मेंढ्या चारण्यासाठी सौदा करुन मुलगी आणली अन खून करुन बापाच्या दारात नेवून टाकली, देव-भागत पाहण्याच्या नादात मुलगी गेली.!

      


सार्वभौम (संगमनेर) :-

        शेळ्या-मेंढ्या चारण्यासाठी आणलेल्या एका 10 वर्षीय मुलीचा मेंढपाळाने खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन वर्षे मुलीने मेंढ्या चारल्या आणि नंतर आठ दिवस आई वडिलांंकडे गेली असता. दुसर्‍या दिवशी मुलीचा मृतदेह हा एका कापडात गुंडाळून बापाच्या पालाबाहेर पडला होता. मुलगी अचानक येथे आली कशी? तिला बाहेरचे काही झाले आहे का? असे अनेक प्रश्न पडले असता बापाने तिला एका देवळात नेेले आणि तिला अंगारा लावला. मात्र, तिची हलचाल झाली नाही. अखेर नाशिक घोटी महामार्गावर उभे राहून एका पिकअपमध्ये मुलीस टाकून तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोवर फार वेळ झाला होता. मुलीने अखेरचा श्वास घेतल्यानंतर तिच्या हाताच्या आणि गळ्याभोवती असणार्‍या जखमा लक्षात घेता ही हत्या असल्याचे प्रथमदर्शी अहवाल आला आहे. यात गौरी अगविले (रा. ता. उभाडे. इगतपुरी, जि. नाशिक)असे मयत मुलीचे नाव आहे. तर पोलिसांनी विकास सिताराम कुदनर व सुमन विकास कुदनर (रा. शिंदोडी,घारगाव ता. संगमनेर) याच्यासह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर, ही मुलगी संगमनेर शहरातील अकोले नाका परिसरात असणाऱ्या एका रुग्णालयात तब्बल चार दिवस उपचार घेत होती. मात्र, संबंधित हॉस्पिलटमध्ये साधी एमएनसी देखील पोलीस ठाण्यात दिली गेली नाही. त्यामुळे, यांनी हा प्रकार का लपविली?  "वैद्य" म्हणायचे गुन्हेगारांना पाठीशी घालायचे यावर आता संगमनेरात उलटसुलट चर्चा सुरु आहे. जर संबंधित हॉस्पिटलने या घटनेची माहिती दिली असती तर मुलगी वाचली असती. या हॉस्पिलटमुळे तिला तिलाजली देण्याची वेळ आली नाही ना? असा प्रश्न निर्माण होतो. असे म्हणतात की, गरज सरो आणि "वैद्य" मरो. पण, येते मात्र भलतीच म्हण समोर येऊ लागली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मयत गौरीच्या पालकांनी ती 10 वर्षाची असताना तिला आरोपी विकास सिताराम कुदनर याच्याकडे शेळ्या मेंढ्या चारण्यासाठी पाठविले होते. गेली तीन वर्षे गौरीचे वय शाळेत जाण्याचे, खेळण्या बागडण्याचे असताना ती भर उन्हातान्हात, मेंढ्यांमागे जात होती. का? तर आपल्या बापाची परिस्थिती नाही. तो जन्म देऊ शकतो. मात्र, दोन वेळचे अन्न सुद्धा देऊ शकत नाही. त्यामुळे, वय नसताना त्याने ज्याच्याकडे पाठविले. त्याच्याकडे प्रामाणिकपणे काम करण्यासाठी गौरी बांधिल होती. काही झालं तरी आईबाप माणूस विसरत नाही. म्हणून गौरी देखील गेल्या कित्तेक दिवसानंतर आपले आई बाप पाहण्यासाठी इगतपुरी येथे आली होती. दि. 26 ऑगस्ट 2022 पुर्वी आठ दिवस ती आई वडिलांकडे राहिली आणि नंतर विकास कुदनर हा तिला पुन्हा घेऊन आला.

दरम्यान, दुसर्‍या दिवशी (दि. 27) गौरीचे आई वडिल त्यांच्या दार नसलेल्य पालावर झोपले होते. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास वडिलांना जाग आली आणि ते लघुशंकेसाठी बाहेर आले. बघताय तर काय? पालाच्या तोंडाशी एका लाल रंगाच्या फडक्यात काहीतरी गुंडाळून ठेवलेले होते. त्यांनी पत्नीस आवाज दिला आणि दोघांनी फडके उघडून पाहिले तर त्यात एक मुलगी होती. मात्र, तिची हलचाल होत नव्हती. तेव्हा गौरीचे वडिल धावत पळत जवळच्या एका झापावर गेले आणि नात्यातील काही व्यक्तींना बोलावून आणले. त्यांनी कापड उचकावून पाहिले असता त्यात गौरी होती. ती आचानक या आवस्थेत येथे आली कशी? तिला येथे आणून सोडले कोणी? तिलातर विकास कुदनर याने नेले होते. असे अनेक प्रश्न पडले असता गौरीला काहीतरी बाहेरचे झाले असावे म्हणून तिला तसेच उचलले आणि मोराच्या डोंगरावर मंदिरात नेवून गौरीला आंगारा लावला. मात्र, तरी देखील तिला काही फरक पडला नाही. ती बेशुद्धच होती.

दरम्यान, मुलीला आहे त्या आवस्थेत उचलुन पुन्हा रस्त्यावर आणले. घोटी ते नाशिक या महामार्गावर येेईल त्या वाहनाला हात करुन यांनी मदत मागण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच मदत मिळाली नाही. काही काळानंतर एक पिकअप थांबली आणि त्यात टाकून गौरीला घोटी येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी वरवर उपचार केले आणि पुढील उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र, तेथे देखील फार काही झाले नाही. अखेर गौरी आगविले हिने जीव सोडला. त्यानंतर तिच्या गळ्यावरील व्रण आणि हातावर असणार्‍या जखमा पाहून हा अपघात नाही तर हत्या असल्याचे समोर आले आहे. यापुर्वी विकास कुदनर याच्यावर कलम 307 नुसार गुन्हा दाखल होता. आता वैद्यकीय  अहवालानुसार कलम 302 हा वाढीव कलम लावण्यात आला नाही. या गुन्ह्यात पोलीस उपाधिक्षक राहुल मदने यांच्या पथकाने विकास कुदनर व सुमन कुदनर या दोघांना अटक केली आहे. 

रोखठोक सार्वभौमची दखल.!

दरम्यान, रोखठोक सार्वभौमने मेंढपाळ आणि आदिवासी मुले यांच्यात होणार्‍या सौदेबजीवर आवाज उठविला होता. आजही आदिवासी भागात अन्याय अत्याचार आणि अशा प्रकारची सौदेबाजी सुरू आहे. त्यानंतर राज्याचे बडे नेते आणि केंद्राचे मंत्री यांनी या घटनेची दखल घेऊन संगमनेरातून आढावा घेतला आहे. तर, प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसिलदार अमोल निकम, पोलीस उपाधिक्षक राहुल मदने आणि पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांनी देखील या प्रकरणात विशेष लक्ष घालुन सात ते आठ मुलांच्या सुटका केल्या आहेत. त्यांना बालसुधारगृहात ठेवले जाणार असून त्यांना आता शिक्षण मिळणार आहे. काही नेते थेट जिल्ह्यात येणार आहेत.  आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष तसेच वसईचे माजी आमदार विवेक पंडीत यांनी या घटनेची दखल घेऊन इगतपुरी येथे भेट दिली. कुटुंबाचे सांत्वन करून दोषींवर उचित कारवाई करावीअशी मागणी केली. वेठबिगारांचा प्रकार संगमनेसह अकोल्यात देखील वाढत असल्याने ते गुरुवार दि. 15 सप्टेंबर रोजी झालेल्या प्रकरणांची माहिती घेण्यासाठी संगमनेरात येत आहे.

र आरोपी पांडुरंग भागवत राऊत (रा.वडझरी खुर्द, तालुका संगमनेर) व बाबासाहेब सुखदेव राऊत (रा.वडझरी खुर्द तालुका संगमनेर) यांनी देखील 14 वर्षाखालील अल्पवयीन बालके हे त्यांचेकडे रोजंदारीने मेंढ्या वळण्याचे कामास ठेवल्याचे निष्पन्न झाले आहे. या मुलांना आरोपींनी एक वेळेस जेवण देऊन गरिबीचा फायदा घेतला. त्यामुळे, सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. पालवे करीत आहेत.