बाप रे.! शेळ्या-मेंढ्या वळण्यासाठी अल्पवयीन मुला-मुलींची विक्री.! पाच मुलांची सुटका, संगमनेरच्या मालकासह 5 जणांवर गुन्हे.!

 

 संगमनेर (सार्वभौम) :- 

                         शेळ्या-मेंढ्या चारण्यासाठी, त्यांच्या लेंड्या काढण्यासाठी, घोड्यांना पाणी पाजण्यासाठी चक्क अल्पवयीन मुले विकत घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील विविध गावातील मुला-मुलींना वेठबिगारीस ठेवल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे, नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात ढवळपुरी, पळशी चौघे आणि संगमनेर तालुक्यातील डिग्रस येथील एक अशा पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपी यांनी अल्पवयीन मुलांच्या पालकांना कधी शेळ्या मेंढ्या देणे, दोन-पाच हजार रुपये देणे, कपडे व खाऊला पैसे देणे अशी वेगवेगळ्या प्रकारचे अमिष दाखवून मुलांना वेठीस धरले. ही घटना 2011 पासून वेगवेगळ्या वेळी व वेगवेगळ्या ठिकाणी घडली. यात संगमनेर तालुक्यातील प्रकाश ठका पुणेकर (रा. डिग्रस, ता. संगमनेर),  रामदास लव्हाटे (रा. पळशी ता. पारनेर), रावा खताळ (रा. ढवळपुरी ता. पारनेर), रामा पोकळे (रा. पळशी ता. पारनेर), कांतीलाल कारंडे (रा. वनकुटे पळशी ता. पारनेर) यांनी संबंधित लोकांच्या गरीबीचा गैरफायदा घेवुन मुलांच्या अल्पवयीन पणाचा गैरफायदा घेतला. तर त्यांना वेठबिगार म्हणुन त्याचेकडुन काम करून घेत मारहाण केली.  

          याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या पाच वर्षापुर्वी प्रकाश पुणेकर रा. डिग्रस ता. संगमनेर हा इगतपुरी येथील  उभाडे गावात एका आगविले शेतकऱ्याकडे गेला होता. तो आगविले याला म्हणाला की, तुझा मुलगा (वय 6 वर्षे) यास माझेकडे पाठव. मी त्याला काम देईल, असे म्हणून त्यांने आगविले याला 3 हजार रुपये रोख दिले आणि मुलास त्याचे बरोबर डिग्रस ता. संगमनेर येथे घेवुन गेला. त्यानंतर त्याला मेंढया वळण्याचे काम दिले. मुलगा रोज सकाळी चहा खारी खाऊन सकाळी 9:30 वाजता जेवन करुन मेंढया व शेळ्या चारायला जात असे. मेंढ्या चारण्यासाठी तो गावोगावी फिरत असे. पुणेकर याच्याकडे एकुण 50 ते 60 कोकरे, घोडा असे सोबत घेवुन तो चालत फिरायचा. अशा प्रकारे  तो नियमीत काम करत असे. त्या बदल्यात त्याला दिवाळीला कपडयाचा जोड, एक चड्डी, एक उपारणे, एक सॅन्डल चप्पल तसेच दुकानातुन खाऊ घेण्यासाठी 5 ते 10 रुपये देत असत. या कामाला मुलगा वैतागला होता. त्यामुळे, पीडित मुलगा नेहमी प्रकाश शेठ याला म्हणत असे. की, मला घरी नेवून सोडा. परंतु, आरोपी याने पीडित मुलास इगतपुरी येथे आणुन घातले नाही. उलट त्यांने काम केले नाहीतर त्याला हाणमार करत असे. 

                 दरम्याने, साधारण आठ दिवसापुर्वी प्रकाश पुणेकर यांने पीडित मुलास त्याच्या आई वडिलांकडे नेवून सोडले. त्यावेळी या मुलाने तेथे होणारा त्रास आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर मुलाच्या पालकांनी तेथील एक श्रमजिवी सामाजिक संघटना (इगतपुरी रा. उंबरकोन) यांच्याशी संपर्क साधला आणि या संघटनेने संगननेर तहसिलदार यांचेकडे येवुन घडलेला प्रकार कथन केला. त्यानंतर, लक्षात आले. की, प्रकाश पुणेकर (रा. डिग्रस ता. संगमनेर) याला ज्ञात होते की, मुलगा अल्पवयीन आहे म्हणून त्याच्या अज्ञानपणाचा फायदा घेवुन त्याला पोटभर जवेन न देता त्याच्याकडून शेळ्या, मेंढया, कोकरे व घोडा असे डिग्रस ता. संगमनेर येथे बळजबरीने सांभाळण्यास लावले. तर, मुलाच्या पालकांच्या गरीबीचा फायदा घेवुन मुलाकडून वेठबिगाराप्रमाणे काम करुन घेतले. याप्रकरणी पीडित मुलाने तालुका दंडाधिकारी अमोल निकम यांच्यासमोर दिलेल्या जबाबावरुन घटना सिद्ध झाली आहे. त्यानंतर पीडित मुलाच्या पालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

तर, पारनेर तालुक्यातील घडलेल्या घटना अशा की, सन 2011 साली दिपावलीच्या महिण्यात रामदास लव्हाटे रा. पळशी ता. पारनेर यांने त्याचेकडे कामाला म्हणुन एका अल्पवयीन मुलास नेले होते. तेव्हा त्याच्याकडे मेंढया सांभाळण्याचे काम दिले. त्या बदल्यात त्यांने मुलाच्या पालकांना 2 हजार रुपये व वर्षाला एक शेळी देण्याचे सांगुन 2 हजार रुपये रोख दिले होते. तेव्हा आरोपी रामदास लव्हाटे हा रोज पहाटे 5 वाजता झोपेतून उठून मुलास मेंढ्यांच्या लेंड्या भरण्यास लावायचा व बादली घेवून पाणी आणण्यास लावायचा. मुलावर जोरजोरात आरडाओरड करायचा. पण, त्याने पैसे मागीतल्यावर तो पैसे वेळेवर देत नव्हता. यापलिकडे मुलास मेंढया चारावयास लावल्या तर मेंढ्या दुसऱ्याच्या शेतात गेल्यास शेतकरी सुध्दा त्याला मारत असे. तर, काम केले नाही तर पीडित मुलास आरोपी जेवन देत नसे. मुलास घरची आठवण आली की तो रडायचा त्यावेळी आरोपी रामदास लव्हाटे हा आज मुलास घरी नेवून सोडतो, उद्या सोडतो असे सांगुन रोज फसवत असे. जेव्हा मुलास आरोपीने घरी सोडले तेव्हा त्याने घडला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यावेळी त्यांनी श्रमजिवी संघटनेस सांगितले त्यानंतर पुढील कार्यवाही झाली. 

              तर, देवळे ता. इगतीपुरी येथील 13 वर्षीय मुलीस तीन वर्षापासून मेंढ्या वळण्यासाठी रावा खताळ (रा. ढवळपुरी ता. पारनेर) यांने त्याचेकडे नेले होते. त्या बदल्यात तिचे वडीलांना 5 हजार रुपये देवून व वर्षाला एक मेंढी देवू असे सांगुन मुलीस मेंढयाचे दुध काढण्यास सांगत असे. तर, तिचेकडून मेंढ्यांचे सर्व कामे करुन घेवुन, घरातील धुनी भांडे करण्यास सांगत असे. तसेच घोड्यांना पाणी पाजण्यास सांगुन वेठबिगाराप्रमाणे वागणुक देत होेते.  तर, कांतीलाल कारंडे (रा. पळशी वनकुटे ता. पारनेर) याने वय वर्षे 13 असलेल्या आल्पवयीन मुलाच्या वडीलांना काही रक्कम देवून रोज पहाटे 5 वाजता उठुन रोज मेंढ्यांची कोकरे पाजण्याकरीता पाठवत होते. काम केले नाहीतर कांतीलाल याचा चुलता काठीने पायावर चापटीने मारत असे व शिवीगाळ करायत असे. तर, जेवण्यास न देता उपाशिपोटी ठेवत असे. कांतीलालचा चुलता हा संध्याकाळी मुलगा हा मेंढया घेवुन आल्यानंतर पळशी वनकुटे येथे रहात असतांना, हंडा देवून रोज विहीरीवरुन पाणी भरण्यास लावत होता, कपडे धुणे, लेंड्या भरणे, घोडयांना पाणी पाजणे, अशी कामे करण्यास लावत होता. तर, पीडित मुलास एकदा कुत्र्यांने चावले होते. तरी सुद्धा त्यास दवाखान्यात न नेता मेंढया चारावयास लावले होत. तर वय 15 वर्षे रा. उभाडे ता. ईगतपुरी जि. नाशिक यास सुमोर 03 वर्षापासुन रामा पोकळे (रा. पळशी ता. पारनेर) यांने पळशी वनकुटे ता. पारनेर येथे 400 मेंढया, शेळ्या, 8 घोडे, 3 कुत्रे असे सांभाळण्यास लावुन मेंढ्या घेवुन पारनेर तालुक्यात गावागावात चारण्यासाठी पाठविले.