावरी या भुमिकेत भाजपा दिसली. त्यामुळे, जनता पहात होती. त्यांनी धडाधड वास्तवाला मतदान केलं. परिणामी भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले.
आदिवासी पट्ट्यात कमी पडले.!
खरंतर, प्रवरा, मुळा आणि आढळा या पट्ट्यात दोन्ही गटांना समसमान मतदान होईल. त्यात नात्यागोत्यांचे राजकारण होईल आणि क्रॉस मतदान होऊन या परिसरात प्लस मायनस चित्र पहायला मिळेल. या पलिकडे क्रॉसच्या नादात काही मते बाद होतील असे वाटले होते. म्हणून जे काही लिड मिळेल आणि पॅनल टू पॅनल मतदान होईल ते फक्त आदिवासी भागातून होईल. त्यामुळे, दोन्ही गटांच्या धुरा ह्या वरच्या पट्ट्यावर अवलंबून होत्या. मात्र, बुथनिहाय आकडेवरी पाहिली तर जेथे खुद्द साहेब बसले होते. त्या बुथवर देखील मतदान कमी आहेत. एरव्ही पिचड साहेबांना देव माननारा पट्टा देखील साहेबांच्या सोबत दिसला नाही. त्यांनी अगदी पॅनल टू पॅनल डॉ. लहामटे, यमाजी लहामटे आणि अशोकराव भांगरे यांना समर्थन दिले. त्यामुळे, सुरूवातीला १९७८ साली यशवंतराव भांगरे यांनी पिचड साहेबांना पराभूत केले होते. त्यानंतर ऐन्डला २०२२ साली अशोकराव भांगरे यांनी त्यांना पराभूत केले.
कारखान्याचे सोडून तेलंगणाचे परिवर्तन
जेव्हा कारखान्याची निवडणुक सुरू झाली. तेव्हा कदाचित ती बिनविरोध देखील झाली असती. मात्र, परिवर्तन आडवे आले आणि माघारीच्या अंतीम तारखेला काही जणांनी माघारी घेतल्या. अक्षरश: आदल्या दिवशी परीवर्तनवाले पिचड साहेब आणि गायकर साहेब यांना शिव्यश्राप देत होते. त्यामुळे, तो एक वेगळा गट निर्माण झाला होता. काही लोकांचा त्यांच्यावर देखील विश्वास होता. मात्र, ते बहाद्दर अचानक पिचड साहेबांना जाऊन सामिल झाले आणि सगळ्यांनी मिळून गायकर टार्गेट कले. आता अचानक यु टर्ण घेतल्यानंतर गाडीचा अपघात होतोच. त्यामुळे, जनतेला देखील काही गोष्टी लक्षात आल्या आणि २१-० हा अपघात होण्यास भाजपाचा हा निर्णय देखील बर्यापैकी कारणीभूत ठरला. बरं यांनी दिलाच होता पाठिंबा तर जान जाऐ लेकीन वचन ना जाऐं.! असे वागायचे तर कारखान्याचे परिवर्तन सोडून आख्खी टिम तेलंगणाचे परिवर्तन करायला निघुन गेली. या सर्व घडामोडी जनता डोळ्याने पहात होती.
अतिशयोक्ती कार्यकर्ते.!
निवडणुकीत सर्वात महत्वाची भुमिका ही कार्यकर्त्यांची असते. थोडं अवघड वाटेल. पण, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अनेकजण सांगत होते. भाऊ पराभूत होतील. जनता विरोधात दिसते, विरोधात बोलते. सुप्त लाट आहे. तेव्हा अतिउत्साही कार्यकर्ते आणि नेते म्हणत होते. भाऊ एक लाख मतांच्या लिडने निवडून येतील. हा इतका मोठा फालतु आत्मविश्वास यांच्यात कोठून येतो देव जाणे.! पण, आपल्या नेत्याला खोटी माहिते देणे, अतिशयोक्ती सांगणे, उगच हारभार्याच्या झाडावर चढून देणे याला कार्यकर्ता तरी कसे म्हणता येईल. उलट नेता पडण्यापुर्वी अंधारा ठेवण्यापेक्षा सत्य स्थिती कथन केली तर २४ तासात सुद्धा जग जिंकता येतं असे अनेक नायक आपल्या डोळ्यासमोर आहे. पण, दुर्दैवाने नेत्याजवळ डॉक्टर, वकील, इंजिनिअर तथा सुशिक्षित कार्यकर्ते नाहीत. १० वी आणि १२ वीच्या कार्यकर्त्यांची वैचारिक कुवत असते तरी काय? अगदी अंगठा बहाद्दर असलेल्या मंत्र्याला आयपीएस, आएएस अधिकारी सचिव असतो. म्हणून तो राज्याचा कारभार पाहतो. दुर्दैवाने बुद्धीने चालणारी मानसे कमी आणि पायाने चालणार्यांची गर्दी जास्त असल्याने हा पराभव आहे. तर, भाराभर माध्यमे जी पैशासाठी पुढेमागे फिरतात त्यांना लाथाडून आपली सत्य बाजु प्रकषाने मांडू शकतात. अशांना विश्वासात घेऊन लढाई करणे अपेक्षित होते. नाका परिस जड, एक नाही धड भाराभर चिंध्या.! या म्हणीचा प्रत्येय पहायला मिळाला.
साहेबांनी जे केले ते भाऊंनी करावं.!
कटू असलं तरी जनतेच्या मनातलं बोललं पाहिजे. की, गेली ५० वर्षे आदरणीय पिचड साहेबांनी एखादी चिमणी काडी-काडी जमा करुन घरटं बनवते तसे या तालुक्यात कार्यकर्त्यांचे घरटे निर्माण केले. म्हणून तर साहेबांच्या पराभवानंतर अनेकांचे डोळे पान्हावले. आज सुद्धा पिचड साहेबांवर बोलताना तालुक्यातला प्रत्येक विरोधक विचार करतो. अगदी काल शेंडीत राडा झाला तेव्हा प्रचंड गदारोळ सुरू असताना पिचड साहेब बोलले आणि अगदी काही क्षणात भयान शांतता झाली. ही एक प्रकारची आदरयुक्त दहशत होती. त्यांनी गायकर साहेबांपासून ते अगदी अतिसामान्य कार्यकर्त्याला बळ दिले, मोठे केले, त्याला उभं केलं, कार्यकर्ता चुक असला तरी त्याला एकटं सोडलं नाही. पाटपाणी आणि धरणे बंधारे यात त्यांचे योगदान नगण्य आहे. मात्र, आजही तळागाळातील मानसांच्या काळजात ते देव आहेत. या तुलनेत भाऊंनी हवे तसे त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकले का? संयम, संस्कार, आणि संस्कृती यात ते तिळमात्र कोठे कमी पडले नाहीत. परंतु, संघटन, गणिमी कावे, मानसे संभाळणे अशा अनेक गोष्टींमध्ये त्यांनी बदल करणे गरजेचे आहे. विशेष करुन अतिशयोक्ती कार्यकर्ते, उताविळ नेते, हेतू ठेवून चाटुगिरी करणारी करणारी मीडिया यांपासून सावध राहून नव्याने उभारी घेतली. तरी विजय हा फार दुर नाही.
मतांचे विभाजन टळले.!
आदरणीय पिचड साहेबांच्या विजयाचा इतिहास पाहिला तर त्यांच्या गळ्यात अकोले तालुक्याने नेहमी विजयाची माळ टाकली आहे. याचे गमक काय होते? हे फक्त शरदचंद्र पवार साहेबांना माहित असल्याने त्यांनी २०१९ मध्ये अशोक भांगरे, डॉ. किरण लहामटे, मधुकर तळपाडे, मारुती मेंगाळ, सतिष भांगरे यांच्यासह अनेक आदिवासी नेत्यांना एकत्र केले. एकास एक उमेदवार दिला आणि कधी नव्हे पिचड साहेबांचा पराभव केला. त्यानंतर नगरपंचायतीला कॉंग्रेस अलिप्त लढली आणि पुन्हा भाजपा तथा पिचड साहेबांचा विजय झाला. म्हणजे, मतांचे विभाजन हेच पिचड साहेबांच्या यशाचे गमक आहे यावर शिक्काबुर्तब झाला. म्हणून कॉंग्रेस, शिवसेना, कम्युनिस्ट, मार्क्सवादी, शेतकरी संघटना आणि रिपाई यांना राष्ट्रवादीने सोबत घेतले आणि भाजपाला शह दिला. त्यामुळे, मतांचे विभाजन झाले नाही. परिनामी एकात्मतेचा फायदा होऊन महाविकास आघाडीने २१-० अशी बाजी मारली. एकंदर मतांचे विभाजन न झाल्यामुळे, भाजपाचा पराभव झाला. हे देखील नमुद करणे गरजेचे आहे.