कॉंग्रेसचे सभापती आणि संचालकावर संगमनेरात गुन्हा दाखल.! निवडणुकीत शिवसेना-कॉंग्रेस एकमेकांना भिडले.! नियमभंग केल्याचे सिद्ध.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील पठारभागावरील बिरेवाडी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केला. याप्रकरणी संगमनेर बाजार समितीचे सभापती शंकर हनुमंता खेमनर व भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत अशोक खेमनर यांच्याविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 3 ऑगस्ट 2022 रोजी संध्याकाळी 10 वाजण्याच्या सुमारास बिरेवाडी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने सभा घेण्यात आली होती. ही सभा आचारसंहितेचा भंग करत असल्याने बिरेवाडी येथील शिवसैनिकांनी तीव्र विरोध करत सभापती शंकर खेमनर यांच्या गाडीला घेराव घातला होता. त्यामुळे, काही कालावधीसाठी बिरेवाडी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर, सभापती शंकर खेमनर व संचालक इंद्रजीत खेमनर यांनी आचारसंहिता भंग केला असल्याची तक्रार बिरेवाडी ग्रामस्थांनी निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिली होती. त्याची चौकशी झाली असता पुराव्यांच्या आधारावर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संजय रामनाथ वाकचौरे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक लागली होती. यामध्ये मांडवे, बिरेवाडी आणि निमज आशा तीन ग्रामपंचायती होत्या. अगदी आटातटीच्या परिस्थितीत या ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये बिरेवाडी ग्रामपंचायतमध्ये शिवसेना विरुद्ध काँग्रेस असे दोन गट आमने-सामने आले. त्यामुळे, तेथे काँग्रेसचा गट निवडून येण्यासाठी सभापती शंकर खेमनर हे जीवाचे रान करताना दिसले. पण, मतदानाच्या एक दिवस आगोदर रात्रीच्या वेळी येऊन त्यांनी बिरेवाडी येथील डुकमे वस्तीवर प्रचार सभा घेतली. याचा व्हिडिओ विरोधकांनी काढला व दोन तारखेपर्यंतच प्रचाराची मुदत असताना तुम्ही येथे सभा का घेतली असे म्हणुन सभापती शंकर खेमनर व शिवसैनिकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. ही सभा संपून घरी जात असताना सभापती शंकर खेमनर यांच्या गाडीला शिवसैनिकांनी घेरावा घालुन शिवीगाळ करून गाडीचे नुकसान केल्याचे प्रत्यक्षदर्शी लोकांमध्ये चर्चा रंगली होती.
दरम्यान, या सभेनंतर शिवसैनिक व भाजप कार्यकत्यांनी थेट घारगाव पोलीस ठाणे गाठले आणि सभापती शंकर खेमनर व संचालक इंद्रजीत खेमनर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर, पठारभागावरील भाजपचे नेते बुवाजी खेमनर यांनी नायब तहसीलदार तळेकर यांच्याकडे ही तक्रार केली. नायब तहसीलदार यांनी आचारसंहिता कक्ष प्रमुख यांच्याकडे चौकशीसाठी पाठवले. तेथे बीरेवाडी येथील ग्रामस्थांचे जबाब झाले. या चौकशीत बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर व भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर हे दोषी आढळल्यानंतर एक महिन्यांनी हा गुन्हा दाखल करण्यात आला. याचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल डी. एस. वयाळ करत आहे.
दरम्यान, बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर यांचे साकुर गटावर वर्चस्व आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. ना. थोरात यांनी देखील शंकर खेमनर यांच्यावर विश्वास दाखवुन मोठं-मोठी पदे दिली आहे. मात्र, लोकशाही नांदत असलेल्या या संगमनेर तालुक्यामध्ये निडणुकीत हस्तक्षेप होत असेल तर हे लोकशाहीसाठी घातक आहे. आचारसंहिता सुरू असताना सभा घेणे हे सभापती शंकर खेमनर यांना न शोभणारे आहे. त्यामुळे, लोकशाही सांगणाऱ्या आणि मानणाऱ्या तालुक्यात पदभुषवणाऱ्या नेत्यांकडून हुकूमशाही आणि प्रशासनावर दडपशाही अवलंब केल्याची टीका विरोधकांनी केली आहे. मात्र, सभापती शंकर खेमनर यांच्या मनमानी कारभरविरोधात प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, संगमनेर ग्रामपंचायत निवडणुकींमध्ये कार्यकर्ते एकमेकाला भिडल्याचे पाहायला मिळाले. एकीकडे बिरेवाडीत निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग झाला म्हणून तर दुसरीकडे निमजमध्ये माजी सरपंचाला पाडले म्हणुन त्यांच्या घरापुढे तीन-तीन डीजे लावले. तेथे देखील कार्यकर्त्यांमध्ये धराधरी झाली. निमज येथील भाजप-सेनेचे कार्यकर्ते तालुका पोलीस ठाण्यात रात्रभर बसले परंतु त्यांची देखील तक्रार पोलिसांनी घेण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे, संगमनेरात किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या स्वरूपात होत आहे. तर संगमनेरच्या निवडणुकींना वादाची किनार लागत आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना देखील राजकीय रंग चढु लागला आहे. त्यामुळे, संगमनेरातील येणाऱ्या निवडणुकीचे राजकारण चांगलेच तापले आहे. जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीपुर्वीच सभापती शंकर खेमनर व संचालक इंद्रजीत खेमनर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने साकुर गटातील राजकारण ढवळुन निघाले आहे.